मित्रा, मला एक सांग, आपल्या राज्यामध्ये जे राजकारण चालतं म्हणजे वेगवेगळे पक्ष, आघाडी, युती आणि शिवाय अपक्ष नावाचा एक अफलातून प्रकार, तर साधारणतः आपल्या राज्यामध्ये किती पक्ष असतील ज्यांची अधिकृत नोंदणी आहे? आणि समजा मला असं वाटलं की मी, माझी बायको, माझी मुलं यांचा मिळून एक पक्ष स्थापन करायचा तर करता येईल का?
सहज करता येईल. आपल्या राज्यामध्ये पक्ष नोंदणी इतकी सोपी आहे की, दीडशे लोकांची नावं तू द्यायची. म्हणजे समजा तुझ्या सोसायटीमध्ये 200 लोक राहतात, त्यातली 150 लोकांची नावं द्यायची. त्यांचे आधार कार्ड द्यायचे आणि पक्षाला एक नाव द्यायचे, एक चिन्ह मिळवायचे. म्हणजे काय, आपणच तयार करायचे. कप-बशी, पतंग, खुर्ची, पंखा, टेबल किंवा काही पण असे चिन्ह घ्यायचे आणि पक्षाची नोंदणी करायची. ही नोंदणी करण्यासाठी मात्र दहा हजार रुपयांचा एक डिमांड ड्राफ्ट निवडणूक आयोगाच्या नावाने काढायचा की झाला पक्ष तयार. त्यामुळे आजघडीला राज्यामध्ये तब्बल 368 पक्ष आहेत ज्यांची निवडणूक आयोगाकडे नोंदणी आहे.
तू म्हणतोस त्याप्रमाणे पक्ष तर स्थापन झाला; पण मग पुढे काय करायचं?
पुढे काही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिकांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका आल्या की, आपल्या पक्षाचं तिकीट विकायचं. जेवढा पक्ष भारी तेवढी त्याच्या तिकिटाची किंमत जास्त असते. म्हणजे अगदी पन्नास हजार रुपयांपासून ते दहा लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त.
अच्छा म्हणजे पक्ष तिकीट विकण्यासाठी काढायचा?
नाही तसं नाही. त्याची काही तरी घटना असावी लागते, अध्यक्ष असावा लागतो, कार्यकारिणी असावी लागते म्हणजे मग त्याला पक्ष म्हणून नाव मिळते आणि मग आपोआप कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात होते.
म्हणजे समजा साडेतीनशे पक्षांचे उमेदवार, जर उभे राहिले तर काय होईल? उदाहरण घेऊयात. जवळ आलेल्या महानगरपालिका निवडणुकीत माझ्या वार्डातून साडेतीनशे पक्षांचे साडेतीनशे उमेदवार उभे आहेत, तर मला किमान महिनाभर आधी कोणाला मतदान करायचे, याचा अभ्यास करावा लागेल. निवड करायची म्हणजे सोपे काम नाही. शिवाय मग ते जनतेची कामे करतील का? भ—ष्टाचार करतील का? आणि इतर प्रश्नही आलेच.
मला असे वाटते की, पक्ष नोंदणी करण्यासाठी किमान 1 हजार कार्यकर्ते तरी पाठीशी असावेत, असा काहीतरी निकष असला पाहिजे. कोणीही दीडशे लोकांची नावे देऊन पक्ष स्थापन करू शकत असेल, तर राजकारणाचा बट्ट्याबोळ ठरलेलाच आहे.
तो तर असाही होणार आहे आणि तसाही होणार आहे. कारण, ज्यांना कोणत्याच पक्षाचे तिकीट नको आहे आणि नंतर घोडेबाजार करून पैसे कमवण्यात इंटरेस्ट आहे असे लोक अपक्ष म्हणून उभे राहतात. म्हणजे ज्याचा कोणताही पक्ष नाही तो अपक्ष. करामती करून अपक्ष निवडून आला, तर त्याची आयुष्यभराची चांदी होते. म्हणजे काय होते की, सत्ताधारी होण्याची इच्छा असलेल्या दोन्ही पार्ट्या त्याला अनेक आमिषे दाखवतात, पैसे दाखवतात सहलीला नेतात, सहलीला जाऊन अविश्वास ठरावावर मतदान करण्यासाठी सभागृहात असे अपक्ष प्रकट होतात. त्यामुळे साडेतीनशे पक्षांच्या नादी न लागता अपक्ष म्हणून उभे राहिलेले कधीही फायद्यात राहील, असे वाटते.
– झटका