पावसाची आनंदवार्ता

पावसाची आनंदवार्ता

देशातील शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाने गेल्यावर्षी प्रचंड नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे यंदा होणार्‍या पावसाबद्दल शेतकर्‍यांबरोबर सर्वांच्याच मोठ्या आशा आहेत. देशाच्या जीडीपीचा आलेख ठरवणारा पाऊस यंदा कसा असेल? देशभर त्याचे वास्तव्य कसे राहील? या प्रश्नांच्या उत्तराची दिलासादायक सरासरी कुंडली हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मांडली. विभागाने वर्तवलेला मान्सूनचा पहिलाच अंदाज देशवासीयांचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला आहे. हवामान बदलामुळे सगळे ऋतूचक्र बदलून गेले असून, कधी अतिवृष्टीने होणारा विध्वंस आणि कधी होरपळून टाकणार्‍या दुष्काळाचे संकट आणि त्याचा अंदाज बांधणेही कठीण. ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव किंवा ऐन हिवाळ्यात कोसळणारा पाऊस, किमान आणि कमाल तापमानातील वाढत चाललेले अंतर याचा शेतीवर होणारा मोठा परिणाम. साहजिकच, शेतीच्या उत्पादनातल्या चढ-उतारांनी बाजारपेठा अस्थिर होतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याचा वर्तवलेला अंदाज, ही त्यामुळेच प्राप्त परिस्थितीमध्ये दिलासादायक बातमी. हंगामातील एकूण पाऊसमानाबद्दलचा हा दीर्घकालीन अंदाज असल्याने तो अधिक महत्त्वाचा. महाराष्ट्राच्या द़ृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 'आयएमडी'चा पुढचा सुधारित अंदाज मे महिन्याच्या अखेरीस येईल, त्यानंतर पावसासंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल. सध्याचा अंदाज एप्रिलच्या प्रारंभीच्या वातावरणातील स्थितीच्या आधारे देण्यात आला आहे.

गेल्यावर्षी मार्च ते एप्रिल महिन्यांच्या दरम्यान प्रचंड उष्म्याने देशवासीयांना होरपळून काढले. सव्वाशे वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक उष्णतेची लाट देशाने अनुभवली. काही भागांमध्ये पन्नास अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला. त्याचा गव्हाच्या पिकावर मोठा परिणाम झाला आणि उत्पादन घटले. रब्बी हंगामात गव्हाचे एकूण उत्पादन अकरा कोटी टन झाले, जे 2021 च्या तुलनेमध्ये 38 लाख टनांनी कमी होते. उष्णतेच्या लाटेमुळे उत्तर भारतात गव्हाचे 10 ते 35 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. त्याशिवाय आंबा, द्राक्षे, वांगी, टोमॅटो आदींच्या उत्पादनावरही परिणाम झाला. 2019-20 मध्ये देशात दोन कोटी टन आंब्याचे उत्पादन झाले होते आणि 50 हजार टन आंब्याची निर्यात झाली होती, ही निर्यात 2021-22 मध्ये जवळपास निम्म्यावर आली. रब्बीनंतर खरिपाच्या काळातही पावसाने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले. उशिरा दाखल झालेला आणि तुलनेने कमी पडलेल्या पावसामुळे खरिपाच्या हंगामालाही मोठा फटका बसला. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या 91 जिल्ह्यांतील 700 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातही लहरी हवामानाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले. या सगळ्या परिस्थितीची उजळणी करण्याचे कारण म्हणजे गेल्यावर्षीही हवामानशास्त्र विभागाने सरासरीएवढा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तरीसुद्धा हवामान बदलाचे जे गंभीर परिणाम होत आहेत, ते सगळ्यांचेच अंदाज चुकवणारे ठरतात. गेल्यावर्षी उष्णतेच्या लाटेने दिलेला भीषण तडाखा हा त्याचाच परिणाम होता. या बदलाची झलक देशाने अनेक भागात अनुभवली आहे. त्याने शेतकर्‍याचे कंबरडे मोडलेच, विकास प्रक्रियेतही अडथळे आणले. जीडीपीचा चढ-उतार आणि कोलमडलेले अंदाज हा त्याचाच परिणाम!

