

Maruti Chitampalli Tribute
सुनील माळी
''सुनील, तू नागपूरला उद्या जातोय ना ? मग मारूतरावांना तुझ्या गाडीतून नागपूरला सोडशील ?''
विवेकनं मला विचारलं अन मी मनातल्या मनात अनेक उड्या मारल्या...
''अरे, नक्कीच. त्यांच्या बरोबरचा नागपूरपर्यंतचा प्रवास अन त्यांच्याशी होणाऱ्या गप्पा... मला खूप काही मिळेल रे...''
कान्हा जंगलात चार दिवसांचा मुक्काम आटोपून मी पुण्याला परतायच्या तयारीत होतो. आता उद्या सकाळी निघायचं होतं, त्यामुळं जड झालेलं मन रमवण्यासाठी जंगलातच वसलेल्या त्या रेस्ट हाऊसच्या आवारातच असलेल्या छोटेखानी मांडवात पेटवलेल्या शेकोटीशेजारी बसण्यासाठी गेलो. बघतो तर काय ? तिथं तीस-चाळीस
तरूण गोलाकार खुर्च्या मांडून बसले होते आणि त्यांच्या मधोमध होते भलीमोठी दाढी असलेले अरण्यऋषी.
'अरे, मारूतराव...'
मी स्वत:शी पुटपुटेपर्यंत विवेक आणि मिलिंद देशपांडे दिसले. युवाशक्ती संस्थेची स्थापना केलेल्या आणि आता ट्रेकिंग, निसर्ग निरीक्षणाची अँडव्हेंचर संस्था सांभाळणाऱ्या या दोन भावांना मी दिसताच त्यांनी
विचारलं,
''सुनील, तू कधी आलास ?''
''अरे, चार दिवस झाले, पण आज आपली भेट होतेय...''
मारूतराव तरूणांना जंगलचं देणं कसं असतं, ते सांगण्यात गुंगून गेले होते. चितळ रात्री गोलाकार बसून आलटूनपालटून पहाऱ्याचं काम कसं करतात ?, केशराचा पाऊस कसा पडतो ?, वानरांचा लाडू कसा होतो ?... एक ना दोन... जंगलांचा फारसा अनुभव आणि माहिती नसलेली ती तरूण मंडळी जंगल अंगी मुरवलेल्या त्या वनमहर्षीकडून अस्सल अनुभवामृत पीत होती.
मारूतरावांच्या त्या रंगलेल्या छोटेखानी व्याख्यानात मीही सहभागी झालो. शेवटी प्रश्नोत्तरे झाल्यावर ती रंगलेली मैफल संपली आणि सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. मिलिंद-विवेकचा निरोप घेत असताना विवेकनं मला
मारूतरावांना नागपूरपर्यंत सोडण्याबाबत विचारलं आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे हिवाळ्यातली थंडी अंगावर घेतच मारूतरावांना घेऊन आम्ही म्हणजे (सुविद्य आदी) पत्नी लक्ष्मी आणि शाळेतला मुलगा रूचिर यांनी नागपूर सोडलं. पुण्याहून नागपूरला लक्झरी बसनं पोचलो होतो आणि नागपूरहून भाड्याने कार घेऊन आम्ही कान्हाला आलो होतो. ती कार चार दिवसांनी आम्हाला घ्यायला नागपूरहून परत आली होती आणि आता त्याच कारमधून खुद्द मारूतरावांबरोबर आमचा प्रवास सुरू झाला होता...
जंगलातील मारूतरावांच्या आठवणी ऐकतऐकत आम्ही पुढे चाललो होतो. ''तुम्ही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावं, असं मनापासून वाटतं,'' असंही त्यांना सांगत होतो. बोलताबोलता मारूतरावांनी मैलाच्या दगडाकडे नजर टाकली आणि म्हणाले,
''आपण पवनीच्या जवळ आलेलो आहोत...''
''हो, पवनी तीस किलोमीटरच्या आसपास असल्याचा बोर्ड दिसला खरा...''
''तुम्हाला पवनीजवळच्या एका महत्त्वाच्या ठिकाणाबाबत माहिती आहे का ?''
