तडका : सैराट पाऊस..

सैराट पाऊस..
तडका : सैराट पाऊस..(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पावसाचे धूमशान सध्या महाराष्ट्राच्या विशिष्ट भागात सुरू आहे, हे आपण आधी लक्षात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, या आठवड्यातील आणि गेल्या आठवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता पाऊस फक्त शहरांमध्ये पडत आहे. म्हणजे, पुणे-मुंबईकडे पडत आहे. मराठवाड्यातील शेतकरी पेरण्या करून आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पावसाचे ढग येण्याऐवजी सूर्यप्रकाशाचे प्रखर किरण शेतीमध्ये पडत आहेत. जिथे पाहिजे तिथे तो पडत नाही आणि जिथे नको आहे तिथे नेमका तो पडत आहे. अशी परिस्थिती दरवर्षी असते. उदाहरणार्थ, मावळ आणि कोकण भागातील शेतकरी या काळामध्ये दरवर्षी भाताची लागवड करत असतात.

भात लागवड करण्यासाठी आधी त्यांची रोपे लावावी लागतात. अशी हिरवीगार दाट लावलेली रोपे एकदा थोडीशी मोठी झाली की, पाऊस सुरू असतानाच भाताची पेरणी केली जाते. यावर्षी मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्यामुळे बहुतांश लोकांकडे रोपे नाहीत आणि रोप नाही तर भात लावणार कसा आणि तांदूळ नाही आला, तर मग जगणार कसे, असा मोठा प्रश्नच येथील शेतकर्‍यांना पडला.

पावसाची तुलना लग्नाळू मुलींशी करण्याचा मोह होत आहे. महाराष्ट्राच्या तमाम भागातील लग्न करण्यासाठी उत्सुक असणार्‍या मुलींना स्थळ हे पुणे किंवा मुंबईचे पाहिजे असते. तसेच काहीसे पावसाच्या झाले आहे. पुणे आणि मुंबईमध्ये पावसाची संततधार आहे; मात्र तो ग्रामीण भागात पडायला तयार नाही. आजकाल मुलींनाही गावाकडचे शेतकर्‍याचे स्थळ असले, तर ते नकोच असते. शेतकरी असला की, कष्ट आले. शेतीचे उत्पन्न निश्चित नसते. त्यापेक्षा जेमतेम पगाराची नोकरी पुण्यात किंवा मुंबईत असेल, तर मुली लग्नाला तत्काळ तयार होत आहेत. मुंबई-पुण्यातील वरासोबत लग्न करण्याचा हा एक फायदा आहे की, किमान काही शिक्षण घेतलेली मुलगी असेल, तर ती पण काही ना काही तरी काम करून संसाराला हातभार लावू शकते. एकंदरीतच ग्रामीण भागातील पाणीटंचाई, कमी उपलब्ध असलेला रोजगार, शिवाय एकत्र कुटुंबातील राहणे या सर्व गोष्टींमुळे राजा-राणीचा सुखाचा संसार करायचे स्वप्न मुली शहरांमध्येच पाहू शकतात, खेड्यांमध्ये नाही.

पावसाचेही असेच काहीसे झाले आहे की काय, असे वाटते. पुणे, मुंबई भागामध्ये मुसळधार पाऊस संततधारेने कोसळत आहे आणि त्याच वेळेला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाने मात्र ओढ दिलेली आहे. मराठवाड्यात कापूस किंवा सोयाबीन लावलेले शेतकरी हताश होऊन आभाळाकडे बघत आहेत आणि त्याच वेळेला अतिरिक्त पावसामुळे कोकणातील शेतकरी रोपांचे काय करायचे, या विवंचनेत आहेत. असा हा बेभरवरशाचा सैराट पाऊस दरवर्षीच वाटेल तसा पडत असतो.

सैराट पाऊस..
तडका : काय काय तोडणार?

यात किमान एक सुखाची बाब म्हणजे, मे महिन्याच्या अखेरीस जाणवणारी पाणीटंचाई मात्र यावर्षी जाणवली नाही. मे महिन्यातील पाऊस सर्वदूर पडला. त्यामुळे नदी, नाले वाहायला लागले. बोअरला पाणी आले. धरणे भरण्यास सुरुवात झाली. जसा पाऊस सर्वत्र पडला तसे टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाणही कमी झाले.

आता उरलेला पावसाळा कसा राहणार, याविषयी उत्सुकता आहे. किमान आताही जिथे पेरण्या झाल्या आहेत तिथे पाऊस पडला, तर पीक चांगले येऊ शकते. हा उर्वरित पावसाळा व्यवस्थित गेला, तर रब्बी पिकाचीही काळजी राहणार नाही जेणेकरून वर्षातून दोन पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

पर्जन्य देवता इतकी लहरी आहे की, या देवतेची प्रार्थना करण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. उर्वरित पावसाळा नियमित, जसा पाहिजे तसा यावा यासाठी प्रार्थना करूयात. कारण, आपल्या हातात तेवढेच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news