प्रासंगिक : ज्ञानाचे उपयोजन गरजेचे

प्रासंगिक : ज्ञानाचे उपयोजन गरजेचे
Published on
Updated on

कोरोनाकाळात शाळा बंदच असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू करावे लागले. त्यातून स्वयंअध्ययावरही जोर दिला जात आहे. इंटरनेट, ऑनलाईन जगात मोठ्या प्रमाणात महिती उपलब्ध असते, पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. शिवाय ज्ञानाचे उपयोजन म्हणजेच वापरही महत्त्वाचा असतो. तेच स्वयंअध्ययन आहे.

स्वयंअध्ययन म्हणजे स्वतः एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे. ऑनलाईन शिक्षणामध्ये स्वयंअध्ययन, स्वयंशिक्षण जवळचे झाले. प्राथमिक शिक्षणामध्ये पाठ्यपुस्तकात काही धडे स्वयंअध्ययनास दिलेले असतात. त्याचा अर्थ असा नाही की तो केवळ विद्यार्थ्यांनी स्वतः शिकावा. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक वातावरण निर्मिती, प्रेरणा देणे, अध्ययन स्रोत पुरविणे ही शिक्षकांची जबाबदारी राहत होती. समोरासमोरच्या शिक्षणात ते शक्य होते. कोरोनादरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरू झाले व यास कुठेतरी अडथळा आला.

ऑनलाईन स्वयंअध्ययन असो वा स्वयंशिक्षण, यात शिक्षक व पालकांची जबाबदारी वाढली हे विसरून चालणार नाही! येथे विद्यार्थी स्वतः शिकणार असला तरी त्याला आवश्यक साहित्य, वातावरण, स्रोत व प्रेरणा देण्याचे काम त्यांचे झाले. ऑनलाईन खूप सारी माहिती मिळते. ती केवळ माहितीच आहे ते ज्ञान नाही. जेव्हा या माहितीवर प्रक्रिया करणार, तेव्हा ती माहिती ज्ञानात रूपांतरित होणार नसेल तर ती केवळ माहितीच राहते. म्हणून मार्गदर्शन गरजेचे. दुसरी बाब म्हणजे स्वयंअध्ययनाद्वारे सर्वच संकल्पना, आशय विद्यार्थी स्वतःच शिकणार, समजणार असे नाही. काहींना त्या योग्यरीत्या समजतीलही तर काहींना चुकीच्या मार्गाने. अर्थात, चुकीच्या मार्गानेही संकल्पनांचे ज्ञान होणार. एकवेळचे चुकीचे ज्ञान पुढील शिक्षणास बाधक होते. तसे होऊ नये म्हणून शिक्षक मार्गदर्शन महत्त्वाचे. घरी पालकांनी (शक्य असल्यास) त्यावर उजळणी घ्यावी.

स्वयंअध्ययनात जे समोर आहे तेच खरे, वास्तव, सत्य मानण्याची वृत्ती वाढते. ती माहिती मला कितपत पटेल, रुचेल, लागू पडेल याऐवजी, आहे तेच खरे मानून स्वीकार होतो. येथे सर्जनशीलतेला, सृजनशिलतेला अटकाव होतो. स्वयंअध्ययनाचा हेतू तोपर्यंत यशस्वी होणार नाही, जोपर्यंत समोर दिसणारे तपासून पाहिले जात नाही, निवड केली जात नाही, वापर करता येत नाही. तसे नसेल तर ते केवळ पाट्या टाकल्यासारखे होईल. येथे विश्वसनीय स्रोत पुरविणे गरजेचे आहे. काय, कुठून, कसे मिळवायचे हे वाटते तितके सोपे नाही.

आंतरजालाच्या जगात खूप कमी माहिती आपणास लागू होणारी असते. कारण, प्रत्येकाने ती आपल्या संदर्भाने, अनुभवाने दिलेली असते. ते तथ्य, संदर्भ पडताळावे लागतात, त्याची विश्वसनीयता तपासून पाहावी लागते. भरपूर माहितीच्या साठ्यापेक्षा थोड्या माहितीवर प्रक्रियाधिष्ठित ज्ञान फायद्याचे असते. येथे पालक मिळेल तशी मदत करू शकतील. सर्वात महत्त्वाचे प्रश्न पडावे लागतात. विद्यार्थ्यांना प्रश्न पडत नसतील तर हुशार शिक्षक असे प्रश्नस्वतःहून विद्यार्थ्यांमध्ये पेरतात. स्वतःच एखादा प्रश्न उपस्थित करून त्याचे उत्तर काय असू शकेल, यावर विद्यार्थ्यांना विचार करायला सांगतात.

प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या शंका वर्गात, घरात, शिक्षक-पालकांना विचारता येण्यासारखे वातावरण निर्माण केले पाहिजे. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेणे, पाठपुरावा करणे ही पद्धत विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी लागते. लहान मुले मुळातच जिज्ञासू असतात. त्यांच्यातील या वृत्तीला पोसले पाहिजे. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याची आवड निर्माण केली पाहिजे. त्याची सवय लावली गेली पाहिजे. मधूनच तो प्रश्न सोडून देऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, तसे मार्गदर्शन करणे गरजेचे असते.

मुळातच समोरासमोरच्या शिक्षणात जो भावनिक बंध होता तो ऑनलाईनही ठेवावयाचा असेल तर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच माहिती, ज्ञान, आकलन, त्याचा वापर, समस्या सोडवणे, सृजनशीलता या बाबी परत एकदा शिकवाव्या लागतील. ज्ञानाचे कण एकत्र नसतात. त्यांना एकत्रित आणण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. माहितीस जेव्हा काय? का? कसे? कोठे? कधी? कोणी? या प्रश्नार्थक शब्दांची जोड दिली जाते, तेव्हा ते ज्ञान होते.

पण, इथेपर्यंतच न थांबता त्या ज्ञानाचा उपयोग झाला तर स्वयंअध्ययन झाले म्हणता येईल. नसेल तर केवळ ज्ञानाचा साठाच म्हणावा. म्हणूनच अनुभवाधारित ज्ञान, आकलन व प्रात्यक्षिक गरजेचे आहे. शक्य असल्यास आसपासच्या परिसरातून स्वकाळजी घेऊन ज्ञान व अनुभव घेता येईल. तरी सर्वच अनुभव आपण घेऊ शकत नाही म्हणून पडताळणी गरजेची असते. शिकण्यासाठी प्रेरणा गरजेची असते. ती येथे शिक्षक व पालकांनी देण्यासोबत मुलांनी स्वतः निर्माण करणेही हिताचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news