तडका : सुटकेचा नि:श्वास..!

तडका : सुटकेचा नि:श्वास..!
Published on
Updated on

मानवी जीवनाचे मूल्य परदेशामध्ये किती महत्त्वपूर्ण समजले जाते, याचे गोडवे आपण नेहमी गात असतो. अगदी उदाहरणार्थ, भरधाव वाहणार्‍या एखाद्या रस्त्यावर अमेरिकेत एखाद्या व्यक्तीने रस्ता क्रॉस करण्यासाठी पाय ठेवला तरी सर्व रहदारी थांबते आणि त्या व्यक्तीला सन्मानपूर्वक रस्ता क्रॉस करू दिला जातो. आपल्या देशात याविषयी फार मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असते, अशी हाकाटी नेहमी केली जाते. बर्‍याचदा चूक ही त्या व्यक्तीची असते. मानवी चुकांमुळे अनेक अपघात होतात आणि मृत्यूपण होतात; पण त्याचबरोबर त्या संबंधात काम करणार्‍या यंत्रणा गाफील असतात, असा आरोप करणे चुकीचे आहे. अगदी नुकत्याच वाहतुकीला खुल्या झालेल्या समृद्धी महामार्गावर काही अपघात झाले. तिथेपण यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेतलेली होती. नुकतेच या महामार्गावर ड्रोन आणि इतर यंत्रांद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेले 41 मजूर सुमारे 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर पडले आणि संपूर्ण देशाने सुटकेचा नि:श्वास टाकला. हे मजूर विविध प्रांतांमधील होते, विविध जाती-धर्मांचे होते आणि एकाच समान संकटामध्ये अडकलेले होते. त्यांच्या जीवनाचे महत्त्व लक्षात घेऊन घटना घडल्यापासून जे शर्थीचे प्रयत्न आपल्या देशात केले गेले, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांत संबंधित सर्व यंत्रणा 24 तास कार्यरत होत्या आणि या मजुरांच्या सुटकेचा क्षण जवळ ओढून आणण्याचा प्रयत्न करत होत्या. अखेर एकदाचे या प्रयत्नांना यश आले आणि हे मजूर सुखरूप बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर या सर्वांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. त्यांनी असे म्हटले की, आम्ही विविध जाती-धर्मांचे, विविध प्रांतांचे सतरा लोक होतो; परंतु जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा जणू काही संपूर्ण भारतच त्या ठिकाणी उपस्थित होता.

छोट्याशा जागेमध्ये दिवसरात्र काही दिवस तुम्ही अडकून पडाल, तर सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे मनोधैर्य टिकवून ठेवणे. या श्रमिकांच्या गटाचे नेतृत्व गब्बरसिंह नावाच्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने केले. त्याने सातत्याने सर्वांना एकत्र ठेवून हसत-खेळत धीर दिला, देवावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली, संपूर्ण देश आपल्या पाठीशी असल्याची जाणीव करून दिली आणि त्या मनोधैर्यामुळेच या श्रमिकांनी या मोठ्या संकटावर मात केली. लोकांचा जीव घेणारा 'शोले' चित्रपटातला एक गब्बरसिंह असतो आणि संकटात अडकलेल्या सहकार्‍यांना सोबतीला घेऊन मनोबल टिकविणारा असाही एखादा गब्बरसिंह नेगी असतो, हे आपल्या भारताचे वैशिष्ट्य आहे.

विविध यंत्रणांनी सर्वात प्रथम काय केले असेल, तर अडकलेल्या या जीवांशी संपर्क स्थापित केला. त्यानंतर त्यांना आवश्यक ते खाद्यपदार्थ एका पाईपच्या माध्यमातून सोडण्यात आले. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या जागी दूरध्वनी यंत्रणा स्थापित करण्यात आली. यंत्रणा स्थापित झाल्यानंतर या सर्वांचा आपल्या कुटुंबाशी संपर्क करून देण्यात आला. भारतीय माणसासाठी त्याचे कुटुंब त्याचे सर्वस्व असते. आपले आई-वडील, मुलेबाळे, पत्नी आणि इतर नातेवाईक यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे झाल्यानंतर मजुरांच्या जीवात जीव आला आणि त्यांची जगण्याची उमेद वाढली. अर्थात, सुरुवातीपासून ते सुटका होईपर्यंत यंत्रणा या सर्वांच्या संपर्कात होत्या. बोगद्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा दीर्घ अनुभव असणारे परदेशातील तज्ज्ञसुद्धा स्वतःहून आले आणि त्यांनी या कामामध्ये मोठाच सहभाग नोंदविला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृह राज्यमंत्रीसुद्धा स्वतः जातीने लक्ष ठेवून होते.

– बोलबच्चन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news