

राजीव मुळ्ये, नाट्यदिग्दर्शक-लेखक
लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने लोककलेचा अस्सल बाज जपणारे आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक कलापर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
चित्रपट, नाटक आणि लोककला, अशा तिन्ही क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळ वावरणाऱ्या अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी कलाविश्वातील एका वैशिष्ट्यपूर्ण पर्वाची सांगता झाली आहे. अभिनयातील सहजता, लावणीतील ठसकेबाज अदाकारी आणि लोककलेशी असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी मराठी रसिकांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. विशेषतः पारंपरिक लावणीला चित्रपटाच्या माध्यमातून व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचविणाऱ्या कलावंतांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. लावणी हा त्यांच्या कलाजीवनाचा गाभा होता. लावणी सादर करताना फक्त नृत्यकौशल्य पुरेसे नसते. ढोलकीचा ठेका, शब्दांतील सूचक अर्थ, चेहऱ्यावरील बदलते भाव आणि देहबोलीतून व्यक्त होणारी नजाकत यांचा विलक्षण मेळ त्यांच्या सादरीकरणात असे.
मधू कांबीकर मूळच्या बीड जिल्ह्यातील मालेगाव खुर्द या गावच्या. लोककलेची परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. आई आणि मावशी लावणी कलावंत असल्याने लहानपणापासूनच त्यांना या कलेचे संस्कार लाभले. पुढे पुण्यात त्यांनी कथक नृत्याचे शिक्षण घेतले. १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या व्यावसायिक कला जीवनाला सुरुवात झाली. लोकनाट्य, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचा मिलाफ असलेल्या या क्षेत्रात त्यांनी अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली. लोककलेतील सहज अभिनय आणि रंगमंचावरील अनुभव यांचा उपयोग त्यांनी चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारतानाही केला. त्यामुळे त्यांच्या अभिनयामध्ये कृत्रिमतेचा स्पर्श कधी जाणवला नाही. ग्रामीण जीवनातील स्त्री असो किंवा भावनिक गुंतागुंत असलेली व्यक्तिरेखा, त्या भूमिकेचे स्वाभाविक रूप पडद्यावर उभे करण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती.
त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या. १९८० च्या दशकात मराठी मनोरंजनविश्वात त्यांचा ठसा अधिक ठळक झाला. दादा कोंडके यांच्यासोबत ‘येऊ का घरात’ आणि ‘मला घेऊन चला’ या चित्रपटांत त्यांनी काम केले. लोकप्रिय आणि आशयघन मराठी चित्रपटांतून त्यांचा परिचय व्यापक प्रेक्षकवर्गाला झाला. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली.
‘भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं बाई’ आणि ‘कुठं तुम्ही गेला होता सांगा कारभारी’ यांसारख्या लावण्यांमुळे त्यांच्या कलाविष्काराची वेगळी ओळख निर्माण झाली. लावणीतील शृंगार व्यक्त करतानाही त्यांचा भर भावाभिनयावर असे. चेहऱ्यावरील मिश्कील भाव, बोलकी नजर आणि तालाशी साधलेली एकरूपता यामुळे त्यांच्या लावणीचे वेगळेपण सहज लक्षात येत असे. लावणी अभिनयप्रधान लोकनाट्यपरंपरेचा महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीव त्यांच्या सादरीकरणातून होत असे.
१९८२ मध्ये आलेल्या राजदत्त आणि अरविंद देशपांडे दिग्दर्शित ‘शापित’ चित्रपटातील भूमिकेने त्यांच्या अभिनयक्षमतेची विशेष दखल घेतली गेली. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. फिल्मफेअर पुरस्कारांतही त्यांच्या अभिनयाची दखल घेण्यात आली. ‘शापित’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना ‘झी चित्रगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण, मधुताईंना सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले नाही. २०१६ मध्ये मुंबईतील यशवंत नाट्यमंदिरातील लावणी कार्यक्रमात त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांच्या शरीराच्या एका बाजूवर परिणाम झाला आणि त्यांचे सक्रिय कलाजीवन जवळजवळ थांबले. अनेक वर्षे त्या अंथरुणाला खिळून होत्या. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत चढउतार होत राहिले; मात्र रंगमंचावर पुन्हा पूर्वीप्रमाणे उभे राहणे त्यांना शक्य झाले नाही.
तमाशा, लावणी आणि इतर लोककलांचे स्थान टिकविण्याचे आव्हान अधिक गंभीर होत असताना मधू कांबीकर यांच्यासारख्या कलाकारांचे योगदान नव्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मधू कांबीकर यांनी आपल्या कलेतून मराठी मातीचा अस्सल गंध जपला. पडद्यावरील भूमिका, रंगमंचावरील अदाकारी आणि लावणीतील त्यांची अभिव्यक्ती रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.