अर्थसत्ता विरुद्ध निसर्गसत्ता

अर्थसत्ता विरुद्ध निसर्गसत्ता

आपल्या श्रीमंत डोळ्यांत समुद्र सामावून बसलेल्या मरिन ड्राईव्ह परिसरातील रहिवासी एका रात्री असेच दचकून जागे झाले. भूकंपाचे धक्के बसावे तसे हादरे बसत होते. अवघी मुंबई निश्‍चल, स्थिर असताना आपल्या सी-व्ह्यू इमारतीच का बरे थरथरताहेत?

निसर्गाच्या मुळावर उठून गगनाचे चुंबन घेणार्‍या मुंबईविरुद्ध हीच निसर्गसत्ता एक दिवस बंड करणार, उठाव करणार, असे म्हटले जात होते. ती भीती आता खरी ठरू लागली आहे. मुंबई बुडाली तरी चालेल; पण आपल्या खिडकीतून समुद्र अथांग दिसला पाहिजे, हा श्रीमंतांचा अट्टहास. त्यासाठी ते बाजारभावापेक्षा कित्येक कोटी जास्त मोजतात आणि ते मोजतात म्हणून बिल्डरही त्यांच्यासाठी समुद्राच्या काठाकाठाने टॉवर्स उभे करत राहतात. मुळात समुद्रकाठ ही काही इमारत बांधण्याची जागा नव्हे. एरव्ही सीआरझेडच्या नियमानुसार समुद्रापासून 50 मीटरपर्यंत बांधकामच करता येत नाही. पूर्वी हे अंतर तब्बल 500 मीटर होते. या श्रीमंतांसाठीच ते आता इतके कमी केले की, हे श्रीमंत समुद्राच्या लाटांतच सदैव पाय बुडवून बसलेले दिसतात. समुद्रकाठदेखील अपुरा पडू लागला म्हणून मुंबईत समुद्रात भर घालून मग एक श्रीमंतांची कॉर्पोरेट दुनिया उभी राहिली. त्याला श्रीमंतांच्या भाषेत 'रेक्‍लमेशन' म्हणतात. समुद्र बुजवायचा, कृत्रिमरीत्या जमीन निर्माण करायची आणि त्यावर मग गगनचुंबी इमले चढवत राहायचे. हा मागे ढकललेला, रोखलेला, रोखून धरलेला समुद्र कधी तरी उसळणार आणि काठावरल्या श्रीमंत दुनियेचा घास घेणार, असे इशारे देणारे पर्यावरणवादी नेहमीच मूर्ख ठरत आले आहेत. एक तर त्यांना विकासाचे विरोधक ठरवले जाते किंवा विकास रोखण्याची सुपारी घेणारे आंदोलक म्हटले जाते. मुंबईचा समुद्र बुजवत त्या रेक्‍लमेशनवर आर्थिक महासत्ता उभी करण्यालाही पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. तो समुद्रात बुडवून ही महासत्ता उभी राहिली. आज याच महासत्तेला रोखलेल्या, दाबलेल्या, मागे ढकलून दिलेल्या समुद्राच्या लाटांचे हादरे बसू लागले आहेत. आपल्या श्रीमंत डोळ्यांत समुद्र सामावून बसलेल्या मरिन ड्राईव्हचे रहिवासी एका रात्री असेच दचकून जागे झाले. भूकंपाचे धक्के बसावे तसे हादरे बसत होते. इतक्या मजबूत आणि टोलेजंग इमारती या धक्क्यांनी थरथर कापत होत्या. हा काय प्रकार आहे? अवघी मुंबई निश्‍चल, स्थिर असताना आपल्या सी-व्ह्यू इमारतीच का बरे थरथरताहेत? मरिन ड्राईव्हला भूकंपाच्या धक्क्यांचा अनुभव नाही. हे धक्के कधी तरी बातम्या पाहिल्या, वाचल्या असतील तर तेवढेच परिचयाचे. आख्खी इमारत थरथर कापते म्हणजे तो भूकंपच असला पाहिजे, असे त्यांना वाटले. मात्र, मरिन ड्राईव्हला धक्के बसले आणि मुंबईला जागदेखील नाही, हे लक्षात आले आणि मग मात्र ही मंडळी सटपटली. मुंबई महापालिकेकडे धावली. इमारती का हादरत आहेत, याचा शोध घ्या, असे साकडे घातले. आता महापालिकेने म्हणे या सी-व्ह्यूू इमारतींमध्ये भूपृष्ठावरील कंपनेे मोजणारी यंत्रे बसवली आहेत.

