उत्तर प्रदेशात ‘राधे-राधे’चा नारा

Uttar Pradesh Politics
दिल्ली वार्तापत्र
Published on: 
Updated on: 

उमेश कुमार

उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. भाजपच्या ‘राधे-राधे’च्या घोषणेपासून समाजवादी पक्षाच्या 'पीडीए’ रणनीतीपर्यंत राजकीय हालचालींना वेग आला आहे. ओवैसी-चंद्रशेखर रावण यांची नवी आघाडी आणि राजा भैयांच्या रामकथेने राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय समीकरण जुळवण्यास सुरुवात केली आहे. भाजपची मथुरा येथे झालेली बैठक या बदलत्या रणनीतीचे संकेत देणारी ठरली आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणेद्वारे पक्षाने अयोध्या आणि पूर्व उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या राजकारणाला धार दिली होती. श्रीराम मंदिराची उभारणी आणि प्राणप्रतिष्ठेनंतर आता मथुरेतून ‘राधे-राधे’चा नारा देत पश्चिम उत्तर प्रदेशात राजकीय पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भागात जाट, गुर्जर, राजपूत, त्यागी यांसह विविध प्रभावशाली समाजघटकांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांची सांगड स्थानिक सामाजिक समीकरणांशी घालण्याची भाजपची रणनीती दिसते.

समाजवादी पक्षानेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अखिलेश यादव यांचा गोरखपूरमधील रोड शो हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून पूर्वांचलमध्ये पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न मानला जात आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सपाने भाजपला कडवी झुंज दिली होती; मात्र पूर्वांचलमधील अनेक भागांत अपेक्षित यश मिळाले नव्हते. आता मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक अर्थात ‘पीडीए’ या समीकरणाच्या माध्यमातून मतदारांना एकत्र ठेवण्याचा सपाचा प्रयत्न आहे. भाजपच्या हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या राजकारणाला प्रत्युत्तर देताना हे सामाजिक समीकरण टिकवून ठेवणे, हे अखिलेश यादव यांच्यासमोरील मोठे आव्हान असेल.

याच पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षातील आघाडीने निवडणुकीची रंगत वाढवली आहे. या दोन्ही नेत्यांनी उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. मुस्लीम आणि दलित मतदार हे या आघाडीचे प्रमुख लक्ष्य आहेत. या दोन्ही पक्षांना अपेक्षित यश मिळाल्यास सपा आणि काँग्रेससोबतच बहुजन समाज पक्षाच्या पारंपरिक मतपेढीवरही परिणाम होऊ शकतो. विरोधी मतांचे विभाजन झाल्यास त्याचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मात्र, या आघाडीची खरी ताकद आताच ठरवणे घाईचे ठरेल. २०२२ मध्ये एमआयएमने ९२ जागांवर निवडणूक लढवली होती; मात्र एकही जागा जिंकता आली नव्हती. पक्षाला सुमारे ०.४९ टक्के मते मिळाली होती, तरीही सात मतदारसंघांत एमआयएमच्या उमेदवारांना मिळालेली मते सपा-काँग्रेसच्या उमेदवारांच्या पराभवाच्या फरकापेक्षा अधिक होती. चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाने ११० जागांवर निवडणूक लढवून सुमारे ०.१३ टक्के मते मिळवली होती. त्यावेळी मोठे यश मिळाले नसले, तरी नगिना लोकसभा मतदारसंघातील विजयामुळे चंद्रशेखर यांचे राजकीय वजन वाढले आहे.

उत्तर प्रदेशात दलित मतदारांची संख्या सुमारे २१ टक्के, तर मुस्लीम मतदारांची संख्या जवळपास १९ टक्के असल्याचे मानले जाते. दोन्ही समाजांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ४० टक्के आहे; मात्र या मतांचे एकत्रित राजकीय शक्तीत रूपांतर करणे सोपे नाही. दलित आणि मुस्लीम समाजाच्या राजकीय प्राथमिकता, सामाजिक अपेक्षा आणि स्थानिक परिस्थिती वेगवेगळी आहे. दलित राजकारणात बसपाचे स्थान दीर्घकाळ महत्त्वाचे राहिले आहे, तर भाजपला रोखण्यासाठी मुस्लीम मतदारांचा मोठा वर्ग सपा आणि काँग्रेसला पाठिंबा देत आला आहे.

