कर्माचे फळ!

कर्माचे फळ!

काय दोस्ता काय म्हणतोस? काय विशेष खबर? शेजारी पाजारी बरे आहेत ना?
अरे, ते शेजारी-पाजारी सोडून दे, आपल्या शेजारी देशात काय चालले आहे ते माहित आहे काय तुला?

कोणत्या देशाचे म्हणतोयस? शेजारी देश म्हणजे श्रीलंकेची तर आधीच वाट लागली आहे. बांगला देशची बोंब आहे. चीनची अर्थव्यवस्था कधी ढासळेल सांगता येत नाही. राहता राहिला आपला जानी दुश्मन पाकिस्तान, त्याची नेमकी काय खबर आहे ते लक्षात येत नाही.

अरे, काही नाही. फक्त तीन आठवडे पुरेल एवढेच त्यांच्याकडे अर्थसहाय्य शिल्लक आहे. तीन आठवड्यांनंतर पेट्रोल मिळणार नाही, अन्नधान्याचा तुटवडा होईल, वाहतूक व्यवस्था शून्यावर येऊन थांबेल. अराजकाच्या दारात उभा आहे पाकिस्तान.

कशामुळे झाले असेल असे? क्रिकेटपटू इम—ान खान होता ना पंतप्रधान,फार मोठे मोठे दावे करत होता. पाकिस्तानला जगातला अव्वल देश ठरवू म्हणून. जगात जाऊ दे, आशिया खंडात जाऊ दे, भारतीय उपखंडात सुद्धा पाकिस्तान कुठेच नाही. बांगला देशची अर्थव्यवस्था पण त्यांच्यापेक्षा बरी आहे म्हणतात.

या सगळ्या गोष्टीचं कारण एकच आणि ते म्हणजे भारताचा द्वेष. भारताचा द्वेष करून बारीक डोळ्याचे चिनी लोकसुद्धा व्यवस्थित राहू शकले नाहीत, तिथे पाकिस्तानची काय मजाल?

राग करायला किंवा भारताचा द्वेष करायला हरकत नाही; पण त्यांनी कर्ज काढून युद्ध खेळले भारताबरोबर. अगदी पहिल्या युद्धापासून. तुला आठवतं का त्यांचा एक पंतप्रधान होता झुल्फीकार अली भुट्टो. हा म्हणायचा पाकिस्तान गवत खाऊन जगेल; पण अणुबॉम्ब तयार करेल. केला त्यांनी अणुबॉम्ब तयार; पण आता खायला गवतसुद्धा शिल्लक नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पण, काहीही म्हण यार तू, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच असल्यानंतर जी खुन्नस बाहेर पडते ना दोन्ही देशांची, त्याची मजा काही और आहे. म्हणजे सगळ्या भारतीय लोकांची भावना वर्ल्ड कप नाही मिळाला तरी चालेल; पण पाकिस्तानला हरवा, एवढीच असते.

अरे दोस्ता, क्रिकेट वेगळं क्रिकेटपटू वेगळा आणि क्रिकेटपटू पंतप्रधान झालेला वेगळा. देश चालवणे येरागबाळ्याचे काम नव्हे. तिथे कणखर आणि फक्त अर्थव्यवस्थेवर लक्ष देणारा पाहिजे. आता पाकिस्तानची काय परिस्थिती झाली आहे बघ. समजा शंभर रुपये त्यांच्याकडे आहेत. त्यातले 55 रुपये लष्करावर खर्च होतात. आणखी 15 रुपये अतिरेकी कारवायांना निधी देण्यासाठी उपयोगी होतात. शिक्षण, आरोग्य व्यवस्था यांची वाट लागली आहे. लोकांना खायला नाही आणि हे गप्पा मारणार काश्मीर हिसकावून घेण्याची. जग कुठे चालले आहे आणि पाकिस्तान कुठे चालला आहे? त्यांचे त्यांना कळेपर्यंतच पूर्ण वाट लागली त्यांची. पुढे चालून अतिरेक्यांनी देशाचा ताबा घेतला किंवा उद्या लष्करी राजवट लागू झाली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तिथे पाकिस्तानात लष्करप्रमुखाला आदेश देण्याची हिंमत देशाच्या निवडून आलेल्या पंतप्रधानांमध्येसुद्धा नाही. मुशर्रफ नावाचा एक लष्करी हुकूमशहा होऊन गेला. सदासर्वकाळ भारताचा द्वेष करणे, भारताच्या सीमा अशांत ठेवणे, अतिरेकी घुसवणे अशी काळी कर्मे करत करत परवाच तो मरण पावला. शेवटी जाता जाता भारताबरोबर केलेली युद्धे ही पाकिस्तानची चूक होती, असे त्याने मान्य केले; पण आता काय फायदा? पाकिस्तानला पैशांची गरज आहे आणि सगळ्या देशांनी हात वर केले आहेत. त्याच वेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर दिमाखात आलेली आहे, याचा फार अभिमान वाटतो मला. भारताचा द्वेष करून कुणाचं भलं झालेलं नाही, हे नक्की!

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news