त्यावर मान आडवी हलवत माझी नकारघंटा आलेली पाहिल्यावर मारूतराव म्हणाले, ''अहो, 'जंगल बुक'चा लेखक रूडयार्ड किपलिंग याचं लहानपण इथं गेलं. त्याच्या जंगलबुकमधील प्रसंग इथल्याच ठिकाणांवरून बेतलेले आहेत. तीच नदी, तसंच गाव आणि जंगलही...''
मी थक्कच झालो. रूचिरबरोबर प्रचंड वेळा जंगलबुक पाहिलेला... त्यातला मोगली, बगिरा, का, शेरखान आदींची संभाषणं पाठच झालेली. तेच एकेकाळी आपल्या मनाला मोहून टाकलेलं कार्टूनपटातलं जंगल, नदी खऱ्याखुऱ्या
स्वरूपात बघायला मिळणार आहे की काय, असा प्रश्न पडला. तेवढ्यात परत मारूतराव म्हणाले, ''रस्त्यापासून फारसं लांब नाहीये, त्यामुळं थोडा वेळ थांबलं तरी चालणार आहे...''
ते ऐकल्यावर मग आम्ही ठरवलंच. नागपूरला पोचलो तरी पुण्याची गाडी रात्री उशिराची असल्यानं तिथं माशा मारत किंवा जांभया देत (पसंद अपनीअपनी...) वेळ काढावा लागणारच होता. चला तर मग, जंगलबुकची भूमी पाहून येऊ...
थोड्या वेळानं आमची कार पवनीच्या त्या ठिकाणी पोचली. पासष्ट ते सत्तरीच्या वयोगटातल्या मारूतरावांना घेऊन आम्ही गाडीतून उतरलो आणि पायवाट चालू लागलो. रस्त्यापासून आत उतारच उतार होता. तो उतार उतरत आम्ही जात होतो. बराच वेळ गेला, उतार संपला तरी वाट चालूच होती आणि नदी दिसत नव्हती. ''इथं जवळच आहे...'' असं अनेकदा ऐकत होतो, पण 'इथं जवळच' असलेली नदी येत नव्हती.
... आम्ही हिमतीनं चालत होतो, पण आमचा धीर मारूतरावांच्या एका वाक्यानं खचला.
''अहो माळी, माझी शुगर लो झाली आहे, मला आता चालवत नाही.''
''म्हणजे ?"
''अहो, गुळाच्या खड्यांचा माझा डबा गाडीतच राहिलाय, तो मला आत्ता हवाय, नाहीतर मला चक्कर येईल...''
मला मनातल्या मनात तो उतरून आलेला भलामोठा उतार आठवला, तो पुन्हा चढायचा, उतरायचा अन शेवटी पुन्हा चढायचा ?... मी आवंढा गिळला आणि काही बोलू जाणार तोच लक्ष्मी म्हणाली, ''मी जाते गाडीपर्यंत आणि घेऊन येते डबा...''
मी म्हटलं, ''तू जातेस तर जा, मी मारूतरावांना सोबत देतो...'' असं म्हणून मी मारूतरावांशेजारी एका दगडावर बसकण मारलीही.
सडसडीत अंगकाठीची लक्ष्मी ताडताड निघाली अन आम्ही त्या जंगलात बसून राहिलो. मारूतराव काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते त्यामुळं माझे प्रश्न तसेच गिळावे लागले. थोडा वेळ गेला अन लक्ष्मी परतुनी आली. तिनं गाडीतल्या बँगेतनं गुळाचा डबा काढून आणला होता. त्यातले दोन मोठे खडे मारूतरावांच्या तोंडात ठेवले तशी साखरही परतुनी आली. गाडीत पेट्रोल गेल्यावर मारूतराव ताजेतवाने झाले आणि मग आम्ही नदीकाठच्या वाळूपर्यंत पोचलो. ती पांढरी वाळू, उतारामुळं नदीच्या प्रवाहाला आलेला खळाळ, पक्ष्यांची किलबिल, दाट झाडी यांत आम्ही 'जंगल बुक' शोधू लागलो. मारूतराव रूडयार्ड किपलिंगच्या वास्तव्याबाबत सांगू लागले...
