गड्या, रोज सायकलच बरी!

गड्या, रोज सायकलच बरी!
Published on
Updated on

बाबा, आपण स्कूटर आणायला कधी जायचं?
आपण जायचंय? कोण म्हणतं?
मी म्हणतो. बाबा, माझी कॉलेज अ‍ॅडमिशन झाली म्हटल्यावर आता स्कूटर हवीच.
का? स्कूटर नसणार्‍यांना कॉलेजात घेत नाहीत?
उगाच बोअर मारू नका बाबा. स्कूटर घेऊन द्या.
देतो की, खेळण्यातली! बस तिच्याशी खेळत.
असं काय करता बाबा? मला कॉलेज, कोचिंग क्लासेस, जिम, ग्राऊंड असं खूप फिरावं लागणार यापुढे.
लागणार तर! पोरीपण फिरवाव्या लागणारच.
उगाच फाटे फोडू नका बाबा.
फाटे कशानं? आम्हीही कानफाटे झालोच होतो एका वयात. वाहनं घ्यायची ती काय दळणाचे डबे आणि गॅस सिलिंडर वाहायला? डबल सीट तयार केलेली असते ती मैत्रिणींसाठीच.
एवढं कळतंय तर चारचाकी घ्या ना पिताश्री!
सोन्या, एकवेळ वाहन खरेदीही परवडेल रे; पण रोजचा पेट्रोलचा खर्च कोण करणार?
सगळे करतात. तुम्ही करा. नाही तर एखादी पाण्यावर चालणारी स्कूटर शोधता का?
त्यापेक्षा सायकल घेतली तर?
तीनचाकी घेता का? पॉमपॉम असा आवाज काढत घेऊन जाईन कॉलेजला. सत्कार करतील तिथे माझा त्याबद्दल! किती लो बजेट आयडियाज हो तुमच्या?
हे बघ. तुझा सगळा संचार आपल्या आसपास, चार पाच किलोमीटरच्या परिसरात असणार. तेवढ्यासाठी स्कूटर, पेट्रोल, बाकी मेंटेनन्सचा खर्च हवाच कशाला? रमतगमत मित्रांबरोबर पायी जाण्यातही मजा असते.
मी उच्च शिक्षण घ्यायला जाणार आहे. तिथे वेळ वाचवणं, पुरवून वापरणं यांना काहीच महत्त्व नसेल का?
तेच सांगायचं होतं. हे बघ, आपल्याकडल्या रस्त्यांच्या, प्रचंड वाहतुकीच्या समस्येत चार-पाच किलोमीटर अंतर कापताना स्कूटर आणि सायकल यात फारसा फरक पडत नाही बरंका! येऊन-जाऊन पाच-सात मिनिटंच वाचतात म्हणे ऑटोमोबाईलमुळे.
घ्यायची नसेल स्कूटर तर तसं स्पष्ट सांगा बाबा! उगाच टेपा लावत बसू नका.
टेपा नाही रे! यंदाच्या जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष आहे हा.
अभ्यास माय फूट!
अभ्यासाची किती नावड रे तुला? पण, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटने शहराच्या गर्दीच्या रस्त्यांवर केलीये ही पाहणी. स्कूटरी ट्रॅफिकमध्ये अडकतात. सिग्‍नलला रखडतात, फटीतून बाहेर काढता येत नाहीत. यात वेळ जातो तेवढ्यात बाजूबाजूने सायकल पुढे सरकते.
टाळ्या टाळ्या!
सायकल हलकी, रोज वापरायला सोपी, इंधन, वाचवणारी या द‍ृष्टीने जगभर तिचा पुरस्कार सुरू आहे.
तो तुम्हालाच आधी दिसणार! चला, मला जायचंय. मित्राच्या नव्या स्कूटरवरून आज तो राईड देणार आहे मला. कूल ना?
येस. कूलच; मात्र सायकलही तुम्हाला वाटते तेवढी तापदायक नसते रोज वापरणार्‍याला. व्यायामापरी व्यायाम, सोयीपरी सोय!
ओ.के. आजचं प्रवचन संपलं? मी जाऊ?
जा; पण भरतवाक्य ऐकून जा. 'जवळपास जाण्यासाठी गड्या आपली सायकल बरी! शायनिंग मारता आली नाही, तरी सायकलची सोयच
खरी!'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news