अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक नेहमी नोव्हेंबरमधील पहिल्या मंगळवारी होत असते. 2024 ची निवडणूक मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी होणार असून, विजयी उमेदवार जानेवारी 2025 पासून व्हाईट हाऊसमध्ये चार वर्षांसाठी पदभार स्वीकारेल. अमेरिकेत पक्ष थेट उमेदवार जाहीर करत नाहीत, तर उमेदवार ठरवण्यासाठीही पक्षाचे सदस्य मतदान करतात, ज्याला प्राथमिक निवडणूक (कॉकस) म्हणून संबोधले जाते. यंदाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होती. सुरुवातीला यात नऊ रिपब्लिकन, चार डेमोक्रॅट आणि दोन अपक्ष अशा 15 उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी काही जण पूर्वीच शर्यतीतून बाहेर पडले होते. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चालू वर्षी आपण पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले; पण रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या डिबेट किंवा वादविवादात मागे पडल्यामुळे त्यांनी माघार घ्यावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक पक्षातूनच होऊ लागली. जुलैमध्ये बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या उमेदवारीस समर्थन दिले. कमला आणि ट्रम्प यांच्यातील ही निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची निवडणूक असल्याचे मानले जात आहे. दोन्ही उमेदवारांची जिंकून येण्याची शक्यता 50-50 टक्के आहे.
अध्यक्षीय निवडणुकीत 50 राज्ये आणि राजधानी वॉशिंग्टन जेथे आहे, तो कोलंबिया जिल्हा, यामधील मतदार अध्यक्षांची निवड करतात. प्रत्येक राज्याचा अध्यक्षीय निवडणुकीचा कोटा ठरलेला असतो. बहुतेक राज्यांमध्ये दोन्ही पक्षांचे निष्ठावंत मतदार आहेत; मात्र गेल्या काही वर्षांत काही राज्यांनी नेहमीपेक्षा वेगळा कल दाखवत दुसर्याच पक्षाला मतदान केले आहे, त्यांना ‘स्विंग स्टेटस्’ असे म्हटले जाते. 50 राज्ये आणि वॉशिंग्टन डीसीमधील मतदार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी मतदान करतात; पण ही निवड थेट नसते. प्रत्येक राज्यात दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी किंवा इलेक्टर असतात आणि त्यांची संख्या निश्चित असते. कॅलिफोर्निया राज्यात सर्वाधिक 54 इलेक्टर असून, टेक्सासमध्ये 40 इलेक्टर आहेत. एकूण 538 प्रतिनिधी किंवा इलेक्ट्रोरल मते असतात आणि यात 270 मते मिळवणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. मुख्य मतदान होण्याच्या अगोदर अनेक राज्यांमध्ये टपालाद्वारे मतदानाची प्रक्रिया सुरूही झालेली असते. अमेरिकेचे जगभरात वास्तव्यास असलेले मुत्सद्दी, राजनैतिक कर्मचारी, सैनिक आणि काही सामान्य नागरिक टपालाद्वारे मतदान करतात. कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्क राज्ये ही नेहमी डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करतात. टेक्सास हे रिपब्लिकनांच्या मागे उभे असते; मात्र पेन्सिल्वेनिया, व्हिस्कॉन्सिन, मिशिगन, जॉर्जिया, नोर्थ कॅरोलिना, अॅलिझोना आणि नेवाडा येथील या ‘स्विंग स्टेटस्’मधील 93 मते ही निर्णायक ठरणार आहेत; कारण ती कोणत्याही उमेदवाराकडे फिरू शकतात आणि त्यावर कोण अध्यक्ष होणार, हे ठरणार आहे. शिवाय ज्या राज्यांत हमखास अमुक पक्षाला मते मिळतात, अशा राज्यांमधील पारंपरिक मतदार त्या-त्या पक्षांवर नाराज झालेलेही बघायला मिळत असल्यामुळे निकालाबद्दल भाकीत व्यक्त करणे कठीण आहे.
