
मुरलीधर कुलकर्णी
उच्चशिक्षित तरुण पिढीमधील वाढती बेरोजगारी हा जगभरातील चिंतेचा विषय असून लोकसंख्येच्या बाबतीत नंबर वन असलेला चीनही याला अपवाद राहिलेला नाही. मात्र, इथल्या तरुणाईने यावर मुलखावेगळा उपाय शोधून काढला आहे. चीनमध्ये काही दिवसांपासून पूर्णवेळ नातवंड (फुल टाईम ग्रँड चिल्ड्रन) हा आगळा-वेगळा ट्रेंड सुरू झाला असून तो मोठ्या प्रमाणात लोकप्रियही होत आहे. याअंतर्गत अनेक तरुण गावाकडे परतत असून आजी-आजोबांच्या सेवाशुश्रूषेला प्राधान्य देत आहेत. यामधून वयोवृद्धांची सेवाही होत आहे अन ज्येष्ठांच्या पेन्शनमधून या तरुणांना आर्थिक आधारही मिळत आहे.
यामध्ये 20 ते 30 वयोगटातील तरुण पिढी सहभागी होत असून याअंतर्गत काहींची महिन्याची कमाई लाखाच्या घरातही जात आहे. कोव्हिड-19 नंतर चीनमध्ये आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. खासगी कंपन्यांवरील कडक नियम, रिअल इस्टेट बाजारातील संकट आणि कठोर 9 / 9/ 6 काम संस्कृती (सकाळी 9 ते रात्री 9, आठवड्यातील सहा दिवस) यामुळे अनेक तरुण नोकरीच्या संधींपासून वंचित आहेत. जून 2023 मध्ये चीनमधील 16 ते 24 वयोगटातील शहरी तरुण बेरोजगारीचा दर 21.3 टक्के नोंदवला गेला. पण काही अंदाजानुसार हा दर प्रत्यक्षात 46 टक्केपेक्षा जास्त असू शकतो. या पार्श्वभूमीवर अनेक तरुण आपल्या गावाकडे परतत आहेत आणि आजी-आजोबांची सेवा करून कुटुंबातील एक प्रकारचा आधार बनत आहेत. त्यामुळे त्यांना वृद्धांच्या पेन्शन किंवा कौटुंबिक बचतीतून थोडाफार आर्थिक आधार मिळत आहे.
कौटुंबिक नात्यांना नवे आयाम देणार्या चीनमध्ये फिलियल पायटी म्हणजेच वडीलधार्यांची काळजी घेणे ही परंपरा मानली जाते. 2020 च्या जनगणनेनुसार, चीनमध्ये 60 वर्षांवरील 264 दशलक्ष वृद्ध आहेत. अनेक वृद्धांना एकटेपणा जाणवतो. त्यामुळे नातवंडांच्या उपस्थितीने त्यांना मानसिक आधार मिळत असून तरुण पिढीसाठीही हा अनुभव फायदेशीर ठरत आहे. 24 वर्षीय शियाओलिन सांगते, आजी-आजोबांसोबत घालवलेला प्रत्येक दिवस अमूल्य आहे. मात्र, या ट्रेंडवर टीकाही होत आहे.
ग्रामीण भागातील अत्यल्प पेन्शनमुळे ही जबाबदारी दोघांसाठीही आर्थिक अडचणी निर्माण करू शकते. मोठ्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांची झलक दाखवणारा हा ट्रेंड चीनमधील बेरोजगारी, कुटुंबसंरचनेतील बदलाचा द्योतक मानला जात आहे. एक मूल धोरणामुळे कुटुंबाचा आकार लहान झाला आहे. त्यामुळे वृद्धांची जबाबदारी कमी लोकांवर पडत आहे.त्यामुळे सरकारकडून नाईट मार्केटस् आणि ब्ल्यू कॉलर नोकर्यांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चिनी सोशल मीडियावरील गाजावाजामुळे जगभरात पूर्णवेळ नातवंड हा विषय चर्चेत आला आहे. काहीजण याला प्रेमाचा, तर काहीजण आर्थिक मजबुरीचा पर्याय मानतात. पण, यातून चीनमधील बदलती तरुणाई आणि कौटुंबिक जिव्हाळा अधोरेखित होत आहे हे मात्र नक्की!