तरुणांमधील कौशल्य विकास

तरुणांमधील कौशल्य विकास
Published on
Updated on

शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेज, परीक्षा घोकंपट्टी आणि अखेर पदवी हे चित्र पुसण्याची वेळ आली आहे.

पदवी+कौशल्य+कार्यानुभव=करिअर हे समीकरण जितक्या लवकर उमजेल तितक्या लवकर पदवीधर बेरोजगारांची समस्या सोडवली जाईल. 15 जुलै हा दिवस संयुक्त युवा कौशल्य दिवस म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त…

नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त युवा कौशल्य दिन म्हणून 15 जुलै जाहीर केला. कौशल्य हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. पण परीक्षा, गुण व पदवीच्या चक्रव्युहात अडकलेल्या विसाव्या शतकातील शिक्षणपद्धतीला अजून त्याचे महत्त्व कळलेले नाही. अनेक धुरिणांना कौशल्य म्हणजे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याची शिक्षणपद्धती असेच वाटते. हीच खरे तर शोकांतिका आहे. एकीकडे शिकलेल्या लोकांना रोजगार मिळत नाही, तर दुसरीकडे उद्योग-व्यापाराला योग्य माणसे मिळत नाहीत. हा आपल्या शिक्षणपद्धतीचा दोष आहे. शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेज, परीक्षा घोकंपट्टी आणि अखेर पदवी हे आपल्या मनावर आतापर्यंत कोरलेले चित्र पुसण्याची वेळ आली आहे. पदवी+कौशल्य+कार्यानुभव=करिअर हे एकविसाव्या शतकातले समीकरण जितक्या लवकर शिक्षणपद्धतीला उमजेल तितक्या लवकर पदवीधर बेरोजगारांची समस्या सोडवली जाईल.

आजघडीला आपला देश संक्रमणावस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत, ते पूर्णपणे दिसेनासे झालेले नाहीत. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खर्‍या अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. पैसा नव्हे तर विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे.म्हणजेच स्किल्ड मॅनपॉवर. माझ्या द़ृष्टीने आयटी या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे इंडियन टॅलेंट.

जगातला फार मोठा तरुणाईचा साठा आपल्याकडे आहे. ही फार महत्त्वाची जमेची बाजू आहे. या तरुणवर्गाला योग्य प्रशिक्षण दिले गेले की त्यांच्याकडून देशाच्या अर्थकारणात मोठे सकारात्मक बदल घडवून आणता येतीलच, शिवाय हे तरुण-तरुणी जागतिक पातळीवर काम करतील तेव्हा भरपूर पैसा कमावतील आणि त्यापैकी मोठा हिस्सा, बचतीच्या रूपाने, ते भारतातच परत पाठवतील. याने भारताचे सकल उत्पन्न म्हणजेच जीडीपी तसेच उत्पादकताही वाढेल आणि इथल्या तरुणवर्गाच्या निर्मितीक्षम मनाला संधीही उपलब्ध होतील. अर्थात, या फार मोठ्या संधीचा फायदा मिळवण्यासाठी सर्वांनाच मनोवृत्ती आणि कामाची पद्धत बदलावी लागेल.

आपल्या शिक्षणाचा र्‍हास व्हायला कारण आहे ती इंग्रजांनी लादलेली व आपण अंगीकारलेली मेकॉलेची शिक्षणपद्धती. गुगलच्या जमान्यात या पद्धतीला बिलकूल स्थान नाही. अधिक गुण म्हणजे उत्तम भविष्याची खात्री. या समीकरणाने गुणांचे कारखाने उघडले. संकल्पना समजणे मागे पडले. कौशल्य विकास कार्यानुभव (इंटर्नशिप) फक्त कागदोपत्री राहिले. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीही लवचिक आणि बदलत्या गरजा वेगाने सामावून घेणारी असायला हवी. गुण (मार्क्स) ला कमी महत्त्व देऊन मूल्यांकनाला जास्त महत्त्व द्यायला हवे. उद्योगाला सुसंगत अभ्यासक्रम विकसित करणे, तो शिकवणे हे अतिशय अवघड काम आजच्या शिक्षण पद्धतीला करावे लागत आहे. यामध्ये माजी विद्यार्थी, उद्योग, समुपदेशक, मार्गदर्शक (मेंटॉर्स) या सर्व घटकांना अंतर्भूत करावेच लागेल. कारण, हे सर्व काम शिक्षक करू शकणार नाहीत. इथेच आपल्याला व्हर्च्युअल पद्धतीचा अवलंब करावाच लागेल. नाहीतरी ही पद्धत आता आपल्या अंगवळणी पडलीच आहे.

जागतिकीकरणाचे फायदे हवे असतील तर आपल्या मुला-मुलींना जागतिक पातळीवर वापरल्या जाणार्‍या भाषा शिकवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे लागेल. आपल्याकडील युवकवर्गापर्यंत जागतिक पातळीवरच्या रोजगारांची चाहूल पोहोचली की ते इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, जपानी यांसारख्या भाषा शिकायला फक्त तयार होतील असे नव्हे तर उत्सुक बनतील. यासाठी प्रचंड प्रमाणावर शिक्षक लागतील, हे खरे आहे; परंतु नेमक्या याच ठिकाणी आपण ई-शिक्षण, आभासी शाळा (व्हर्च्युअल क्लासरूम) अशा बाबींचा वापर करू शकतो! माहिती तंत्रज्ञान-सक्षमित शिक्षणपद्धतीचा आपणास मोठा उपयोग होणार आहे. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाल्यास शिक्षणाच्या किंवा शिक्षकाच्या दर्जाबाबतची फार मोठी चिंता तर मिटेलच शिवाय शिक्षण देण्या-घेण्याच्या वेगामध्येही बदल होतील. संगणकीकृत दूरशिक्षणाला मोठी मागणी येणार आहे आणि या मार्गाने देशभरातल्या दूरदूरच्या हजारो विद्यार्थ्यांना, वाजवी किमतीत, उच्च शिक्षणाकडे वळणे शक्य होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news