ट्रम्प किंवा हॅरिस यांच्यापैकी कोणीही निवडून येऊ शकतो. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत वादविवादात कमला यांनी ट्रम्प यांच्यावर सहज मात केली. ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारावेळी दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली; पण त्याच वेळी वादग्रस्त वक्तव्ये करून ट्रम्प यांनी पायावर धोंडाही मारून घेतला. रिपब्लिकनच्या निवडणूक प्रचारासाठी न्यूयॉर्कच्या मॅडिसिन स्क्वेअर गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात अश्लीलतायुक्त तसेच वर्णद्वेषाचे समर्थन करणारी टिप्पणी झाल्यामुळे सार्वत्रिक टीका सुरू झाली. ट्रम्प यांचे बालमित्र डेव्हिड रेम यांनी कमला यांना ‘सैतान’ संबोधले. आणखी एकाने त्या अवैध व्यावसायिक असून, त्या देशाचा सर्वनाश करतील, असे म्हटले. त्या पेन्सिल्वेनिया आणि अन्य राज्यांमधील पोर्तोरिकन समुदायांचा पाठिंबा मिळवत आहेत, याचा उल्लेख करून ट्रम्प यांच्या सभेतील काही वक्त्यांनी पोर्तोरिको हे कॅरिबियन बेट म्हणजे कचर्याचे तरंगणारे बेट आहे, अशी वाह्यात टीका केली.
ट्रम्प यांनी यापूर्वी कमला यांच्याबाबत अनेकदा खालच्या स्तराची भाषा वापरली आहे. अमेरिकेतील ‘टेस्ला’ तसेच ‘एक्स’चे मालक एलॉन मस्क यांनी रिपब्लिकन पक्षास मोठी देणगी दिली आहे व त्यांनी ट्रम्प यांच्या उमेदवारीचा पुरस्कारही केला आहे; पण मस्क यांचे रशियाशी लागेबांधे असल्याचा आरोप डेमॉक्रॅटिककडून करण्यात आला आहे. ट्रम्प पहिल्यांदा अध्यक्ष झाले, तेव्हाही त्यांच्या बाजूने रशियाने अमेरिकन निवडणुकीत हेराफेरी केली असल्याची टीका झाली होती. ट्रम्प जर पुन्हा अध्यक्ष झाले, तर अमेरिकेतील लोकशाही संस्थांवर आघात होईल, असे नॅरेटिव्ह डेमॉक्रॅटिक पक्षाने तयार केले आहे. उलट डेमॉक्रॅटिक पक्षच न्यायालये तसेच प्रशासकीय संस्थांचा ट्रम्प यांच्या विरोधात वापर करत असल्याचा प्रत्यारोप ट्रम्पसमर्थक करत आहेत! अध्यक्ष असताना ट्रम्प यांनी चीनशी थेट पंगा घेतला व खुला व्यापार व जागतिकीकरणामुळे अमेरिकेचे नुकसानच होत असल्याचा सिद्धांत मांडला; पण गंमत म्हणजे, डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या काळातही अमेरिका व चीन यांचे संबंध फार मधुर असल्याचे मानता येणार नाही. बायडेन यांनीही जागतिकीकरणाच्या गप्पा मारण्याऐवजी अमेरिकन मध्यमवर्गाचा फायदा होईल, अशीच धोरणे स्वीकारण्याचा पुरस्कार केला आहे. ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्याचे धोरण घोषित केले व बायडेन यांनी आपल्या कारकिर्दीत त्याची अंमलबजावणी केली होती. अन्य देशांत लष्करी हस्तक्षेप करून हात पोळून घेण्याचे कारण नाही, याबाबत मात्र रिपब्लिकन व डेमॉक्रॅटिक पक्षांचे एकमत आहे. कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष झाला, तरीही त्या देशाशी भारताला अधिकाधिक व्यापक सहकार्य ठेवण्याची गरज आहे. शेवटी व्यक्तीपेक्षा देश महत्त्वाचा. जगातील अमेरिका नावाच्या महासत्तेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे भारतालाही चांगलेच ठाऊक आहे.