... थोडा वेळ गेल्यानंतर आम्ही भानावर आलो आणि मारूतरावांना बरोबर घेऊन पुन्हा चढ चढू लागलो. अंधार पडायच्या थोडसं आधी आम्ही गाडीपर्यंत पोचलो. गाडीनं वेग घेतला तशा आमच्या गप्पांनीही. एखाद्या वैमानिकाबाबत 'तब्बल दहा हजार तास उड्डाणाचा अनुभव आहे', असं ऐकल्यावर जसं त्याच्याकडं आदरानं
पाहिलं जातं, त्याच्यापेक्षा जास्त आदर मला एखाद्यानं 'दहा वर्षे जंगलात काढली आहेत', असं कुणी म्हटलं तर त्या जंगलघरच्या माणसाविषयी वाटतो.
मारूतरावांनी आपल्या छत्तीस वर्षांच्या वनखात्याच्या सेवेतली अनेको वर्षेजंगलात काढली. त्यांनी जंगल अनुभवलं होतं. ज्ञानेश्वरांनी 'पुरे पुरे आताप्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये...' असं म्हटलं होतं.त्यांना आध्यात्मातील स्वरूपी म्हणजेच निर्गुण, निराकार, परब्रह्मस्वरूपहोऊन राहणं अपेक्षित होतं. तसंच मारूतराव निसर्गस्वरूप, अरण्यस्वरूप होऊनत्याच्याशी तादात्म्य पावून, त्याच्याशी एकरूप-एकजीव होऊन राहिले. समर्थरामदास म्हणतात, 'सदा सेवी आरण्य, तारूण्यकाळी...' अरण्य केवळ पाहणंनव्हे तर त्याचं सेवन करणं. तांबूलसेवन म्हणतात याचं कारण त्याचाकणाकणानं, सावकाशीनं रसास्वाद घेणं. तसाच अरण्याचा आस्वाद घेणंरामदासांना अपेक्षित होतं, अगदी तसंच अरण्यसेवन मारूतरावांनी केलं.त्यांच्या नजरेतून जंगल कसं दिसतं, ते अनेक वेळा झालेल्या गप्पांतूनमारूतराव सांगतच, पण त्यांच्या लेखणीतून ते जेव्हा उतरलं तेव्हा ती अस्सलअक्षरलेणी ठरली. शहरात राहिलेले लेखक निसर्गाबाबत लिहितात तेव्हा 'हिरवीझाडे, नागमोडी वाट, काळा डोह, रातकिड्यांची किरकिर' अशा ढोबळ शब्दांच्यापलिकडे ते जाऊ शकत नाहीत. जंगलस्वरूप झालेल्या मारूतरावांची वेगळीचनिसर्गबोली होती. ती पिंपळाच्या कोवळ्या पानांचा प्रसन्न-नवथर हिरवी जशीहोती तशीच कडक उन्हाळ्यात पेटलेल्या सावर अन पलासच्या गर्द शेंदरीफुलांचीही होती. निसर्गसाहित्यावर त्यातून अनेक अनवट घडणीचे अलंकार चढले गेले.
