एका बाजूला राज्यातल्या बदललेल्या राजकारणाची चर्चा, तर दुसर्या बाजूला मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून सुरू असलेली चढाओढ यामुळे कोकण व मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार राज्याच्या अधिवेशनापूर्वी होईल, अशी एक चर्चा आहे. दुसरी चर्चा मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतर होईल, अशी आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना दोन तार्किक मुद्दे सांगितले जात आहेत. पहिला मुद्दा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेवाटप झाले, तर शिंदे-भाजप गटातील आमदारांत असंतोष पसरेल म्हणून आधी मंत्रिमंडळ विस्तार करून आमदारांमधील नाराजी दूर करायची, असला एक तर्कशास्त्रीय मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो अधिवेशनात घरच्याच आमदारांनी काही वेगळी भूमिका घेऊ नये म्हणून मंत्रिपदाचे गाजर दाखवत ठेवायचे आणि अधिवेशन आटोपून घ्यायचे. यामुळे अधिवेशन निर्विघ्न पार पडण्यास मदत होईल, असा सांगणारा हा दुसरा तर्कशास्त्रीय मुद्दा आहे. सध्या या दोन्ही राजकीय चर्चा तेवढ्याच जोशपूर्ण आहेत. कोकणसह मुंबईमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाले आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रातून मंत्रिपद सोडले, तर नितेश राणे यांचा राज्य मंत्रिमंडळात प्रवेश होऊ शकतो. राणेंचे स्थान केंद्रात कायम ठेवले, तर पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. दुसर्या बाजूला मुंबईतून आशिष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी इच्छा आहे. त्यामुळे आता विस्तार झाला, तर यापैकी एका नावाचा विचार करावा लागेल. ठाण्यातून आमदार संजय केळकर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, किसान कथोरे हेही इच्छुकांमध्ये आहेत. नवी मुंबईत ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनाही मंत्रिपदाची आस आहे. राष्ट्रवादीमधील अजित पावर गटाचा महायुतीत प्रवेश झाल्यामुळे आता चौदा मंत्रिपदेच शिल्लक आहेत.
यात भाजपला सहा ते सात एवढेच मंत्री करता येतील. त्यामुळे कोकणातूनच इच्छुकांची संख्या सात ते आठवर असल्याने फार तर दोघांची वर्णी यातून लागू शकते. कोकणातील सिंधुदर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार आहेत. दुसर्या बाजूला पनवेल महापालिका, ठाणे-मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार अशा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांना मंत्रिपद देऊन ताकद देण्याची भूमिका भाजप घेऊ शकते. शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावलेंचे नाव चर्चेत आहे. त्यांची वर्णी यावेळी लागेल असे निश्चित मानले जात आहे. कारण, अजित पवारांसोबत आलेल्या अदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोकणातील शिंदेंचे आमदार नाराज आहेत.
आघाडी सरकारमध्ये अदिती तटकरे राज्यमंत्री होत्या. त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रिपद होते. त्यावेळी रायगडमधील भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांनी अदिती तटकरे आपल्यावर अन्याय करतात, असे सांगून शिवसेनेशी फारकत घेतली आणि बंडात सहभागी झाले. आता महायुती सरकारमध्येही अदिती तटकरे या मंत्री झाल्याने या तिन्ही आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून गोगावलेंना मंत्रिपद करणे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ठाकरे गटात काँग्रेसमधून आलेल्या महाडच्या स्नेहल जगताप, खेडमध्ये राष्ट्रवादी काँगेसमधून ठाकरे गटात आलेले संजय कदम हे दोघेही महाड आणि दापोलीमधून विधानसभेला इच्छुक आहेत.
त्यांना ताकद देण्याचे काम ठाकरे गट करीत आहे आणि दुसर्या बाजूला सुनील तटकरे हे महायुतीत गेल्याने कोकणातील महायुतीची ताकद वाढलेली आहे. श्रीवर्धन हा मतदारसंघ अदिती तटकरे यांचा आहे, तर दापोलीमधून रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम, गुहागरमधून भाजपचे माजी आमदार विनय नातू इच्छुक आहेत. गुहागरमधून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना शह देण्याची तयारी भाजप आणि शिंदे गटाकडून होत आहे. दुसर्या बाजूला रामदास कदमांना दापोलीत शह देण्याची तयारी ठाकरे गटाने आखली आहे. आता अजित पवारांच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. या नवीन समीकरणांच्या पार्श्वभूमीवर नवीन रणनीती दोन्हीकडून आखली जात आहे.