औपचारिक अधिवेशन

औपचारिक अधिवेशन
Published on
Updated on

कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिवेशनातून कार्यकर्त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शन करणे, योग्य तो संदेश देणे अपेक्षित असते. वर्तमानातील तसेच आगामी काळातील आव्हानांचा विचार करून त्याद़ृष्टीने काही दिग्दर्शन करण्याची अपेक्षा असते. परंतु, काँग्रेस पक्षाच्या रायपूर येथे झालेल्या अधिवेशनातून यापैकी काहीही न करता जुनाच राग आळवण्यात आला. खरे तर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससारख्या जुन्या जाणत्या पक्षाने केवळ आपल्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर देशवासीयांना उद्देशून काही बाबींचा ऊहापोह करण्याची आवश्यकता होती; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात आगपाखड केली जाते. रायपूर येथील अधिवेशनातसुद्धा यापेक्षा वेगळे काही घडले नाही, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल.

काँग्रेस पक्षाला वाटते त्यानुसार भाजपच्या राजवटीत देशाची अनेक पातळ्यांवर पीछेहाट झाली आहे, हे जरी खरे म्हणायचे ठरवले, तरीसुद्धा काही गोष्टी तरी बर्‍या झालेल्या असू शकतात, त्यांचा उल्लेख काँग्रेसने मोठ्या मनाने केला असता, तर काँग्रेसने जी टीका केली आहे, तिला अर्थ आला असता. खरे तर, अशा बिनमहत्त्वाच्या गोष्टींना प्रसारमाध्यमांमधून फारसे स्थान मिळत नाही. त्यामुळे या अधिवेशनात सोनिया गांधी यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत देणारे वक्तव्य सोडण्यात आले. सोनिया गांधी सुमारे तीन दशके भारतीय राजकारणात आहेत आणि एकूण भारतीय राजकारणावर त्यांचा दखलपात्र प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीची बातमी सोडल्यानंतर अधिवेशनाला प्रसिद्धी मिळेल, असा अंदाज बांधून त्यानुसार नियोजन करण्यात आले आणि काँग्रेसची ही चाल यशस्वी ठरली. अन्यथा या अधिवेशनातील घासून गुळगुळीत झालेल्या गोष्टींना फारशी प्रसिद्धी मिळाली नसती आणि अधिवेशनही दुर्लक्षित राहिले असते. देशातील सर्वात जुन्या पक्षावर प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवण्याची वेळ यावी यावरून या पक्षाची अवस्था लक्षात येऊ शकते.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात बोलण्याच्या नादात आपण देशासंदर्भातली एक नकारात्मक चित्र तयार करत आहोत, याचे भान काँग्रेस नेतृत्वाला राहिलेले नाही. अर्थात, हे काँग्रेस नेतृत्व म्हणजे कोण, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि त्याचे स्वाभाविकपणे उत्तर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे असू शकते. परंतु, एकूण अधिवेशनामध्ये खर्गे यांचे अस्तित्व नगण्य जाणवले. माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचाच प्रभाव अधिवेशनामध्ये अधिक जाणवला. काँग्रेस पक्षाने नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष केला असला, तरीसुद्धा पक्षावर प्रभाव गांधी परिवाराचा आहे आणि खर्गे केवळ नामधारी आहेत, यावरही रायपूरच्या अधिवेशनाने शिक्कामोर्तब केले आहे.

श्रीमती सोनिया गांधी यांच्या निवृत्तीच्या संकेतांच्या बातमीलाही फारसा अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरीत्या समानाधी आहे; मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या भारत जोडो यात्रेने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे वक्तव्य सोनिया गांधी यांनी केले होते. त्यावरून निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती; मात्र काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी उदयपूरमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात भारत जोडो यात्रेसंदर्भात घोषणा केली होती. हीच यात्रा यशस्वीरीत्या पार पडली, असे सोनिया गांधी यांना सांगायचे होते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये भाजपला खंबीर पर्याय देण्याची चर्चाही सातत्याने होत असते. त्यामध्ये तिसर्‍या आघाडीचा उल्लेखही असतो. आताही त्याचा पुनरुच्चार झाला. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 2024 मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत करायचे असेल, तर समविचारी पक्षांनी तातडीने एकत्र येण्याची गरज आहे. बिगरभाजप पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करेल. विरोधकांची तिसरी आघाडी मात्र भाजपच्या फायद्याची ठरेल, अशी भूमिका अधिवेशनातील राजकीय प्रस्तावात घेण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधकांच्या महाआघाडीसाठी काँग्रेस पुढाकार घेत असल्याचे नागालँडच्या प्रचारसभेत, तसेच दिल्लीतील पक्षाच्या कार्यक्रमातील भाषणात सांगितले होते. हाच मुद्दा खर्गे यांनी अधिवेशनातील भाषणातही जोरकसपणे मांडला. अधोरेखित केला.

2004 ते 2014 या दहा वर्षांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली किमान समान कार्यक्रमाच्या आधारे काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार यशस्वीपणे चालवून दाखवले होते. यूपीएमध्ये समविचारी पक्षांचा समावेश होता. आता ही आघाडी आणखी सशक्त करण्याची गरज आहे. भाजप आणि संघाविरोधात लढण्याची इच्छा असलेल्या सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन संघर्ष करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे. परंतु, असे फक्त बोलून फारसे काही होत नाही. पुढाकार घेताना छोट्या पक्षांना सोबत घ्यावे लागते. देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून, काँग्रेस पक्षच देशाला सक्षम आणि ठोस नेतृत्व देऊ शकतो, हे खर्गे यांचे पुढचे वक्तव्य या म्हणण्याला पुष्टी देणारे आहे.

केंद्रातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसने एकट्याने लढण्याचे दिवस संपले असल्याची कबुली राहुल गांधी यांनीही दिली होती. विरोधी पक्षांशी जुळवून घेऊन भाजपविरोधात लढण्यास काँग्रेस तयार आहे; पण जनतेला पर्यायी धोरण दिले पाहिजे, असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते. खर्गे यांनी तेच म्हणणे पुढे नेले आहे. भाजपविरोधी पक्षांची महाआघाडी करण्याची भूमिका काँग्रेसने मांडली असली, तरी तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, भारत राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला विरोध केला आहे, हेही इथे लक्षात घ्यावे लागते. काँग्रेसने देशाच्या राजकारणात अधिक जबाबदारीने व्यवहार करण्याची आवश्यकता आहे. त्या द़ृष्टिकोनातून विचार केला नाही, तर रायपूरचे अधिवेशन हे केवळ औपचारिक होते, असेच म्हणावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news