.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी देशांमध्ये सध्या अस्थिरता, असंतोष आणि हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. मध्यंतरी श्रीलंकेमध्ये उद्भवलेले अराजक जगाने पाहिले. म्यानमारमध्ये लष्करशाहीचा रक्तपात सुरू आहे. नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता कायम आहे. पाकिस्तान अंतर्गत प्रश्नांनी धुमसत आहे. अशा स्थितीत बांगला देशसारखा छोटा देश शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या पायर्या चढत होता; परंतु पाकिस्तान, चीन आणि पश्चिमी शक्तीमुळे बांगला देशच्या अशांततेचे ग्रहण लागले आहे.
बांगला देशात काहीतरी धुसफुसत आहे आणि सरकार उलथवण्यासाठीचे, हिंसाचाराचे षङयंत्र आखले जात आहे, याबाबतचे संकेत गेल्या काही महिन्यांपासून मिळत होते. अखेरीस ही भीती खरी ठरली आहे. अलीकडच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसक निदर्शनांमुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणविरोधी हिंसाचारात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, एक हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. खरे तर अवघ्या 7 महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर देशातील जनक्षोभ हळूहळू वाढू लागला होता.
उजव्या विचारसरणीच्या बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि इतर राजकीय पक्षांनी सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. हसीना सलग चौथ्यांदा सत्तेवर आल्या असल्या तरी निवडणुकीत गडबड झाल्याचा संदेश जनतेमध्ये पोहोचवण्यात विरोधी पक्षांना यश आले. इतकेच नव्हे, तर यामुळे आंतरराष्ट्रीय जगातही नकारात्मक संदेश गेला म्हणूनच या निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन सत्ता स्थापन केल्यानंतर, गेल्या काही महिन्यांत हसीना यांनी सरकारला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी भारत आणि चीनचा दौरा केला होता; पण यादरम्यान बांगला देशात त्यांच्याविरोधातील असंतोष आणखी वाढत गेला.
1971 मध्ये बांगला देशला पाकिस्तानच्या जुलमी राजवटीतून मुक्त करणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या तिसर्या पिढीच्या नातेवाइकांना उच्च सरकारी पदांमधील नोकर्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यांच्या अनेक पिढ्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला. परिणामी, बेरोजगारांना नोकर्या मिळत नसल्याचा त्यांचा युक्तिवाद होता; मात्र हसीना सरकार हे आंदोलन नीट हाताळू शकले नाही, असे दिसते. आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी घेतलेल्या कठोर धोरणामुळे आंदोलन अधिकच हिंसक बनले. याचा पुरेपूर फायदा विरोधी राजकीय पक्षांनी घेतला. तेथील सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण 5 टक्क्यांवर आणले असले तरी सरकारला हा संदेश जनतेपर्यंत नीट पोहोचवता आला नाही. त्यानंतर विद्यार्थी नेत्यांच्या अटकेने हे आंदोलन अधिक चिघळले. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले.
हसीना यांनी आपण या आरक्षणासंदर्भात तोडगा काढू, असे म्हटले होते; पण विद्यार्थी संघटना त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. हसीना सरकार विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली. आक्रमक जमावाने मुक्ती चळवळीचे नेतृत्व करणारे वंंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळाही फोडला, यावरून जनक्षोभाची तीव—ता किती आहे, याचा अंदाज लावता येतो. बांगला देशात घडलेल्या प्रकारांनी 2022 मध्ये श्रीलंकेतील अराजकाची आठवण करून दिली आहे. भारताचा शेजारी देश असणार्या श्रीलंकेमध्ये राजपक्षे बंधूंनाही अशाच प्रकारे लोकक्षोभामुळे सत्तेतून बाहेर पडण्यास आणि परदेशात पळून जाण्यास भाग पडले होते. अर्थात, दोन्ही देशांतील असंतोषाची कारणे वेगवेगळी आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगला देशात अंतरिम सरकार स्थापन होणार असल्याचे तेथील लष्कराने म्हटले आहे; मात्र अद्यापही बांगला देशामध्ये हिंसाचार सुरूच आहे. हा हिंसाचार आटोक्यात कधी आणि कसा येतो, हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
बांगला देशातील अस्थिरतेची स्थिती आणि हिंसाचाराचा वणवा भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. या अशांततेचा मोठा परिणाम भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर होणार आहे. हसीना यांच्या कार्यकाळात भारत-बांगला देश संबंध खूप सुधारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हसीना यांच्यातील व्यक्तिगत सलोखाही चांगला होता. त्यांच्या कार्यकाळात भारत-बांगला देश यांच्यातील आर्थिक व व्यापारी संबंधांनाही चालना मिळाली. तसेच बांगलादेशी घुसखोरींच्या प्रश्नावरही त्यांनी बर्याच अंशी नियंत्रण मिळवले. त्यामुळेच बांगला देशातील पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर हसीना भारतात पोहोचल्या. त्यांच्या देश सोडून जाण्याच्या भूमिकेनंतरही बांगला देशातील हिंसाचार थांबलेला नाहीये. अशा स्थितीत हसीना यांच्या जागी अन्य एखादे नेतृत्व उदयाला आल्यास, अवामी लीग त्यांना पंतप्रधान बनवू शकते.
सध्या बांगला देश लष्कराच्या ताब्यात आहे; मात्र तेथील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यात लष्करालाही यश आलेले नाहीये. सध्या बांगला देशामध्ये सुमारे दोन कोटींहून अधिक हिंदू आहेत. सध्याच्या परिस्थितीत या हिंदूंना आणि त्यांच्या मालमत्तांना, घरांना लक्ष्य केले जात आहे. आजवरचा इतिहास पाहिल्यास, अशा हिंसाचारात नेहमीच हिंदूंना लक्ष्य केले जाते, त्यामुळे हे हिंदूही भारतात आश्रयाला येऊ शकतात. बांगला देशातील या सर्व अराजकामध्ये पाकिस्तानचा खूप मोठा हात आहे. विशेषतः पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ने यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. याखेरीज चीनलाही बांगला देशात अशांतता पसरवायची आहे.