''तुमच्या अनेको पुस्तकांमधील माझं सर्वात आवडीचं पुस्तक 'नवेगाव बांधचेदिवस' हे आहे,''
मी गाडीत मारूतरावांना म्हटलं. त्यांनी हसून त्याचा स्वीकार केला. आणि तेखरंच होतं. जंगलातली अगदी छोट्यात छोटी वाटणारी गोष्टही कशी बघावी, तेमारूतराव सांगतात. जंगल सफारी या नावानं शेकडो जण हाती अन गळ्यातलहान-मोठे कँमेरे बाळगत जंगलं फिरतात. त्यांना बघायचा असतो तो फक्त आणिफक्त वाघ. वाघ पाहाणं, त्याचे फोटो काढणं, ते फेसबुकवर किंवाइन्स्टाग्रामवर टाकणं म्हणजे झालं निसर्ग पर्यटन. एकदा वाघ दिसला आणिफोटोशूट झालं की यांचे कँमेरे आणि त्याचबरोबर डोळेही बंद. जंगलातलेवृक्षवेलींचे प्रकार, येणारे नानाविध वास, पक्ष्यांचे वेगवेगळ्याऋतूंमधले वेगवेगळे आवाज, शिकारी पक्ष्याची चाहूल लागली की इतर पक्ष्यांनीअन शिकारी प्राण्याची चाहूल लागली की चितळ-सांबर या हरणांसारख्याप्राण्यांनी तसंच माकडांनीही दिलेला विशिष्ट आवाजातला कॉल, ढोलीत लपलेलापिंगळा, तळ्यात किंवा अगदी कृत्रिम पाणवठ्यात सकाळी खंड्यापासून तेवेड्या राघूपर्यंतचे पक्षी बुड्या मारून अंघोळ कशी करतात, काळ्यामातीच्या रंगाशी एकरूप झालेला जंगली ससा किंवा नाईटजार पक्षी... एक नादोन. हे सारं कसं पाहायचं ते मारूतराव सांगत. 'नवेगाव बांधचे दिवस' मध्येअगदी मुंगीपासूनच्या प्राण्याच्या हालचाली त्यांनी टिपल्या. निसर्गनिरीक्षण कसं करायचं ?, ते करताना संयम बाळगण्याची-धीर धरण्याचीवृत्ती कशी येत जाते ?, याचं उत्तम मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत जात होतं. जंगलाच्या सहवासातून आनंद-शांतता कशी मिळवायची, हे सांगणारे उत्तम मार्गदर्शक मारूतराव होते. त्यांचे जंगलातील जिवलग माधवरावांकडून झालेलेसंस्कारही ते सांगत. 'आपण जंगल दोन डोळ्यांनी पाहतो, पण जंगल आपल्यालाहजार डोळ्यांनी पाहात असतं', हे अनुभवानंच सांगता येतं.
... मारूतराव हातचं काहीही न राखता भरभरून बोलत होते आणि नागपूरपर्यंतच्या प्रवासात आम्ही समृद्ध होत जात होतो. शेवटी संपू नये,असं वाटणारा तो प्रवास संपला. मारूतरावांचा आम्ही निरोप घेतला आणि
पुण्याच्या गाडीत बसलो...
---
मारूतरावांची त्यानंतर अनेकदा अवचित गाठ पडत गेली. अनेकवेळा मारूतरावभक्त असलेले विवेक-मिलिंद देशपांडे बंधू हे कारण असायचं. युवाशक्तीनं चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वर ट्रेकचा उपक्रम सुरू केला आणि तो प्रदीर्घ काळ चालला. यामध्ये साप, पक्षी,तारांगण, वृक्षराजी आदींबाबतच्या तज्ज्ञांची व्याख्याने प्रतापगड,क्षेत्र महाबळेश्वर, पोलो ग्राऊंड अशा ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपपुढे होत.
कात्रज सर्पोद्यानाचे संस्थापक-जागतिक कीर्तीचे सर्पतज्ज्ञ नीलिमकुमारखैरे यांचा कार्यकर्ता या नात्यानं अनेकवर्षे त्यांचं बोट धरूनमहाबळेश्वरला जायचा योग येत गेला होता. स्कूटरवर स्वार होऊन आणिपाठीवरच्या पिशव्यांमध्ये जिवंत सापांच्या पिशव्या ठेवूनपुणे-महाबळेश्वरचा प्रवास अनेक वर्षे केला. त्यात इतर व्याख्याते म्हणूनजसे खगोलअभ्यासक प्रकाश तुपे यायचे आणि त्यांची गाठ पडायची, तशीचमारूतरावांचीही भेट व्हायची. महाबळेश्वरला त्यांच्याबरोबर राहण्याचा योगआला. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या महाबळेश्वर जंगलाच्या गोष्टी ध्यानातराहिल्या. ''मी सागरी काठांवर भ्रमंती करून आणि त्यांचा अभ्यास करूनसागरी जिवांबाबत लिहिणार आहोत'', असं त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतंआणि आपल्या त्या भ्रमंतीच्या अनुभवांविषयी नंतरच्या भेटीत त्यांनीसांगितलंही होतं.
