

सुमारे तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युद्ध आता लवकरच संपेल, असे म्हटले होते. संपूर्ण जगात या वक्तव्याचे स्वागत झाले आणि जागतिक व्यापारही सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त झाली. परंतु इस्रायल व अमेरिकेने संघर्ष जारीच ठेवल्यामुळे पुन्हा एकदा निराशेच्या ढगांनी जग झाकोळून गेले. नंतर युद्धविरामाच्या काळातही युद्ध सुरूच होते. आता तर अमेरिकेचे सैन्य पश्चिम आशियात दाखल होत असून, हा संघर्ष आणखी रक्तरंजित होईल, अशीच चिन्हे आहेत. अमेरिकेच्या सैन्याला आगीमध्ये लोटून देण्यासाटी आणि पश्चिम आशियातील अमेरिकेच्या भागीदारांना अद्दल घडवण्यासाठी इराण सज्ज आहे. आम्ही अमेरिकेच्या सैन्याची वाटच पाहात आहोत, असे प्रतिआव्हान इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद कालिबाफ यांनी दिले आहे.
एकीकडे अमेरिका इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्याचे माध्यमांना सांगते आणि दुसरीकडे जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी करते. यामुळे इराण संतापलेला आहे. अमेरिकेस इराणकडून शरणागती हवी असली, तरीदेखील आम्ही कधीही झुकणार नाही, असा हल्लाबोल कालिबाफ यांनी केला आहे. शिवाय हे युद्ध आणखी व्यापक झाले असून, इराणसमर्थित येमेनमधील हुथी बंडखोरांनीदेखील इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आहे. आपण सहज विजय मिळवू, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प यांना वाटत होते. पण तसे घडलेले नाही. तसेच या युद्धात आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. आता अमेरिकेत या युद्धास तीव— विरोध होत असून, अमेरिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 50 राज्यांमध्ये 3200 पेक्षा अधिक ठिकाणी युद्धाच्या विरोधात ‘नो किंग्ज’ निदर्शने करण्यात आली. यापूर्वी दोनवेळा आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांना लाखो अमेरिकनांनी समर्थन दिले होते. युद्ध सुरू झाल्यापासून करण्यात आलेल्या दोन जनमत चाचण्यांमध्ये ट्रम्प प्रशासनाची लोकप्रियता कमालीची घटल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेत होणार्या आगामी मध्यावधी निवडणुकांत रिपब्लिकनांना याचा फटका बसू शकतो. इस्रायल व अमेरिकेने शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे हल्ले करूनदेखील इराण नमायला काही तयार नाही. त्यामुळे इराणची राजवट बदलून तिथे आपले प्यादे बसवण्याचे अमेरिकेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी चिन्हे नाहीत. उलट इराणमधील हजारो लोक तेथील राजवटीच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. इराणमधील वेगवेगळ्या शहरांत अमेरिकेचा व इस्रायलचा जोरदार निषेध केला जात आहे. लढाईत अमेरिकेला अद्याप यश मिळत नसल्यामुळे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे समर्थकही निराश झालेले आहेत.
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, डलास, फिलाडेल्फिया, लॉस एंजेलिस, सिएटल या सर्व शहरांत जवळपास 90 लाख लोकांनी ट्रम्प यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यापूर्वी ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यापासून स्थलांतरितांच्या संबंधात राबवलेल्या धोरणाला विरोध म्हणून ‘नो किंग्ज’ आंदोलन झाले होते. आता युद्धामुळे अनेक वस्तू बाजारात मिळेनाशा झाल्या असून, महागाई वाढली आहे. शिवाय हे युद्ध केवळ इराणपुरते मर्यादित नसून, पश्चिम आशियातील अनेक देशांत ते पसरले आहे. इराणमध्ये शाळेत जाणार्या अनेक मुली बॉम्बहल्ल्यात मरण पावल्या. तेहरानमधील इराण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या जगद्विख्यात संस्थेचे अतोनात नुकसान झाले आहे. निवासी भागांवर बॉम्ब टाकण्यात आले असून, त्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. हजारो लहान मुले आणि महिला जखमी झाल्या असून, याआधीच्या अमेरिकेच्या इराक व अफगाणिस्तानमधील युद्धात असेच घडले होते.