सीएसडीएस-लोकनीतीच्या सर्वेक्षणानुसार, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७९ टक्के मुस्लीम मतदारांनी सपाला मतदान केले होते, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ९२ टक्के मुस्लीम मतदारांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मुस्लीम मतदारांमध्ये सपाची मजबूत पकड असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे ओवैसी यांच्यासाठी या मतपेढीत शिरकाव करणे आव्हानात्मक असेल. बिहार आणि महाराष्ट्रात एमआयएमने राजकीय उपस्थिती दाखवून दिली आहे. बिहारमध्ये एमआयएममुळे राजद आघाडीसमोर काही मतदारसंघांत मतविभाजनाचे आव्हान निर्माण झाले होते. उत्तर प्रदेशातही असेच झाले, तर सपाच्या ‘पीडीए’ समीकरणाला मोठा धक्का बसू शकतो; मात्र त्याचा भाजपला किती फायदा होईल, हे उमेदवारांची निवड आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल.

आणखी एक महत्त्वाचा घटनाक्रम म्हणजे, प्रतापगडमधील कुंडा येथे आयोजित केलेली रामकथा. रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन करून धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियता दाखवून दिली आहे. राजा भैया यांनी हा कार्यक्रम सनातन धर्म आणि हिंदुत्वाशी संबंधित धार्मिक सोहळा असल्याचे सांगितले असले, तरी त्याच्या राजकीय अर्थांची चर्चा सुरू झाली आहे. राजा भैया यांनी १९९३ मध्ये प्रथमच अपक्ष उमेदवार म्हणून कुंडा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर सलग या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवले. सुमारे ३३ वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी कोणत्याही मोठ्या पक्षाचे नेतृत्व स्वीकारले नाही; मात्र बदलत्या सत्तांशी त्यांचे संबंध कायम चर्चेत राहिले. भाजप आणि सपा या दोन्ही पक्षांना त्यांच्या प्रभावाची दखल घ्यावी लागली. विविध सरकारांमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले आहे.

कुंडा येथील रामकथेला उत्तर प्रदेशासह बिहार, राजस्थान आणि अन्य राज्यांतील अनेक प्रभावशाली राजपूत नेत्यांनी उपस्थिती लावली. बांसी राजघराण्याचे जय प्रताप सिंह, अमेठी राजघराण्याचे संजय सिंह आणि हैदराबादचे टी. राजा सिंह यांसारखे चर्चित चेहरे या कार्यक्रमात सहभागी झाले. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित राजपूत नेते एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याने या आयोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या कार्यक्रमाची तयारी राजा भैया यांनी अचानक केलेली नव्हती. २०२४ मध्ये त्यांनी बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांचे दोन्ही पुत्रही उपस्थित होते. आता रामकथेच्या माध्यमातून प्रतापगडसह प्रयागराज, कौशांबी, अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, जौनपूर, वाराणसी आणि फतेहपूर या जिल्ह्यांपर्यंत सामाजिक व राजकीय संपर्क वाढवण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जाते. या जिल्ह्यांतील ५० हून अधिक विधानसभा मतदारसंघांत विविध सामाजिक समीकरणे निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकतात.

या आयोजनाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राजपूत समाजातील प्रभावशाली नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणणे. राजा भैया यांची क्षत्रिय समाजात स्वतःची ओळख आणि स्वीकारार्हता आहे. त्यामुळे या उपस्थितीकडे सामाजिक एकजुटीचा संदेश म्हणूनही पाहिले जात आहे. याला औपचारिक राजकीय आघाडी म्हणणे घाईचे ठरेल. मात्र, धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सामाजिक संपर्क आणि राजकीय संवादाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. निवडणूक काळात अशा संपर्कांचा राजकीय फायदा मिळू शकतो.

उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. सध्या सुरुवातीच्या चाली खेळल्या जात आहेत. आगामी काळात नवी समीकरणे, आघाड्या आणि रणनीती समोर येईल. ही लढाई केवळ घोषणांची किंवा सत्ताधारी-विरोधकांची न राहता सामाजिक जनाधार, धार्मिक प्रतीके, राजकीय प्रभाव आणि रणनीतिक कौशल्य यांची कसोटी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.