बायडेन यांची माघार!

राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीतून माघार
US Elections 2024 Joe Biden
जो बायडेन निवडणुकीतून अचानक माघार घेतली.Pudhari File Photo
Published on
Updated on

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्या देशातील निवडणूक समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. 1963 मध्ये जॉन केनेडी यांच्या हत्येनंतर लिंडन जॉन्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले; मात्र त्यांच्याच कारकिर्दीत व्हिएतनाम युद्ध होऊन, त्यात प्रचंड संख्येने अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. या युद्धात अमेरिकेस अपयशही आले. जॉन्सन यांची लोकप्रियता घसरणीस लागली, तरीही जॉन्सन पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहू पाहत होते; परंतु न्यू हॅम्पायर येथील ‘प्रायमरीज’मध्ये निराशाजनक निकाल आल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा प्रकार आता बायडेन यांच्याबाबतच घडला आहे. अलीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या अध्यक्षीय उमेदवारांमधील जाहीर वादविवादात बायडेन सपशेल पराभूत झाले. तसेच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, संसदेच्या माजी सभाध्यक्ष नॅन्सी पलोसी प्रभृतींनी बायडेन यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला व्हावे, अशी मागणी केली होती.

US Elections 2024 Joe Biden
लाडक्या भावालाही पाठबळ

बायडेन यांनी माघार घेताना हॅरिस यांचे नाव पुढे केले आहे, हे विशेष. अलीकडील काळात बायडेन यांच्या अनेक शिखर परिषदांमधील व अन्य कार्यक्रमांमधील भाषणांत वारंवार चुका होऊ लागल्या होत्या. त्यांना काही व्यक्तींची नावे वा तपशील पटकन आठवत नव्हता. विमानाच्या शिड्या चढताना, तसेच सार्वजनिक समारंभांमध्ये ते बरेचदा धडपडून पडलेही. त्यामुळे शारीरिकद़ृष्ट्या ते कितपत फिट आहेत, असा प्रश्न विचारला जात होता. बायडेन हेच राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार असल्यास, त्यांचा तर पराभव होईलच, परंतु डेमॉक्रॅटिक पक्षाचीही हानी होईल, असे मत पक्षातूनच व्यक्त केले जात होते. ट्रम्प यांची आक्रमकता, बेधडकपणा, नाट्यात्मकता आणि छाप पाडणारे वक्तृत्व यांच्या तुलनेत बायडेन फिके पडणार, हे दिसतच होते. त्यातच नुकताच ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याने त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. मिशिगनमध्ये केलेल्या एका पाहणीत ट्रम्प यांना 49 टक्के, तर बायडेन यांना 42 टक्के मते पडली. आता विचारपूर्वक माघार घेऊन ट्रम्प यांचा विजय सहजासहजी होणार नाही, याची काळजी बायडेन यांनी घेतली आहे. 2020 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बायडेन उभे राहिले, तेव्हा त्यांनी कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी लगेच निवड केली होती. वास्तविक, आपण अध्यक्षपदासाठी पुन्हा उभे राहणार नाही, असे तेव्हाच त्यांनी जाहीर केले होते; परंतु चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ते रिंगणात उतरलेच. त्यामुळे डेमॉक्रॅटिक पक्षाचेही एकप्रकारे नुकसानच झाले. आता डेमॉक्रॅटिककडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून बायडेन यांनी कमला यांना आपला पाठिंबा जाहीर केला असला, तरी कमला यांना पक्षांतर्गत निवडणुकीत आधी इतर उमेदवारांवर मात करावी लागेल. एकदा डेमॉक्रॅटिकतर्फे त्यांच्या उमेदवारीवर शिक्का मारला गेल्यानंतर मगच निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल, असे दिसते. कमला यांची वांशिक मुळे आफ्रिकी व भारतीय आहेत.

