Changing Face of Theatre | नाटकाचा बदलता चेहरा!

Changing Face of Theatre |
Changing Face of Theatre | नाटकाचा बदलता चेहरा!
Published on: 
Updated on: 

राजीव मुळ्ये, नाट्यदिग्दर्शक, लेखक

मराठी रंगभूमीने समाजाचे मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. आज मराठी रंगभूमी दिन. त्यानिमित्त...

मराठी माणसाच्या सांस्कृतिक जडणघडणीत नाटकाचे स्थान अनन्यसाधारण आहे. रंगभूमीने मराठी समाजाची अभिरुची घडवली, त्याच्या संवेदनशीलतेला आकार दिला आणि बदलत्या काळातील प्रश्नांवर विचार करण्यास प्रवृत्त केले. मनोरंजनाच्या साधनांमध्ये गेल्या काही दशकांत आमूलाग्र बदल झाले. तरीही रंगमंचावर प्रत्यक्ष साकार होणाऱ्या नाटकाचे आकर्षण कमी झालेले नाही. मराठी रंगभूमीच्या प्रदीर्घ वाटचालीचे हेच सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. विष्णुदास भावे यांनी सांगली येथे ५ नोव्हेंबर १८४३ रोजी ‌‘सीता स्वयंवर‌’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. आधुनिक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील हा महत्त्वाचा प्रारंभबिंदू. या घटनेच्या स्मरणार्थ ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व ऐतिहासिक घटनेच्या स्मरणापुरते मर्यादित नाही. मराठी रंगभूमीच्या वाटचालीचा आढावा घेण्याची आणि तिच्या भवितव्याचा विचार करण्याचीही ही संधी आहे.

मराठी रंगभूमीने गेल्या १८३ वर्षांत अनेक स्थित्यंतरे अनुभवली. पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांपासून सुरू झालेला प्रवास सामाजिक, कौटुंबिक, राजकीय आणि मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंतीच्या विषयांपर्यंत पोहोचला. संगीत नाटकांच्या बरोबरीने गद्य नाटकांचा प्रभाव वाढला. व्यावसायिक रंगभूमीने लोकप्रियतेचा विस्तार केला, तर प्रायोगिक रंगभूमीने आशय, रचना आणि सादरीकरणाच्या नव्या शक्यता खुल्या केल्या. नाट्यस्पर्धा आणि एकांकिका स्पर्धांमधून लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञांच्या अनेक पिढ्या घडल्या. या सर्व प्रवाहांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.

नाटकाचे सामर्थ्य त्याच्या प्रत्यक्ष सादरीकरणात असते. रंगमंचावरील मर्यादित अवकाशात संपूर्ण विश्व उभे करण्याची क्षमता या माध्यमात आहे. छोट्याशा नेपथ्यातून राजवाडा साकारता येतो, तर काही प्रसंगांतून अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडता येतो. काळ आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडून प्रेक्षकांना वेगळ्या वास्तवात घेऊन जाणे ही नाटकाची खासियत. मात्र, हे विश्व विश्वासार्ह करण्याची मुख्य जबाबदारी अभिनेत्यावर असते. नटाच्या अभिनयाशिवाय नाट्यानुभव पूर्णत्वाला जात नाही.

मराठी नाटकाने केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजातील विसंगतींवर भाष्यही केले. सामाजिक विषमता, राजकीय संघर्ष, बदलती मूल्यव्यवस्था, स्त्री-पुरुष संबंध आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांसारख्या विषयांना रंगभूमीने हात घातला. काही नाटकांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले, तर काहींनी अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित केले. वास्तववादी अभिनयापासून अतिनाट्यापर्यंत आणि पारंपरिक कथनापासून प्रयोगशील मांडणीपर्यंत विविध शैलींचा स्वीकार झाला. रंगमंचावरील काल्पनिक चौथ्या भिंतीची संकल्पनाही बदलत गेली. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील अंतर कमी करण्याचे प्रयोग झाले. आशय प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नाट्यरचनेच्या नव्या पद्धती विकसित झाल्या.

वाढता निर्मितीखर्च, नाट्यगृहांची उपलब्धता, प्रयोगांचे अर्थकारण आणि नव्या प्रेक्षकांची अभिरुची हे प्रश्न अधिक महत्त्वाचे झाले आहेत. मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या नाटकांबरोबरच मर्यादित साधनांतून आशयपूर्ण प्रयोग करणाऱ्या संस्थांचे अस्तित्वही आवश्यक आहे. मराठी रंगभूमीचा वारसा मोठा आहे; पण फक्त अभिमान बाळगून तिचे भवितव्य सुरक्षित होणार नाही. नव्या लेखकांना, दिग्दर्शकांना आणि कलाकारांना संधी मिळाली पाहिजे. बदलत्या समाजाचे प्रश्न नाटकांतून मांडले गेले पाहिजेत. प्रयोग सुरू होण्यापूर्वी मोबाईल बंद करण्याची सूचना आजही द्यावी लागते, ही बाब प्रेक्षकांच्या सांस्कृतिक शिस्तीबद्दल विचार करायला लावणारी आहे.

मराठी रंगभूमीची समृद्धी ही केवळ नामवंत लेखक, अभिनेते किंवा दिग्दर्शकांची कामगिरी नाही. पडद्यामागील तंत्रज्ञ, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, संगीतकार, व्यवस्थापक, नाट्यसंस्था, असंख्य ज्ञात-अज्ञात रंगकर्मींच्या परिश्रमांतून ही परंपरा उभी राहिली आहे. आजही रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम नाटकांना लाभत आहे. मराठी रंगभूमी दिन हा या सामूहिक योगदानाचा गौरव करण्याचा दिवस आहे. बदलत्या काळाशी संवाद साधत, नव्या विचारांना सामावून घेत आणि कलात्मकतेची मूल्ये जपत ही परंपरा पुढे नेणे, हीच रंगभूमी दिनाची खरी प्रेरणा ठरली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.