

तेलंगणामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बीआरएस पक्षाच्या आत चाललेला अंतर्गत संघर्ष उघडपणे डोकावू लागला होता. पण पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कन्या के. कविता यांना पक्षातून निलंबित केल्याने हा संघर्ष आता नव्या वळणावर पोहोचला आहे. हा निर्णय केवळ एका सदस्यावरील कारवाई मानता येणार नाही, तर तो बीआरएस पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे.
पोपट नाईकनवरे, राज्यशास्त्र अभ्यासक
तेलंगणातील राजकारण गेल्या काही महिन्यांपासून सतत कौटुंबिक वाद, सत्तेची स्पर्धा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ढवळून निघाले आहे. अलीकडेच माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर यांच्या कन्या आणि बीआरएस नेत्या कल्वकुंतला म्हणजेच के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी केली. हा निर्णय खुद्द त्यांचे पिता आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतला. यानंतर कविता यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. बीआरएसच्या संघटनात्मक आणि राजकीय स्थैर्यासाठी ही घडामोड एक मोठा धक्का मानला जात आहे. तेलंगणात बीआरएस हा सध्या प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि अशा वेळी कुटुंबातील महत्त्वाची सदस्य बाहेर पडणे हे पक्षाच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.
कविता यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर सुरुवातीपासूनच त्यांना केसीआर यांची मुलगी या ओळखीमुळे प्रसिद्धी मिळाली. परंतु त्यांनी महिला संघटनांमध्ये सक्रिय सहभाग घेत स्वतःची प्रतिमा घडवण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा दिल्ली दारू घोटाळा या चर्चित प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा डागाळली. यामुळे त्यांचे पक्षातील स्थान हळूहळू कमकुवत होत गेले. दरम्यानच्या काळात तेलंगणातील सत्ताही बीआरएसने गमावली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कुटुंबात वादाची ठिणगी पेटण्यामागचे कारण म्हणजे कविता यांनी आपल्या वडिलांविषयी भाष्य करताना त्यांना ‘राक्षसांनी वेढलेला देव’ असे म्हटले.
हे विधान बीआरएसमध्ये मोठ्या चर्चेचा विषय झाले. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत प्राथमिक सदस्यत्व काढून घेत निलंबित केले. त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांतून दूर ठेवले जाऊ लागले. या घडामोडींचा तौलनिक अभ्यास आंध्र प्रदेशातल्या वाय.एस. शर्मिला यांच्या प्रवासाशी केला जाऊ शकतो. शर्मिला यांनी आपल्या भावाविरुद्ध - मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्याविरुद्ध बंड पुकारले व स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि अखेरीस काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे जगन यांची प्रतिमा डळमळली आणि तेलुगू देसम पार्टीला सत्ता मिळवण्याची संधी मिळाली. कविता यांच्या बाबतीत अद्याप असा ठोस निर्णय झाला नाही. पण वडिलांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतरची त्यांची पावले पुढील राजकीय समीकरणांना हादरवून सोडणारी ठरू शकतात.
बीआरएसमध्ये कविता विरुद्ध त्यांचे वडील के. चंद्रशेखर राव, सख्खा भाऊ के. टी. रामाराव आणि हरीश राव व संतोष राव हे दोन चुलत भाऊ यांच्यामध्ये द्वंद्व बर्याच काळापासून सुरू होते. कविता यांनी आपल्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराबाबत हरीश राव यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला होता. त्यांनी वारंवार सूचकपणे हेही म्हटले की, काही नेत्यांनी त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर हल्ले चढवले, पण कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव ऊर्फ केटीआर गप्प राहिले. यामुळे पक्षातल्या उत्तराधिकाराच्या लढाईला उघड स्वरूप मिळाले आहे. केसीआर यांनी उत्तराधिकारी म्हणून केटीआर यांना पक्षाची सूत्रे देण्याची तयारी केली आहे. पण कविता आणि त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे की, केटीआर यांनी भाजपशी गुप्त समझोता करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुटुंबातील मतभेद केवळ वैचारिक नाहीत, तर राजकीय अस्तित्वाशी निगडित आहेत.