US Elections 2024 Joe Biden
धोका ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’चा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी यापूर्वी ओबामा हे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. दोन टर्ममध्ये त्यांनी विलक्षण चमक दाखवली होती. तसेच हिलरी क्लिंटन या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार्‍या अमेरिकेतील पहिल्या महिला ठरल्या होत्या. अमेरिकेच्या 200 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या लोकशाहीच्या इतिहासात अमेरिकेने केवळ एकदा कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष निवडला असून, एकदाही या पदावर महिलेची निवड झालेली नाही. ट्रम्प यांना अमेरिकेतील अतिउजव्या, जहाल गटांचा पाठिंबा असून, त्यापैकी बहुसंख्य स्त्री-पुरुष समतेच्या विरोधात तसेच कृष्णवर्णीय व आशियाईंचा द्वेष करणारे आहेत. त्यामुळे कमला यांच्यासमोरील आव्हान फार मोठे आहे. शिवाय ट्रम्प यांनी व्यक्तिगत जीवनात स्त्रियांशी दुर्व्यवहार केला असून, महिलांबद्दल गलिच्छ शेरेबाजीही केलेली आहे. त्यामुळे आता प्रचारात ते कोणती पातळी गाठतील, याचा सहज अंदाज येऊ शकतो. बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर, कमला यांचा पराभव करणे अधिकच सोपे जाणार असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. कमला यांचा आत्मविश्वास कमी व्हावा, या द़ृष्टीने ट्रम्प यांनी प्रयत्न चालवले असल्याचे स्पष्ट दिसते; परंतु ट्रम्प 78 वर्षांचे असून, कमला या त्याच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान आहेत. उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांना प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे. गर्भपाताच्या हक्काविषयी त्यांची भूमिका पुरोगामी असल्यामुळे तरुण मतदारांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.

US Elections 2024 Joe Biden
संवादाच्या अभावामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

अमेरिकेतील कृष्णवर्णीय व आशियाईंमध्ये त्यांना चांगले समर्थन लाभेल. तसेच वादविवादात त्या हरणार नाहीत. बायडेन यांच्यापेक्षा कमला यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहणे आवडेल, असे बहुसंख्य नागरिकांचे मत असल्याचे पाहणी अहवालही सांगतात. 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन पराभूत झाल्या आणि ट्रम्प विजयी ठरले. हिलरी या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीही होत्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात तरबेज होत्या. उलट ट्रम्प यांना जागतिक राजकारणाच्या बारकाव्यांची माहिती नव्हती आणि आपल्या संकुचित आर्थिक धोरणांमुळे त्यांनी देशाला अडचणीत आणले. त्यांच्या युद्धखोर धोरणांमुळे अमेरिकेचे चीन, इराण, सीरिया या देशांशी संबंध बिघडले. युरोपीय देशांच्या ‘नाटो’ संघटनेशीही त्यांनी संघर्ष केला. आता कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गाविन न्युसम आणि मिशिगनचे गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर हेसुद्धा डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत आहेत; परंतु कमला यांचा बोलबाला जास्त असून, उमेदवार म्हणून निवड झाल्यास प्रचारासाठी मात्र त्यांच्याकडे केवळ शंभरच दिवस उपलब्ध असतील. भारताने रशियाप्रमाणेच अमेरिकेशीही सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत. कमला यांचे भारताशी वांशिक नाते असले, तरी त्या राष्ट्राध्यक्ष झाल्यास त्या भारताचे नव्हे, तर अमेरिकेचेच हितसंबंध जोपासण्यास प्राधान्य देतील, हे लक्षात ठेवले पाहिजे. रिपब्लिकन अथवा डेमॉक्रॅटिकचा राष्ट्राध्यक्ष झाला, तरी अमेरिकेशी संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करत, आपले हितसंबंध सुरक्षित ठेवणे, हेच भारताचे धोरण असेल.

US Elections 2024 Joe Biden
धोका ‘डिजिटल हाऊस अरेस्ट’चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news