

क्रांतिकारक, परिवर्तनवादी व समाजवादी चळवळीचे प्रणेते नागनाथअण्णा नायकवडी यांची आज जयंती. त्यांच्या जन्मशताब्दी
निमित्ताने …
महाराष्ट्राला तीन अण्णा माहीत आहेत. एक कर्मवीर भाऊराव अण्णा, दुसरे क्रांतिसिंह नाना पाटील ऊर्फ अण्णा आणि तिसरे क्रांतिवीर
नागनाथअण्णा नायकवडी. बॅ. पी. जी. पाटील यांनी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांना प्रखर देशभक्तीची मशाल म्हटले आहे. म्हणून त्यांचे एक चरित्रकार जयवंत अहिर म्हणतात, 'क्रांतिवीर अण्णांनी इतिहास वाचला होता की नाही माहीत नाही; पण त्यांनी इतिहास घडविला.' महाराष्ट्राचे अग्रणी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात, 'नागनाथअण्णा निर्भयपणे आपण निवडलेल्या वाटेवर चालत राहिले.' नागनाथअण्णा निरंतर योद्धा होते. ते सांगत 'आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी दुसर्याला द्या; पण संघर्षाला तयार राहा.' क्रांतिवीर अण्णांना 'वाळव्याचा वाघ' म्हणत असत. वाळवा हा पुरोगामी संघर्षाचा बालेकिल्ला आणि स्वातंत्र्य लढा, दलित, शोषितांच्या लढ्यांचे आगर होता. वाळव्याचे मूळ नाव 'वाल्मिकी.' कारण तिथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता. अण्णांचे मूळ घराणे औरंगाबाद जिल्ह्यातील मुंगी पैठण गावचे. पुरोगामीपणा त्यांच्या नसानसात भरलेला होता. त्यांचे मित्रमंडळ मागास वर्गातील गोरगरिबांचे होते. एकदा त्यांचे मित्र किर्लोस्करवाडीचे एम. डी. गुणेसाहेब यांच्या आईने त्यांना व्रताच्या उद्यापनासाठी पाच ब्राह्मण आणायला सांगितले. अण्णांनी त्यांचे महार, मांग, ढोर, चांभार, रामोशी या जातीचे मित्र ब्राह्मण म्हणून आणले होते. असे कृतिशील क्रांतिकारक होते अण्णा. 8 ऑगस्टच्या मुंबईतल्या काँग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी दिलेला 'करेंगे या मरेंगे' हा संदेश त्यांनी आपल्या रक्तात भिनवला. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आदर्श होते. या महापुरुषांसह कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा कृतिशील वारसा अण्णांनी अखंड जपला. क्रांतिअग्रणी जी. डी. लाड बापू हे त्यांचे जीवलग मित्र. ते दोघे म्हणजे संताजी-धनाजीची जोडीच होती. नागनाथअण्णांनी इस्लामपुरातील मोर्चात भाग घेतला; पण 10 हजारांच्या जमावावर डी. एस. पी. मेटस्ने जेव्हा गोळीबार केला तेव्हा उमाशंकर पंड्या आणि शंकर बारपटे बळी पडले. अण्णांनी विचार केला की, जर चार पोलिसांच्या बंदुकांसमोर 10 हजारांचा जमाव पांगत असेल, तर निःशस्त्र लढा उपयोगाचा नाही. त्यामुळे ते सशस्त्र क्रांतीकडे वळाले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातले क्रांतीपर्व सुरू झाले. सशस्त्र लढ्यासाठी पैशांची गरज होती. प्रारंभी त्यांनी कसबे सांगावच्यापोलिस ठाण्यातील तीन बंदुका लुटल्या; पण या फुटकळ शस्त्रावर भागणार नाही म्हणून त्यांनी आणि त्यांच्या
19 क्रांतिकारक सहकार्यांनी 7 जून 1943 रोजी मच्छिंद्रनाथ डोंगरांच्या खिंडीतल्या टेकडीच्या खोलगट भागात ब्रिटिशांची स्पेशल रेल्वे लुटली. त्यात त्यांना 19 हजार 716 रुपयांची लूट मिळाली. त्यानंतर मोठ्या हिकमतीने त्यांनी साडेपाच लाख रुपयांचा धुळ्याचा खजिना लुटला. थाबड्याच्या जंगलात 30 महिला आणि 500 तरुणांच्या शस्त्रास्त्रांच्या सरावासाठी सराव शिबिर चालविले. यासाठीची शस्त्रे गोव्यातून नियमित मिळण्यासाठी त्यांनी कायमची पुरवठा साखळी निर्माण केली. वाळवा हा त्यांचा अभेद्य बालेकिल्ला. त्यांचेही सवंगडी येसाजी, तानाजी, संताजी, बाजीसारखे बलदंड होते. किसन, 8-9 लिटर दूध एका दमात संपवणारे पैलवान खंडू शेळके, नारायण कदम, रामचंद्र अहिर, तुकाराम नाना खोत 'वस्ताद' ही माणसे रेड्याच्या ताकदीची. रेड्याचे शिंग धरून आपल्या ताकदीने त्याला गुडघे टेकायला लावणारी ही माणसे. सोनवड्याला तर अण्णांच्या या सेनेने समोरासमोर ब्रिटिश पोलिस आणि लष्कराशी लढत दिली. यात त्यांना नानकसिंग आणि किसन अहिर या सहकार्यांना गमवावे लागले. याबद्दल त्यांनी फितुरांना सजा दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी जसा सहकार वाढविला तसाच विस्थापित, धरणग्रस्त, कोरडवाहू शेतजमिनींच्या पाण्यासाठी लढे चालविले. वाळवा हे केवळ त्यांच्यामुळे सहकार चळवळीचे आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे आगर बनले. दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त, विस्थापित यांचा आधारवड म्हणजे नागनाथअण्णा. अनेक सामाजिक प्रश्नांना हात घालत, प्रसंगी लढा उभारून त्यांनी त्या प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांनी सहकारी साखर कारखाना वाळव्यात उभारला. हुतात्मा शिक्षण आणि उद्योग संकुलाचे ते संस्थापक होते. शाळा, कॉलेज सुरू केले आणि या संस्थांना सर्व नावे आपल्या क्रांतिकारक सहकार्यांची दिली. उदा. हुतात्मा किसन अहिर विद्यालय, हुतात्मा नानकसिंग विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय. त्यांच्या साखर कारखान्याचे नावही हुतात्मा साखर कारखाना. ते स्वतः कधीही, कुठल्याही संस्थेचे अध्यक्ष झाले नाहीत. अण्णांना त्यांच्या आयुष्यातील या प्रवासात माता लक्ष्मीबाई, पत्नी कुसुमताई यांची मोलाची साथ लाभली. दुष्काळग्रस्त जनतेला पाणी मिळावे, यासाठी अण्णांनी अखंड पाणी संघर्ष परिषदा घेतल्या. त्यांच्या प्रयत्नातूनच सरकारला कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करणे भाग पडले. त्याद्वारे टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांतून सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील जनतेपर्यंत पाणी पोहोचले. नागनाथअण्णा आमदारही झाले. त्यांना शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या असामान्य कर्तबगारी आणि समाजसेवेसाठी डॉक्टरेट पदवी प्रदान केली. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. स्वातंत्र्याचा खरा लाभ दीन-दलित, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, धरणग्रस्त अशा उपेक्षित, वंचित, शोषित वर्गाला मिळावा, यासाठी त्यांनी अखंड संघर्ष केला.
– विश्वास सायनाकर
माजी प्राचार्य, इस्लामपूर