हवामान खात्याचा अंदाज हा अखेरीस अंदाजच असतो. निसर्गावर कधीच कुणाला हुकूमत गाजवता येत नाही आणि तो कधीच कुणाच्या नियंत्रणात येत नसल्यामुळे पूर्वानुभव आणि काही शास्त्रीय परिमाणांच्या आधारे अंदाज बांधण्यापलीकडे काही करता येत नाही. त्यासाठी अलीकडे अत्याधुनिक प्रारूपे तयार करण्यात आली आहेत. त्यात वार्‍याची दिशा, अवकाश, समुद्राची स्थिती आदी बाबींचा सातत्याने अभ्यास केला जातो. हंगामाच्या कालावधीत ही स्थिती कशी राहील, याचा अंदाज प्रारूपांच्या आधारे मांडला जातो आणि त्यावरून त्या काळातील हवामानाची आणि पावसाची भाकिते केली जातात. अर्थात त्याही पलीकडे हवामान खात्याला आपल्या या मर्यादांची जाणीव असतेच. हवामान खात्याचे अंदाज हे बहुतांश चुकण्यासाठीच असल्याची धारणा सामान्य लोकांमध्ये बळावत चालली आहे. तरीसुद्धा दरवर्षी शेतकर्‍यांसह इतर बरेच घटक पावसाच्या अंदाजाची वाट पाहत असतात. पावसाने दिलेली ओढ किंवा अतिवृष्टी या दोन्ही गोष्टी नुकसानकारक असतात. परंतु, वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, कसाही पडला तरी पाऊस भरपूर पडण्याची गरज असते. त्यामुळे जमिनीखालील पाण्याचे स्रोत भरतात आणि त्याचा दीर्घकाळ उपयोग होऊ शकतो. एखादा आठवडा महापुराने हाहाकार उडवला तरीसुद्धा भीषण दुष्काळापेक्षा ते कधीही चांगले, हे वैज्ञानिकांचे म्हणणे लक्षात घ्यायला हवे. पावसाचा हा अंदाज शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा तसाच सरकारला नियोजनासाठी त्याची गरज ही आनंदवार्ता समृद्धीची आस बाळगून असलेल्या सगळ्यांसाठीच आनंददायक. शेतीच्या पलीकडे महत्त्वाचा असतो तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. मुबलक पाऊस पडला, तर तोही सुटू शकतो; अन्यथा लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सरकारी यंत्रणेला आपली शक्ती पाणीपुरवठ्यासाठी लावावी लागते.

उद्योगांसाठीही पाणीटंचाई निर्माण होऊन औद्योगिक उत्पादनांवरही त्याचा परिणाम होऊ शकत असतो. पावसाच्या अंदाजाचे आणखी एक लक्षण लक्षात घ्यावे लागते, ते म्हणजे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीएवढा पाऊस पडेल, असे सांगितले जाते. परंतु, तो कधी कमी-जास्त पडेल हे सांगता येत नाही. सरासरीएवढा किंवा पुरेसा पाऊस होणे महत्त्वाचे असतेच, परंतु तो शिस्तशीर आणि शेतीसाठीच्या आवश्यकतेनुसार दमादमाने पडावा लागतो. त्याचा अंदाज अनेकदा हवामान विभागाला येत नाही. पावसात मोठे खंड पडण्याच्या शक्यतेबरोबरच अचानक आणि तीव्र पावसाची शक्यताही असते. त्यामुळे पिके धोक्यात येऊ शकतात. कधी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होऊ शकते, महापुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो. अशा सगळ्या नकारात्मक शक्यता गृहीत धरूनही यंदाचा पावसाचा अंदाज शेतकर्‍यांची मने प्रफुल्लित करणारा ठरला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news