यंदाच्या जागतिक निवडणूक वर्षामध्ये भारताबरोबरच अमेरिकेमध्ये होणार्या निवडणुकांकडेही जगाचे लक्ष लागून राहिले आहे. नोव्हेंबरमध्ये होणार्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन यांचे पूर्वसुरी राहिलेले डोनाल्ड ट्रम्प जोरदार पुनरागमन करण्याची शक्यता दिवसागणिक स्पष्ट होत चालली आहे. पुरुष, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, डावे, उजवे या सर्वांमध्ये ट्रम्प लोकप्रिय होत आहेत.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. रिपब्लिकनचे नेते म्हणून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येत आहे. गेल्या चार वर्षांत अमेरिकेत असे काय घडले की, त्यामुळे ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. सध्या जग बिकट स्थितीतून वाटचाल करत असून, त्यामुळे लहान-मोठ्या देशांसमोर धोरणात्मक आव्हाने उभी राहत आहेत. अशा स्थितीत सर्वांना आशेचा किरण दाखविणे अपेक्षित असताना अमेरिकेसारखा जागतिक महासत्ता असणारा देश अंतर्गत राजकारणाच्या समस्येने त्रस्त आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या या निवडणुकीची दिशा अन्य कोणी नसून, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निश्चित करत आहेत. ट्रम्प हे केवळ न्यायालयीन खटल्यातच अडकलेले नेते नाहीत, तर त्यांनी एकदा अमेरिकी लोकशाही तत्त्वांनाही आव्हान दिलेले आहे; पण तेच पुन्हा स्वत:ला अमेरिकी घटनेचे तारणहार आणि संरक्षक म्हणून सांगत आहेत. एवढेच नाही, तर अमेरिकेचे नागरिकही त्यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवत आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षात झालेल्या पहिल्या लढतीत ट्रम्प यांनी आयोवा रिपब्लिकन कॉकसमध्ये ऐतिहासिक विजय नोंदविला. आयोवाच्या 99 कौटींपैकी 90 कोटी मते त्यांना मिळाली. त्यांना सर्वच स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. पुरुष, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, दक्षिणपंथीय आणि रूढीप्रिय तसेच कॉलेजमध्ये शिकलेले रिपब्लिकनही त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. रिपब्लिकमध्ये ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीला भारतीय वंशाच्या निकी हॅले आव्हान देत आहेत; मात्र त्यांच्यासाठी पुढचा राजकीय मार्ग कठीण आहे. अर्थात, हॅले यांनी न्यू हॅम्पशायरमध्ये चांगली कामगिरी केली; मात्र तेथेही ट्रम्प यांनीच विजय मिळवला आहे. साहजिकच हॅले या स्पर्धेत राहत असल्या तरी रिपब्लिकनचे उमेदवार ट्रम्पच राहण्याची शक्यता अधिक आहे. हॅलेंच्या आव्हानांचा बीमोड करण्यासाठी ट्रम्प यांनी हॅली यांच्या मूळ वंशाचा मुद्दा उकरून काढला आहे. एकप्रकारे त्यांनी हॅलींविरुद्ध अपप्रचार सुरू केला आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे आई-वडील अमेरिकी नागरिक नव्हते आणि त्यामुळे त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा अपप्रचार ट्रम्प यांनी सुरू केला. अशा प्रखर टीकेला सामोरे जात असताना हॅले यांनी ट्रम्प यांना संयमाने उत्तरे दिली. त्या ट्रम्प यांच्यावर टीका करताना ट्रम्प समर्थकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचीदेखील खबरदारी घेताना दिसल्या. आपण रिपब्लिकनच्या अराजकतेने डेमोक्रॅटिक अराजकतेला पराभूत करू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प आणि बायडेन यांच्यावर एकाचवेळी टीका केली.
सन 2020 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपण पराभूत झालो नव्हतो, असे रिपब्लिकन समर्थकांना पटवून सांगण्यात ट्रम्प यशस्वी ठरले आहेत. याप्रकरणी त्यांना न्यायालयात अनेकदा ओढले आणि तितक्याच प्रमाणात त्यांची लोकप्रियताही वाढली. ट्रम्प यांना राजकीय हेतूने टार्गेट केले जात असल्याचे समर्थक म्हणत आहेत. एकंदरीतच या निवडणुकीच्या काळात माजी राष्ट्राध्यक्षाला आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारास वेगळी प्रतिमा देण्याचे काम ट्रम्प यांनी केले आहे. आतापर्यंत अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील पराभूत उमेदवार हा कालांतराने सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायचा आणि गायब व्हायचा. त्याचे वलय कमी व्हायचे. ट्रम्प याला अपवाद ठरत आहेत, असे म्हणावे लागेल. चार वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी राष्ट्राध्यक्ष हे ट्रम्प यांच्या रूपातून आपल्यासमोर उभा आहे; मात्र त्यांनी पराभव मान्य न करता 6 जानेवारी रोजी कॅपिटॉल हिल येथे घडलेल्या हिंसाचाराला पाठिंबा दिला. परिणामी, ट्रम्प यांचे नाव मेनेन आणि कोलरार्ड येथील मतपत्रिकेतून वगळले. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. असे असतानाही ते जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर वापसी करत आहेत. आपण अगदी धुतल्या तांदळासारखे आहोत, असे चित्र त्यांनी निर्माण केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून रिपब्लिकन पक्षही ट्रम्प यांचा पिच्छा सोडविण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र आयोवा येथे त्यांना मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहता तेच रिपब्लिकनचे प्रमुख नेते आहेत, हे सिद्ध झाले. आज जीओपी (ग्रँड ओल्ड पार्टी) म्हणजेच रिपब्लिकन पक्ष हा एकप्रकारे ट्रम्पमय झालेला दिसतो. विरोधकही काहीच करू शकले नाहीत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक आघाडीवर ट्रम्प समर्थकांनी चांगली पकड मिळवली आहे. या कारणांमुळे ते प्रतिस्पर्ध्यावर वरचढ ठरत आहेत. पक्षातील आणि पक्षाबाहेर अनेक स्पर्धकांनी कितीही प्रयत्न केले असतील किंवा होत असतील, तरी बायडेन यांना आता ट्रम्पच आव्हान देणार आहेत, हे स्पष्ट होत आहे.
अर्थात, अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा परिणाम हा 'स्विंग स्टेटस्'वर अवलंबून राहील आणि अलीकडच्या सर्वेक्षणात तेथेही ट्रम्प यांची स्थिती चांगली असल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक केवळ स्थानिकांसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. ट्रम्प यांच्या वापसीच्या शक्यतेवर मॉस्कोपासून पेइचिंगपर्यंत आणि ब—ुसेल्सपासून नवी दिल्लीपर्यंत सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेत आगामी काळात संस्थांतर्गत रचनेला हादरा बसण्याची शक्यता म्हणूनही याकडेही पाहिले जात आहे. आतापर्यंत जगाला लोकशाहीच्या उपदेशाचे डोस पाजणारा अमेरिकेसारखा देश आज स्वत:च लोकशाहीचे हरण करणार्या नेत्यास पुन्हा सत्तेत बसविण्यासाठी सज्ज झाला आहे.