ध्वनिशोध अहवाल

ध्वनिशोध अहवाल
Published on
Updated on

विधानसभा अध्यक्ष,
सविनय सादर,

पर्यावरणीयप्रेमी मंत्री, नेते, युवा नेते मा. आदित्यजी ठाकरे यांची नाहक कळ काढण्याचा उद्योग आमदार नितेश राणे यांनी केला. विधान भवन परिसरातून आदित्यजी जात असताना हे कोकणचे युवा नेते 'म्यॉव म्यॉव' असं म्हणाले. या कृत्यामागं त्यांचा नेमका काय हेतू होता, याविषयी मतमतांतरे आहेत. नितेशजी भाजपचे आमदार आहेत.

त्यांच्याच पक्षाच्या गोतावळ्यात असताना त्यांनी हे 'म्यॉव म्यॉव' केले. त्यांनी हे स्वयंस्फूर्तीने केले की, त्यांना फूस लावणारे कोणी होते, याचा शोध आम्ही घेतला. त्यांचे पिताश्री आणि केंद्रीय लघू उद्योगमंत्री नारायणजी राणेसाहेब यांच्या शब्दाबाहेर नितेशजी कधी जात नसतात; पण पिताश्रींच्या आदेशाने किंवा सल्ल्याने त्यांनी हे कृत्य केले नव्हते, असे खात्रीलायकरीत्या समजते.

कदाचित भाजपमधीलच कुणीतरी असावे, असे वाटून आम्ही आशिष शेलार यांना खोदून खोदून विचारले; पण त्यांनी याचा ठामपणाने इन्कार केला. खुद्द शिवसेनेतच खूप असंतुष्ट आहेत. राणे पिता-पुत्र शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये अनेक वर्षे होते. त्यामुळे त्यांच्यातीलही कुणी असू शकतो का, असे विचारले असता शेलार यांनी 'हम्म' असा दीर्घध्वनी काढला. म्हणजे काय, हे समजले नाही.

नितेशजी यांच्या जवळपास असणार्‍यांच्या मतानुसार हे कृत्य स्वयंस्फूर्तीने केले गेले होते. 'डरकाळी फोडणार्‍या सेनेच्या वाघाचे 'म्यॉव म्यॉव' मांजर झाले', असे त्यांना या कृतीतून सुचवायचे होते. हेतू काही असला, तरी हे कृत्य गैरच होते. त्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी समज दिली आहेच. त्यामुळे या विषयावर आपण पडदा टाकावा आणि वाघ हा मार्जारकुलातीलच प्राणी मानला जातो, हे सत्य मानावे.

या निमित्ताने विधिमंडळात कोणकोणत्या प्रकारचे ध्वनी काढले जातात, याची माहिती घेतली असता आश्चर्यजनक गोष्टी निदर्शनाला आल्या. नित्याच्या ध्वनीपेक्षा काही वेगळे ध्वनी लोकप्रतिनिधींनी आमच्या निदर्शनाला आणून दिले. काही लोकप्रतिनिधींना सभागृह हे निद्राधीन होण्याचे ठिकाण वाटते. ते सभागृहात येतात आणि थोड्याच वेळात मागे बसून घोरू लागतात. हे गृहस्थ रात्री काय करतात, कुठे जातात याचा शोध घेण्याची गरज आहे.

घोरण्यासारखे 'डारडूर, घुरघुर, पारपूर, ख्यॉक ख्यॉक' असे अनेक प्रकारचे ध्वनी निर्माण करणारे लोकप्रतिनिधी आहेत. एक सदस्य सतत कराकरा दात खातात. एक नाकात किंवा कानात बोटे घालून आवाज काढतात. एक कडाकडा हाडे मोडत असतात. काही सूक्ष्म, लघू आणि उच्च प्रतीचे ध्वनी काढतात.

काही ध्वनी दुर्गंधीयुक्त असतात अशीही तक्रार आहे. मनुष्य हा प्रगत रूपातला पण मूळचा प्राणीच आहे. त्याला पुरावा ठरेल, असे वर्तन लोकप्रतिनिधी करताना आढळून आले आहेत. काही लोकप्रतिनिधींच्या मागून जाणे धोक्याचे समजले जाते. ते कधी दोन पाय झाडून लाथ मारतील, याचा भरवसा नसतो. अनेक लोकप्रतिनिधी श्वानपुच्छ असल्याप्रमाणे वावरताना आढळून आले. सुदैवाने ते गर्दभध्वनी किंवा भुंकणे यासारखे प्रकार करताना मात्र आढळून आले नाहीत; पण जांभई देताना ध्वनी काढणारे अनेक लोकप्रतिनिधी आढळून आले. प्रस्तुत अहवाल पुरुष लोकप्रतिनिधींपुरता मर्यादित आहे.

आमदार,
स्वयंघोषित ध्वनिशोध समिती

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news