थोर समाजवादी नेता

पत्नीचा अधिकार
पत्नीचा अधिकार

मुलायमसिंह यादव यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणातील सोशल इंजिनिअरिंगचा प्रणेता, थोर समाजवादी नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. एका छोट्याशा गावात कुस्तीचे डावपेच शिकता शिकता राजकीय डावपेच आत्मसात करून उत्तर प्रदेशसारख्या देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे तीनवेळा मुख्यमंत्री बनण्याची किमया मुलायमसिंह यांनी साधली होती. त्याचवेळी देशाच्या राजकारणावरही त्यांनी दीर्घकाळ प्रभाव ठेवला. राममनोहर लोहिया यांच्या ज्या दोन शिष्यांनी देशाच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि आपला ठसा उमटवला, त्यापैकी एक लालूप्रसाद यादव आणि दुसरे मुलायमसिंह. लोहिया आजन्म विरोधी पक्षात राहिले आणि काँग्रेसविरोध हा त्यांच्या राजकारणाचा पाया राहिला. देशात जेव्हा पंडित नेहरू आणि काँग्रेसच्या पलीकडचे राजकारण दिसतच नव्हते, त्या काळात लोहियांनी देशभरात विरोधी पक्ष उभा केला. साठच्या दशकात लोहियांचे राजकारण ऐन भरात होते आणि 1967 साली नऊ राज्यांत बिगर काँग्रेस सरकारे सत्तेवर आली, त्यावेळी मुलायमसिंह पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. तेव्हापासून म्हणजे साडेपाच दशके मुलायमसिंह भारतीय राजकारणात सक्रिय राहिले. गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये प्रकृतीच्या कारणामुळे ते सक्रिय राजकारणात फारसे कार्यरत नसले तरी सगळ्याच राजकीय पक्षांना त्यांची वेळोवेळी दखल घ्यावी लागली. लोहियांचे पट्टशिष्य म्हणवून घेताना त्यांनी त्यांच्या मार्गाचे अंधानुकरण केले नाही. बाबरी मशिदीच्या घटनेनंतर देशाच्या राजकारणाचे चित्र बदलून गेले आणि काँग्रेसची जागा भारतीय जनता पक्षाने घेतली. अशावेळी मुलायमसिंह यांनी आपल्या गुरूचा मार्ग शब्दशः न अनुसरता त्याचा आशय घेतला आणि ते भारतीय जनता पक्षाच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाच्या विरोधात उभे राहिले. लोहियांच्या विचारांशी प्रतारणा केल्याची टीका त्यांच्यावर झाली; परंतु त्याची पर्वा न करता ते देशातील धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट आणि मजबुतीकरणासाठी प्रयत्नशील राहिले. साडेपाच दशकांत दीर्घकाळ राजकारण करणार्‍या मुलायमसिंहांनी आपली निर्णायक खेळी दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2012 मध्ये केली होती. सक्रिय राजकारणातील अखेरची लढाई जिंकताना त्यांनी समाजवादी पक्षाला स्वबळावर उत्तर प्रदेशच्या सत्तेत आणले आणि आपले पुत्र अखिलेश यादव यांच्या हाती सत्ता सोपवली. नव्या पिढीकडे सत्ता सोपवून खरेतर त्यांनी निवृत्तीचा मार्गच पत्करला होता; परंतु त्यांच्यासारख्या नेत्याला राजकारणात कधी निवृत्तीची संधी मिळाली नसावी. समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहाने मुलायमसिंहांना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले होते. पुत्र अखिलेश आणि भाऊ रामगोपाल यांना पक्षातून काढून टाकल्याची घोषणा त्यांनी केली होती. अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या लढाईमध्ये अखिलेश यादव हेच निर्विवादपणे समाजवादी पक्षाचे नेते बनावेत यासाठी ती
खेळी निर्णायक ठरली.

मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष आणि कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीचे सरकार 1993मध्ये उत्तर प्रदेशात सत्तेवर आले, तो देशातील सोशल इंजिनिअरिंगचा पहिला प्रयोग होता. यादव आणि मुस्लिम मतदारांचा पाठिंबा असलेला समाजवादी पक्ष आणि दलित, ओबीसींचा पाठिंबा असलेला बहुजन समाज पक्ष ही बेरीज उत्तर प्रदेशच्या राजकारणात निर्णायक ठरली आणि बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या राजकारणातही त्यांनी उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. 1967 साली आमदार बनलेले मुलायमसिंह 1977 साली पहिल्यांदा मंत्री बनले आणि 1989 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. 1991 साली जनता दलात फूट पडली. त्यानंतर 1993 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले; परंतु मायावती यांच्याशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे हे सरकारही कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. 2003 मध्ये ते तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. मुलायमसिंहकांशीराम यांच्या आघाडीने देशात सोशल इंजिनिअरिंगच्या राजकारणाचे युग सुरू झाले. त्याचा प्रभाव आजही आहे. धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला शह देण्यात अनेक ठिकाणी हे सोशल इंजिनिअरिंग यशस्वी होत असल्याचे दिसून येते. 1996 साली अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पडल्यानंतर देशात सत्तेवर आलेल्या देवेगौडा यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणूनही मुलायमसिंह यांनी काम केले. लोकसभेतील त्यांचा सहभाग आक्रमक आणि दखलपात्र असे. नव्वदचे दशक भारतीय राजकारणासाठी आव्हानात्मक होते आणि देशाच्या लढाईचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेश हाच होता. अशा आव्हानात्मक काळात मुलायमसिंह धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाविरोधात उभे राहिले. अयोध्येत कारसेवकांवर झालेला गोळीबार ही त्यांच्या कारकिर्दीतील वादग्रस्त घटना म्हणून नोंद झाली आणि भविष्यात त्यावरून त्यांना सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले. 1999 मध्ये सोनिया गांधी सरकार बनविण्याचा दावा करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना पाठिंबा नाकारून त्यांनी घेतलेली वेगळी भूमिकाही चर्चेची ठरली. देशाच्या राजकारणात 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचा प्रभाव वाढत गेला, उत्तर प्रदेशातही मोदी यांनी वर्चस्व निर्माण केले. या काळात विरोधकांच्या राजकारणाची घसरण सुरू झाली होती, त्याचबरोबर मुलायमसिंह यांचा प्रभावही ओसरू लागला होता. प्रकृतीच्या कारणामुळे ते हळूहळू किनार्‍याकडे ढकलले जात होते आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव प्रभावी बनत होते; परंतु या काळात उत्तर प्रदेश तसेच देशाच्या राजकारणातही भारतीय जनता पक्षासमोर आव्हान उभे करण्यात त्यांना यश आले नाही. त्यांना प्रकृतीने साथ दिली असती आणि लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात अडकले नसते तर या दोन यादवांनी भाजपविरोधात आव्हान उभे केले असते. मुलायमसिंह हळूहळू संदर्भहीन होत गेले. समाजवादाची कास पकडून देशाच्या राजकारणात वादळ निर्माण करणार्‍या या नेत्याने जगाचा निरोप घेतला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news