Maharashtra Politics News | देर आये! ठाकरे दुरुस्त आये?

mumbai vartapatra
mumbai vartapatra
Published on
Updated on

मृणालिनी नानिवडेकर

उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘गद्दारां’च्या मतदारसंघांत जाऊन आले. त्यामुळे काय साधले? फडणवीस यांना ते टोमणे मारताहेत की, अडचणीत आणताहेत?

गेले वर्षभर ‘उबाठा’चे खासदार शिंदे सेनेत जाणार, हे उघड पडलेले गुपित होते. अखेर मतांचा कौल काय होता, याचा विचार न करता अर्धा डझन खासदार पळाले. त्यांच्या जाण्याची वेळ आगामी संसद अधिवेशनात मतदारसंघ फेररचना आणि महिला आरक्षण विधेयक पारित होण्यासाठी भाजपने ठरवली असावी. त्यांच्या संख्याबळाचा सत्ताधारी युतीला लाभ होईल, त्यासाठीच तर पक्षांतर घडवले आहे! पण जसा सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला या घटनेचा फायदा आहे तसाच तो उद्धव ठाकरे यांनाही होऊ शकतो आहे. कोणतेही पटेल असे कारण नसताना खासदारांनी बाजू बदलली, तर ते त्यांच्या मतदारांना आवडत नाही. समाजमाध्यमांवर ते दिसते आहेच; शिवाय ‘सी व्होटर’ने केलेली पाहणीही तसेच दाखवते आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता दिसते आहे.

पाऊस दडी मारून बसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. जेमतेम २ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ‘नीट’ परीक्षेपाठोपाठ आता शिक्षकांची भरती करणाऱ्या ‘टीईटी’चा पेपरदेखील फुटला. जागतिक बाजारपेठा युद्ध घटनांमुळे कोसळल्‍या आहेत. महागाई वाढते आहे. रोजगारनिर्मितीच्या पातळीवर लक्षणीय कामगिरी केंद्र सरकार करू शकलेले नाही. काय झाले, यापेक्षाही काय झाले नाही, याचे हिशेब मांडणे जनतेने सध्या तरी सुरू केले आहे; कारण सरकारची ही तिसरी टर्म आहे. सगळा देश अस्वस्थ असताना खासदार फुटले आहेत. कशासाठी सांगता येत नाही अन्‌ कुणासाठी तर ‘अँटी इन्कम्बन्सी’चे जोखड असलेल्या सरकारसाठी. खासदार फुटले हे दुर्दैव; पण ज्या परिस्थितीत ते एका अर्थाने सुदैव. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ६ ‘गद्दार’ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये गेले. खरे तर गेल्या किमान सहा महिन्यांपासून अर्धा डझन खासदारांची संख्या गोळा करण्याचे प्रयत्न शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना करते आहे, हे उघडे पडलेले गुपित होते. या कुजबुजीची दखल घेत उद्धव ठाकरे जर लवाजम्यासह या भागात आधीच गेले असते, तर कदाचित या खासदारांना पक्षांतर करताना हजारवेळा विचार करावा लागला असता. ही मंडळी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला कडाडून विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीतून निवडून आली होती.

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राने विरोधी आघाडीला पसंत केले होते; पण अवघ्या दोन वर्षांपूर्वीचा हा कौल विसरून ही मराठमोळी मंडळी का फुटली, हा प्रश्न राहतो. हा प्रश्न उद्धव ठाकरे प्रभावीरीत्या मांडू शकले, तर कायम शिवसेनेच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मराठवाड्यातील परभणी, धाराशिव, विदर्भाशी लगटून असलेल्या यवतमाळ, वाशिममधला मतदार त्यांच्यासमवेत राहण्याची शक्यता वाढेल. निवडून आलेले नेते गेले, तरी ‘उबाठा’चा मतदार कदाचित कुठेही जाणार नाही; पण जर संपर्क ठेवला तर! उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांना भेटायला आवडत नाही, अशी सातत्याने तक्रार केली जाते. कार्यकर्त्यांना सहज भेटलो तर आपले महत्त्व कमी होईल? असे त्यांना वाटते आहे काय, याबद्दलही तर्कवितर्क लढवले जातात. खरे काय ते कळत नाही.

उद्धव ठाकरे प्रकृतीमुळे फिरू शकत नसतील; पण आदित्य ठाकरे आणि अन्य पदाधिकारीही फारसे फिरत नाहीत. अगदी नगरपरिषद निवडणुकांत मुंबईकर नेते कुठेही गेले नाहीत. शिंदे मात्र संपर्क ठेवतात, फिरतात, असे वातावरण तयार झाले. हा झपाटा त्यांच्या मित्रपक्ष भाजपच्याही चिंतेचा विषय आहे म्हणतात. आता उशिराने, खासदार निघून गेल्यावर का होईना ६ मतदारसंघांचा दौरा उद्धव ठाकरे यांनी केला. तो सहानुभूती निर्माण करू शकेल का? बाहेर पडलेले, बांधावरचे ठाकरे लोकांना खरे विरोधक वाटण्याची शक्यता आहेही! मोदी लाटेत २०१४ मध्‍ये स्वबळावर लढून ६३ आमदार निवडून येण्याचा विक्रम उद्धव यांच्याच नावावर जमा आहे. त्यामुळे संकटातून संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपर्क ठेवत नाहीत, आमच्यात येत नाहीत, हे आरोप ‘गद्दारां’बद्दलच्या गदारोळात उडून गेले असते; पण या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी अकारण भाजपमधल्या अंतर्गत राजकारणाचा मुद्दा हाती घेतला आहे.