मारूतरावांच्या वयाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली त्या वर्षापासूनत्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी देण्याचा उपक्रम विवेक-मिलिंददेशपांडे यांनी सुरू केला. त्यानंतर झालेल्या अठरा पुरस्कारांपैकी तब्बलचौदा पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमांना ते स्वत: उपस्थित होते.पक्षीनिरीक्षक आणि अभ्यासक डॉ. सत्यशील नाईक तसंच खगोलअभ्यासक प्रकाशतुपे यांना पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमांत त्यांच्याबरोबर काढलेलेफोटो, त्यांच्याशी झालेल्या गप्पा अशाच स्मरणात राहिल्या.
--
मारूतरावांना यावर्षी जानेवारीत 'पद्मश्री' हा सर्वोच्च नागरी सन्मानजाहीर झाला आणि विवेकचा फोन आला.
''मारूतरावांचं अभिनंदन करायला सोलापूरला जातोय, येतोस का ?...''
''मला आवडलं असतं, पण उद्याचं जमत नाहीये...''
मी नाईलाजानं उत्तर दिलं.
विवेक-मिलिंद मारूतरावांना भेटून आले तेव्हा त्यांना मारूतरावपहिल्यांदाच वाकलेले दिसले. प्रकृतीच्या काही तक्रारीही होत्या. काहीनव्या तर मधुमेहासारख्या काही तब्बल चाळीस वर्षांपूर्वीपासूनच्या. तब्बल
चाळीस वर्षे मधुमेह बाळगून आणि त्याच्यावर यशस्वीरित्या नियंत्रण ठेवूनमारूतरावांनी ९२ वर्षे पूर्ण केली होती. महाबळेश्वरच्या शिबिरात ते स्वत:पोटावर इन्शुलिनचं इंजेक्शन घेत असलेलं मी अनेकदा पाहिलेलं होतं.
दिल्लीत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात ३० एप्रिलला मारूतरावांनापद्मश्री प्रदान करण्यात आली. त्यानंतर ते पुणे मार्गेच सोलापूरला परतजाणार होते. त्यामुळे पुण्यात त्यांचा नागरी सन्मान करण्याचा कार्यक्रमविवेकनं ठरवला. मारूतरावांनी त्याला मान्यताही दिली, पण प्रवासाची दगदगआणि प्रकृतीवरचा ताण यांमुळे त्यांना पुण्यात थांबता आलं नाही. पुन्हाथोड्या दिवसांनी पुण्यात येईन, असं आश्वासन त्यांनी दिलं खरं, पणकाळाच्या इच्छेमुळं त्यांना ते पुरं करता आलं नाही... ही रूखरूखविवेक-मिलिंदला जशी आहे, तशीच पद्मश्रीबद्दल अभिनंदन करण्यासाठी जाणं नझाल्यानं मलाही आहे...
... तरीही जेव्हाजेव्हा अगदी पुण्यातल्या सिमेंटच्या जंगलातही पहाटेरॉबिनचं गाणं कानी पडेल...कधी 'घूब घूब' असा भारद्वाजानं जपलेला मंत्रऐकू येईल... लेझिम जोरानं हलवल्यावर येणाऱ्या ध्वनिसारखा राखी धनेशाचा
ध्वनी साद घालेल, खंड्याची शिट्टी लक्ष वेधून घेईल... तळजाईच्या जंगलाजवळटिटवी आर्त पुकारा देईल... मोराच्या केकाद्वारे विरहवेदना ध्वनिरूप धारणकरेल... तेव्हातेव्हा मारूतरावांचं अस्तित्त्व जाणवेल... मग वाटेल...'मारूतराव गेलेत ? छे...छे... ते तर एका देहातून बाहेर पडून या लक्षावधीनिसर्गखुणांत विभागले गेलेत अन आपल्याशी संवाद साधताहेत... आपल्याअंतापर्यंत...'