एखाद्या देशाच्या दहशतवादास विरोध करताना, तेथील सामान्य जनतेला लक्ष्य करणे चूक आहे, ही जगातील प्रत्येक शांततावाद्याची भूमिका असते. अमेरिकेतील निदर्शनांत ब—ुस स्प्रिंगस्टीन, रॉबर्ट डी निरो अशा नामवंत कलावंतांनीदेखील भाग घेतला. परंतु याची दखल घेण्याऐवजी या निदर्शनांना डाव्या विचारसरणीच्या लोकांनी निधी पुरवला आहे आणि त्यांना नागरिकांचा फारसा पाठिंबा मिळालेला नाही, अशी टीका व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने केली. वास्तविक हे लोक विविध थरांतील आणि विविध विचारांचे होते. त्यांच्यावर असा शिक्का मारणेच चुकीचे आहे. लाखो लोकांचा सहभाग असलेल्या या निदर्शनांबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हेही गैर आहे. ‘आम्हाला राजेशाही किंवा हुकूमशाही नको, तर लोकशाही हवी आहे’, अशी घोषणाबाजी लोक करत होते. संसदेला विश्वासात न घेता किंवा प्रशासनातील जबाबदार लोकांचा सल्ला न घेता ट्रम्प यांनी इराणविरोधी युद्धात इस्रायलची साथ केली आहे. जनतेला हे मुळीच रुचलेले नाही. रोम, लिस्बन, पॅरिस अशा शहरांतही ‘नो टायरंटस्’ असे बॅनर्स झळकावून मोर्चे काढण्यात आले. इस्रायलमध्येही नेतान्याहू यांच्या धोरणाविरोधात नाराज झालेली जनता रस्त्यावर आलेली आहे. एकेकाळी अमेरिकेने व्हिएतनामवर आक्रमण केले होते. त्यावेळी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.
1964 मध्ये सुरू झालेले हे युद्ध जवळजवळ 1973 पर्यंत सुरू राहिले. अमेरिकेने व्हिएतनामवर 7 दशलक्ष टन भरतील, इतक्या बॉम्बचा वर्षाव केला होता. तरीही मर्यादित शस्त्रसामग्रीसह लढणार्या व्हिएतनामी पीपल्स आर्मीच्या इच्छाशक्तीपुढे साम—ाज्यवादी अमेरिकेचा टिकाव लागू शकला नव्हता. त्या युद्धात 20 लाख लोक मरण पावले आणि 60 हजार सैनिक कामी आले. हजारो अमेरिकन सैनिकांचा बळी गेल्यामुळे तेथील लोकांनी मोर्चे काढून अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष एल. बी. जॉन्सन यांच्या युद्धखोरीविरोधात चळवळ उभी केली होती. जॉन्सन यांच्यानंतर अध्यक्ष बनलेले रिचर्ड निक्सन यांनीही हे युद्ध जारीच ठेवले. व्हिएतनाममधील सैन्य माघारी बोलवून युद्धबंदी करावी, अशी मागणी अमेरिकेतील जनतेने लावून धरली होती. शेवटी व्हिएतनाम युद्धात अमेरिकाच नामोहरम झाली. यथायोग्य कारण असल्याशिवाय युद्ध करणे, हे चुकीचेच आहे. तसेच इस्रायल व अमेरिकेने युद्धातील किमान सभ्यताही ठेवलेली नाही. या युद्धखोरीची किंमत ट्रम्प आणि नेतान्याहू यांना आज ना उद्या चुकवावीच लागणार आहे!