प्लास्टिक सर्जरी

प्लास्टिक सर्जरी
Published on
Updated on

काय आबुराव, प्लास्टिक सर्जरी झाली का सुरू?
सर्जरी? आपरेशन? काय की बुवा!
जेवढी लवकर होईल तेवढी बरी.

भले! आपरेशनची एवढी घाई, एवढं कौतुक करणारे तुम्ही एकटेच असाल.
काय करणार? अती झालं आणि हसू आलं असं झालंय!
काय अती झालं म्हणता?
प्लास्टिकचा वापर हो?

परवा एका पोराला म्हटलं, दूध कसं आणतोस रे? तर म्हणाला, कापडी पिशवीतून आणतो.
बाबो, दूध कापडी पिशवीतून कसं काय आणतो म्हणे तो? रस्त्यावर दुधाचा अभिषेक करतो की काय?
मला पण तीच शंका आलेली; पण तो म्हणाला, तो दुधाची प्लास्टिकची पिशवी कापडी पिशवीतूनच घरी आणतो ना शेवटी?
है शाब्बाश, पण पुढे-मागे हे त्याचं सुख जाईल कदाचित.
का हो?

आता प्लास्टिक बंदी पक्‍की स्ट्रिक करणार आहे सरकार.
असं नुसतं म्हणतात मधूनमधून.
नाही हो. आता गळ्याशी आलंय. दिवसाला पंचवीस हजार टन प्लास्टिक कचरा गोळा होतो आपल्या एका देशात! त्यातला तब्बल 40 टक्के अमर आहे.
अमर म्हणजे?

म्हणजे कशात विरघळत नाही, असा हो! ऑपरेशन करण्याशिवाय गत्यंतर नाही असा भयंकर आजार आहे हा.
गेल्या ऑगस्टपासून चाललंय ना हे सरकारी बंदीचं?
हो! पण, आतापर्यंत फार कडक भूमिका नव्हती घेतली शासनाने. आता प्लास्टिक आपलं पाणी डोक्यावरून चाललं!
इतर राज्यांमध्ये पण असंच चाललंय का?

अहो आबुराव, तब्बल 20 राज्यांनी ही बंदी घातली होती; पण कार्यवाहीत सगळे थोडेफार ढिलेच पडले. त्यातल्या त्यात सिक्कीममध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये थोडा आळा बसला म्हणतात; पण आता रोग गंभीर वळणावर आलाय.
कितपत गंभीर?
गळ्याशीच म्हणा ना! ड्रेनेजं तुंबलीयेत, नद्या गुदमरल्या आहेत, गाईगुरांच्या पोटात किलोवारी प्लास्टिक पिशव्या सापडताहेत, माणसांमधलं कॅन्सरचं प्रमाण प्लास्टिकच्या संपर्काने वाढलंय. साधं आठवून बघा. आपण बाहेर गरम चहा कशातून पितो?
प्लास्टिक कपातून.
थंड आईस्क्रीम कशातून खातो?
प्लास्टिक कपातूनच की!
बघा. पोरं कसल्या फुग्यांशी खेळतात?
रबरात प्लास्टिक मिसळलेल्या.

असं सर्वसंचारी प्लास्टिक थांबवायचं कसं?
आहे खरा समश्येचा प्रॉब्लेम.
म्हणून तर पर्यावरणमंत्री भूपेन्द्र यादव इरेला पेटल्येत.
काय म्हणताहेत ते?

त्यांनी थेट प्लास्टिक बनवणार्‍या उद्योगांनाच साकडं घातलंय. 'प्लास्टिकचा सुरक्षित पर्याय तुम्हीच शोधा. एरव्ही आम्ही तुम्हाला 120 मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिक बनवू देणार नाही.
असे कितीसे लोक असणार आहेत प्लास्टिक उद्योगात?
अहो, आताच नोंदणीकृत 22 हजार प्लास्टिक बनवणारे कारखाने आहेत देशात. आहात कुठे?

मग बरोबर आहे. असल्या कॅन्सरवर म्हणजे शस्त्रक्रियाच करायला हवी.
ती होईल तेव्हा होवो. आपण तरी आतापासूनच जमेल तितकं पथ्य पाळायला लागूया. शक्य तिथे प्लास्टिकविरहित कप, चमचे, खोके, पिशव्या यांचा आग्रह धरूया! कसं?

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news