इलेक्ट्रिक वाहनांची दुसरी बाजू

इलेक्ट्रिक वाहनांची दुसरी बाजू
Published on
Updated on

एक इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी 4,375 किलो अ‍ॅसिड कचरा आणि 57 किलो रेडियोअ‍ॅक्टिव्ह अवशेष तयार होतात. जगातील सर्व दोनशे कोटी मोटारींचे रूपांतर इलेक्ट्रिक वाहनांत केले, तर निर्माण होणारा अमर्यादित अ‍ॅसिड कचरा नष्ट करण्याची साधनेच अस्तित्वात नाहीत.

इलेक्ट्रिक वाहनांमुळे आपण केवळ 20 टक्केच कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो. कारण, देशातील 70 टक्के वीज उत्पादन कोळशाच्या ज्वलनाद्वारे केले जाते. इलेक्ट्रिक वाहने जितकी इको फ्रेंडली आपण समजतो तितकी ती नाहीत. 'सोसायटी ऑफ रेयर अर्थ'च्या म्हणण्यानुसार, एक इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी लागणारा 57 किलो कच्चा माल (8 किलो लिथियम, 35 किलो निकेल, 14 किलो कोबाल्ट) जमिनीतून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत 4,375 किलो अ‍ॅसिड कचरा आणि 57 किलो रेडियोअ‍ॅक्टिव्ह अवशेष तयार होतात. ऑस्ट्रेलियात झालेले संशोधन असे सांगते की, 3 हजार 300 टन लिथियम कचर्‍यापैकी 2 टक्के कचर्‍याचेच रिसायकलिंग होऊ शकते, तर 98 टक्के लीथियम प्रदूषण पसरवीत राहते. लिथियम जमिनीच्या पोटातून बाहेर काढल्याने पर्यावरण तिप्पट अधिक विषारी होते. लिथियम हा सर्वांत हलका धातू असल्यामुळे ते खूपच सहजपणे इलेक्ट्रॉन्स सोडते. याच कारणामुळे ईव्हीच्या बॅटरीत त्याचा सर्वांत जास्त वापर केला जातो. लिथियमच्या 98.3 टक्के बॅटरी वापरानंतर जमिनीत पुरून नष्ट केल्या जातात. पाण्याशी संपर्क येताच त्याला आग लागते.

इलेक्ट्रिक वाहन तयार करण्याच्या प्रक्रियेत 9 टन कार्बन बाहेर पडतो. पेट्रोलमध्ये तो 5.6 टन असतो. इलेक्ट्रिक वाहनाला 13 हजार 500 लिटर पाणी लागते तर पेट्रोल कार तयार करण्यासाठी ते 4000 लिटरच लागते. कोळशावर तयार केलेल्या विजेने इलेक्ट्रिक वाहन चार्ज केले, तर दीड लाख किलोमीटर चाललेल्या पेट्रोल कारच्या तुलनेत 20 टक्केच कमी कार्बन उत्सर्जित होईल. जगातील एखादा देश जर इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्याचे स्वप्न पाहत असेल आणि ऊर्जानिर्मिती मात्र कोळशाच्या माध्यमातूनच करत असेल, तर प्रदूषणमुक्तीचे त्या देशाचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. ज्या देशांत वीजनिर्मिती कोळशावर नव्हे, तर अक्षय्य ऊर्जा स्रोतांमधून केली जाते अशा देशांतच विजेवरील वाहने चालविणे योग्य ठरेल. पेट्रोल कार प्रतिकिलोमीटर 125 ग्रॅम, तर कोळशाच्या सहाय्याने तयार केलेल्या विजेवर चालणारी इलेक्ट्रिक कार एवढ्याच अंतरासाठी 91 ग्रॅम कार्बनचे उत्सर्जन करते. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर क्लीन ट्रान्स्पोर्टेशनच्या म्हणण्यानुसार, युरोपात इलेक्ट्रिक वाहने 69 टक्के कमी कार्बन उत्सर्जन करतात. कारण, येथे 60 टक्के वीज अक्षय्य ऊर्जा स्रोतांमधून तयार होते.

सर्वांत चिंताजनक बाब अशी की, जगातील सर्वच्या सर्व म्हणजे दोनशे कोटी मोटारींचे रूपांतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केले, तर अमर्यादित अ‍ॅसिड कचरा उत्पादित होईल. तो नष्ट करण्याचे साधनच उपलब्ध नाही. या पार्श्‍वभूमीवर प्रश्‍न असा की, पेट्रोल आणि डिझेल कारऐवजी इलेक्ट्रिक कार आणल्या तर प्रदूषणाची समस्या खरोखर दूर होणार का?

भारतातील नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहने 10 लाख 76 हजार 420 आहेत आणि 2030 पर्यंत हा उद्योग 150 अब्ज डॉलर म्हणजे साडेअकरा लाख कोटी रुपयांचा होईल. म्हणजे 90 पट मोठा होईल. प्रदूषणमुक्तीबाबतीत इलेक्ट्रिक वाहनांचे योगदान नाकारता येत नाही; परंतु या वाहनांचे उत्पादन केल्याने तयार होणारा विषारी कचरा हे एक मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट असे आहे की, 2030 पर्यंत 70 टक्के व्यावसायिक मोटारी, 30 टक्के खासगी मोटारी, 40 टक्के दुचाकी वाहने आणि 80 टक्के तीनचाकी वाहने इलेक्ट्रिक वाहने असायला हवीत. त्याचप्रमाणे 2030 पर्यंत 44.7 टक्के वीज अक्षय्य ऊर्जा स्रोतांपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या हे उत्पादन 22.26 टक्के आहे. आज वीज कमतरता दूर करण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो. परंतु, भविष्यात देशात अक्षय्य ऊर्जा स्रोतांमधून सर्वाधिक वीज उत्पादित होईल, अशी अपेक्षा करायला हवी.

– रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news