

थरमन षण्मुगरत्नम
मूळ भारतीय वंशाच्या अनेकांनी जगभरातील विविध देशांतील राजकारणासह विविध क्षेत्रांत आपला दबदबा निर्माण केला आहे. राजकीय क्षेत्रात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाकसह अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासह अनेकांनी आपले स्थान निर्माण केले आहे. त्यातील एक नाव म्हणजे थरमन षण्मुगरत्नम होय. षण्मुगरत्नम यांनी नुकतीच सिंगापूर राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून, ते सिंगापूरचे 9 वे राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. त्यांना 70.4 टक्के मतदान मिळाले. त्यांनी मूळ चिनी वंशाच्या दोन विरोधांना मोठ्या फरकाने धूळ चारली. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही षण्मुगरत्नम यांचे अभिनंदन करत, त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, षण्मुगरत्नम यांच्या विजयाने भारत आणि सिंगापूर यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखीच मजबूत होतील आणि षण्मुगरत्नम यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. सिंगापूरच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मला विजयी करून माझ्याकडे मोठी जबाबदारी दिली असल्याने त्यांचे धन्यवाद मानतो, असे षण्मुगरत्नम यांनी म्हटले आहे.
मतदानानंतर थेट सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष होणारे षण्मुगरत्नम हे पहिले भारतीय आहेत, तर भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. 1981 मध्ये संसदेत निवड झाल्यानंतर देवेन नायर सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. तर एस. आर. नाथन यांनी 1999 ते 2011 पर्यंत सलग 11 वर्षे सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांची निवड बिनविरोध झाली होती. 1991 नंतर सिंगापूरमध्ये सामान्य जनतेच्या मतदानाच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाते. षण्मुगरत्नम यांनी सिंगापूरच्या सत्ताधारी पक्ष पीपल्स अॅक्शन पार्टीकडून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. षण्मुगरत्नम यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1957 रोजी सिंगापूरमध्ये झाला. त्यांचे आजोबा तामिळनाडूतून सिंगापूरमध्ये जाऊन वसले होते. षण्मुगरत्नम यांचे वडील प्रोफेसर के. षण्मुगरत्नम वैद्यकीय संशोधक होते.
त्यांना सिंगापूरमध्ये पॅथॉलॉजीचे जनक मानले जाते. केंब्रिजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेणारे षण्मुगरत्नम सिंगापूरचे रणनीतिकार राहिले आहेत. जागतिक व्यासपीठावर सिंगापूर आणि भारतासारख्या देशांची मते अगदी परखडपणे मांडण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत. आम्हीच जगभरात सर्वश्रेष्ठ आहोत, हा अंहकार अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांना सोडण्याची गरज असून, त्यांना विकसनशील देशांचे महत्त्व समजण्याची गरज असल्याचे षण्मुगरत्नम सातत्याने म्हणत असतात. षण्मुगरत्नम यांच्या पत्नी जेन इटोगी या मूळ चिनी-जपानी वंशाच्या आहेत. या दोघांची भेट के. विद्यापीठात झाली होती. या दाम्पत्याला एक मुलगी आणि तीन मुलगे आहेत. मुलगी माया वकील आहे. एक मुलगा आकाश सॉफ्टवेअर टेक कंपनी क्रायॉन डेटाचा सहसंस्थापक आहे. कृष्णा हा इकॉनॉमिक्सचा, तर अर्जुन सिंगापूर अमेरिकन स्कूलचा विद्यार्थी आहे.
– युवराज इंगवले