मुळात भारतीय जनता पक्षामध्ये परस्परांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे राजकारण अजून तरी मर्यादेत आहे. छोटा-मोठा विरोध जरूर होतो; परंतु सत्ता हातातून जाईल असले कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात एक संघर्ष उभा असल्याचे बहुचर्चित चित्र हाती धरून उद्धव ठाकरे यांनी साधले काय? असा प्रश्न आहे. योगायोगाने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे आजी-माजी मुख्यमंत्री नागपूरला पोहोचले यातून श्लेष काढायचा तरी किती? शिवाय आज फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावे, असे उद्धव ठाकरे यांना वाटते तर त्यांच्यावरचे हे प्रेम २०१९ मध्‍ये गेले कुठे होते? असा प्रश्नदेखील महाराष्ट्राला पडू शकेल. मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीचा सामना जवळपास बरोबरीत सुटला होता. केवळ दोन नगरसेवक कमी होते. ते कुठूनही आणणे सहज शक्य असताना महाराष्ट्रातील सत्ता जपण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांचा मान ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मुंबईचे महापौरपद दिले होते. हा इतिहास जनता इतक्या लवकर विसरेल का? बंद दरवाजाआड दिल्याघेतल्या आश्वासनात फडणवीस नव्हतेच. त्यांचे जिंकूनही नुकसान झाले. आता त्यांना पुन्हा ठाकरे का लक्ष्य करीत आहेत?

खरे मुद्दे वेगळे आहेत. घराण्याच्‍या लोकप्रियतेमुळे मराठवाड्याच्या ‘खानविरुद्ध बाण’ अशा धार्मिक संघर्षाच्या प्रदेशातील जनता ‘उबाठा’बरोबर उभी राहिली. त्या कौलाशी ‘गद्दारी’ करणाऱ्या खासदारांनी हा निर्णय का घेतला? शिंदे का लोकप्रिय ठरत आहेत? याचाही विचार ‘मातोश्री’ला कधी तरी करावा लागेलच. शिंदे शत्रू आहेत, हे मान्य; पण त्यांना खलनायक ठरवण्यासाठी आता फडणवीस यांना सहानुभूती दाखवणे हा विचित्र भाग आहे. अशातून काहीही साध्य होत नसते. महाराष्ट्रातल्या एका उमद्या नेत्याने, फडणवीस यांनी महाराष्ट्र पायाभूत सुविधांत समोर नेला.

२०१४ ते १९ सारखे काम त्यांना सक्षमपणे चालवता येते आहे का, हा सध्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटनांमुळे आणि खालावलेल्या राजकीय संस्कृतीमुळे कदाचित पकड बसवणे कठीण होत असावे. स्वतःच्या कार्यकुशलतेचा परिचय देत महाराष्ट्राचे भाग्य बदलणे आणि महाराष्ट्राला पूर्वीप्रमाणे भारतातले क्रमांक एकचे राज्य करणे हे फडणवीसांसमोरचे आव्हान आहे. ते हे आव्हान कसे पेलतात यावर त्यांचीच नव्हे, तर महाराष्ट्राची पुढची वाटचाल अवलंबून राहील. अशा वेळेला उद्धव ठाकरे केवळ स्वार्थासाठी पंतप्रधानपदाची चर्चा सुरू करणार असतील, तर ते महाराष्ट्राचे भले करणारे नाही. फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांचे जे व्हायचे ते होईल; मात्र खासदार ‘गद्दार’ का झाले, हे शोधून आपला पक्ष का आक्रसतो आहे, याचा शोध घ्यावा. सक्षम विरोधकाची भूमिका ‘उबाठा’ने निभवावी. पळून गेलेले खासदार हे काँग्रेस आणि आतापर्यंत महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुन्हेगार आहेत.

या दौऱ्यात त्यांनाही बरोबर नेता आले असते, तर त्याचाही लाभ झाला असता. हा दौरा स्वतःच्या राजकीय पक्षाची बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काढला आहे, हे सर्वजण जाणतात. अशा वेळेला चुका काय झाल्या याकडे लक्ष देताना अप्रत्यक्षरीत्या आपण फडणवीस यांची वाजवतो आहोत का, याचा विचार केलेला बरा. ‘दोस्त दोस्त ना रहा,’ असे सर्व पातळीवर करून कसे बरे चालेल?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news