

चीनने गलवानमध्ये हिंसाचार करणार्या लष्करी अधिकार्याकडे मशाल सोपविण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने या स्पर्धेतून बाहेरच पडावयास हवे होते, पण भारताने स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि निषेध केला. चीनने त्यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे.
चीनने 4 फेब्रुवारीला बीजिंगमध्ये सुरू झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांना आपल्या हातानेच अपशकून केला. या स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी पाश्चात्त्य देशांनी आधीच घेतला होता. भारत-चीन यांच्यातील बिघडलेले संबंध पाहता या स्पर्धांवर भारतानेही बहिष्कार घालावा, अशी या देशांची इच्छा होती; पण भारत व चीन यांच्यातील संबंधाचे नाजूकपण लक्षात घेऊन भारताने या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला.
चीनने या ऑलिम्पिक स्पर्धांच्या संचलनात ऑलिम्पिक मशाल वाहून नेण्याची जबाबदारी गलवान खोर्यातील हिंसाचारात भाग घेणार्या चिनी लष्करी अधिकार्यावर सोपवली. हा भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार तर होताच, पण भारतीय जवानांना ठार करण्याच्या हिंसक कृत्याचे समर्थन करण्याचा प्रकार होता.
खरे तर चीनने गलवानमध्ये हिंसाचार करणार्या लष्करी अधिकार्याकडे मशाल सोपविण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने या स्पर्धेतून बाहेरच पडावयास हवे होते, पण भारताने तितके कडक पाऊल उचलण्याऐवजी स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि आपला निषेध प्रकट केला. चीनने अर्थातच आपल्या या कृत्याचे समर्थन केले आहे.
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक सोहळ्यासाठी जगभरातून मान्यवर नेते आले होते; पण हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन वगळता एकही बडा नेता उपस्थित नव्हता. त्यांच्याखेरीज सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व अन्य काही देशांचे नेते उपस्थित होते.
2008 च्या ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाचा भर चीनने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती दाखविण्यावर होता तर यावेळच्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांचे वैयक्तिक महात्म्य दाखविण्याचा प्रयत्न झाला. या समारंभाच्या निमित्ताने अध्यक्ष शी जिनपिंग यांचे दोन वर्षांनंतर प्रथमच प्रत्यक्ष दर्शन झाले. या स्पर्धांचे घोषवाक्य 'एक जग एक कुटुंब' हे होते, जे चीनच्या सध्याच्या स्थितीशी पूर्णपणे विसंगत होते.
कारण, सध्या सगळे जग चीनशी असलेले आर्थिक व व्यापारी संबंध कमी करीत आहे. अशा अवस्थेत या स्पर्धांच्या 'एक जग एक कुटुंब' या घोषणेला फारसा अर्थ राहिलेला नाही. शिवाय तैवान आणि भारताशी जो लष्करी संघर्ष चीन करीत आहे, तो या घोषणेच्या विपरीत आहे, त्यामुळे स्पर्धेतील या घोषणेला कुणीही फारसे गांभीर्याने घेत नाही. जे देश चीनच्या आर्थिक सापळ्यात सापडलेले आहेत, अशाच देशांच्या प्रतिनिधींनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली.
या स्पर्धांत तैवाननेही भाग घेतला, पण स्पर्धेसाठी प्रवेश देताना चीनने 'चिनी तैपेई' या नावाने तैवानला प्रवेश दिला. संचलनावेळी तैवानच्या पथकाला हाँगकाँगच्या पथकाच्या मागे ठेवले होते. त्यातून हाँगकाँगनंतर तैवान चीनला जोडण्यात येइल हे शी जिनपिंग यांना सुचवायचे होते. झिंगझियांग प्रांतातल्या उघीर मुस्लिंमावर चीन अत्याचार करीत आहे, हे कारण सांगत पाश्चात्त्य देशांनी या स्पर्धांवर बहिष्कार टाकला आहे, त्याला उत्तर देण्यासाठी चीनने उद्घाटन सोहळ्यात ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी जो हान चिनी पुरुष खेळाडू पाठविला, त्याच्यासोबत एक उघीर महिला खेळाडूलाही पाठवले; पण त्यामुळे उघीर नागरिकांना दुय्यम स्थान आहे, हेच सिद्ध झाले.
उद्घाटन सोहळा ज्या स्टेडियममध्ये झाला त्याची क्षमता 88 हजार प्रेक्षकांची आहे, पण कोरोना साथीमुळे फक्त 15 हजार निवडक प्रेक्षकानाच प्रवेश दिला. त्यामुळे स्टेडियम रिकामेच दिसत होते. या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा एकमेव खेळाडू आरिफ खान याने रायफल नेमबाजीत भाग घेतला आहे. हा 31 वर्षीय काश्मिरी खेळाडू आहे. त्याने एकट्याते भारताचा तिरंगा फडकवित संचलनात भाग घेतला. तो दोन ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरला. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताने अद्याप कधीही विजय प्रस्थापित केला नाही, पण आरिफ खान विजयाची आशा बाळगून आहेत.