गेल्या शुक्रवारपासून हे धक्के बसू लागले. दर अर्ध्या-एक तासाला धक्‍का बसतो आणि आख्खी इमारत कंपायमान होते. हे असेच सुरू राहिले, तर इमारतींच्या बांधकामालाच मोठा धोका संभवतो. तो टाळायचा असेल, तर काय करावे लागेल? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. इथे ज्यांच्या हाती आर्थिक सत्ता त्यांच्यासाठी महासत्ता आणि महाशक्‍तींचा राजशकटदेखील सदैव हलतो. तातडीने या धक्क्यांची कारणे शोधणे सुरू झाले आणि मंडळी कोस्टल रोडवर येऊन थांबली. कोळी बांधवांचा, पर्यावरणवाद्यांचा, तज्ज्ञांचा विरोध डावलून भरसमुद्रातून हा कोस्टल रोड उभारला जात आहे. 58 टक्के काम पूर्णदेखील झाले. हे काम सुरू असताना समुद्राच्या लाटांचे तडाखे झेलत किनार्‍यावरील श्रीमंतांना दिलासे देणारे सिमेंटचे ठोकळे काढले गेले. जिथे जिथे हे ठोकळे हटवले तेथून जवळच असलेल्या इमारतींना लाटांचे हादरे बसणे सुरू झाले. विशेषत: भरती आली की लाट सरळ किनार्‍यावर आदळते आणि जवळच असलेल्या इमारती थरथर कापू लागतात. याचा अर्थ समुद्रावर केलेले अतिक्रमण समुद्रालाच मान्य नाही. उद्या कोस्टल रोडवरून धावणारे एखादे वाहनदेखील लाटेच्या तडाख्याने लेन बदलू लागले किंवा त्याचे नियंत्रण सुटले, तर आश्‍चर्य वाटू नये. यातही एक ताजी आठवण महत्त्वाची. कोस्टल रोड आणि मुंबईच्या मध्ये मोकळी जागा सोडली आहे. या मोकळ्या जागेवर उभे राहून मुंबईकरांना समुद्र बघता येईल, अशी भन्‍नाट कल्पना. हीच मोकळी जागा समुद्र आणि कोस्टल रोड यांच्यामध्ये सोडा म्हणजे समुद्र बघताना मध्ये कोस्टल रोड किंवा त्यावरची वाहतूक आडवी येणार नाही, असे 50 हून अधिक बांधकामतज्ज्ञांनी महापालिकेला सुचवले. मात्र, आता असा कोणताही बदल करता येणार नाही, असे सांगत महापालिका ठाम राहिली. म्हणजे यापुढे मुंबईकर समुद्र बघण्यास इथे आले, तर त्यांना आधी अनेक पदरी कोस्टल रोड दिसेल. त्यावर धावणार्‍या वाहनांमधून दिसलाच तर समुद्र दिसेल! समुद्रात भर घालून हे सारे उद्योग सुरू आहेत. याच समुद्राच्या काठावर रेक्‍लमेशन करीत उभ्या राहिलेल्या इमारती आज लाटांच्या तडाख्याने थरथर कापत असतील, तर तो मुंबईला मिळालेला इशारा समजण्यास हरकत नाही. अर्थात, हा इशारा आणि तशी आपत्ती प्रत्यक्ष येऊन आदळायला बराच वेळ जातो. तोपर्यंत अनेक पिढ्या जन्म घेतात आणि जातात. मरिन ड्राईव्हचे रेक्‍लमेशन 1920 ला सुरू झाले. समुद्र नीट बुजवून झाला आणि 1940 च्या सुमारास मरिन ड्राईव्हच्या दक्षिणेला समुद्राच्या उरावर पहिली इमारत उभी राहिली. हळूहळू उत्तरेपर्यंत एकेक इमारती उभ्या राहत गेल्या. आज थरथरणार्‍या इमारतींमध्ये ज्या श्रीनिकेतन आणि गोविंद महालचा समावेश होतो, या सर्व इमारती 1950 च्या सुमारास उभारल्या गेल्या. याचा अर्थ आज रात्रंदिवस लाटांना घाबरणार्‍या इमारती जवळपास 70 वर्षे जुन्या आहेत. त्यांना लाटांचे हादरे बसू नयेत म्हणून संपूर्ण किनार्‍यावर सिमेंटचे महाकाय ठोकळे तथा टेट्रापॉडस् टाकून ठेवले होते. विकास की पर्यावरण, हा मुळात झगडा नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असायला हव्यात. मात्र, विकासाचा असुरी ध्यास घेतलेल्या अर्थसत्तांना निसर्गसत्तेचे अस्तित्वच मान्य नाही, हे आरेच्या कारशेडमध्ये दिसले आणि समुद्रात घुसून बांधल्या जाणार्‍या कोस्टल रोडवरही दिसत आहे. अशाने मुंबईचा निभाव कसा लागेल? जगण्याचा साधा नियम आहे, 'एक तर निसर्गसत्तेच्या अधीन व्हा किंवा निसर्गसत्तेला पराभूत करण्याचा प्रयत्न तरी करू नका!' ती उलटली तर सारेच संपेल.

– विवेक गिरधारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news