Suman Kalyanpur | नंदादीप शांत झाला...

Suman Kalyanpur |
Suman Kalyanpur | नंदादीप शांत झाला...
Published on
Updated on

अपर्णा संत

संगीतविश्वात आपल्या सोज्वळ, सात्विक आणि मधूर आवाजाने अजरामर ठसा उमटवणार्‍या सुमन कल्याणपूर यांचे व्यक्तिमत्त्व आणि गायन हे एकरूप होते. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांच्या भावविश्वाला स्पर्श केला आणि संगीतप्रेमींच्या मनात कायमची तेवणारी ज्योत प्रज्वलित केली.

भावसंगीताच्या क्षितिजावर सात्विकपणे तेवणारी एक ज्योत-सुमन कल्याणपूर, जिचे अस्तित्व संगीतप्रेमींच्या सात्विक, शालीन, सोज्वळ, हळुवार, प्रेमळ, लडिवाळ क्षणांमध्ये विरघळून गेले आहे आणि ते तसंच राहणारपण आहे. सुमनताईंच्या बरोबर काही क्षण व्यतीत करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांची गाणी आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यामध्ये काहीच फरक नाही. सोज्वळ स्त्री प्रतिमेतील सर्व गोष्टी सुमनताईंच्या आवाजामध्ये होत्या. त्यांच्या आवाजाला शृंगारिक आणि मादक अशा विकारांचा स्पर्शही झाला नाही. प्रेमळ, समजूतदार, शांत, समर्पित, शालीन अशा कितीतरी विशेषणांनी त्यांच्या आवाजाचे वर्णन करता येईल. त्यांच्या आवाजामध्ये प्रेयसी होती, समर्पित पत्नी होती, परमेश्वरावर नितांत श्रद्धा असलेली भक्त होती, बाळावर जीवापाड प्रेम करणारी आई होती. लता मंगेशकर यांच्या आवाजाची नक्कल न करणारा; पण त्यांच्याच आवाजाच्या जातकुळीतला सुमनताईंचा आवाज होता.

सुमनताई लताबाईंच्या नंतर सात वर्षे आणि चार महिन्यांनी 28 जानेवारी 1937 रोजी जन्माला आल्या. शंकरराव आणि सीताबाई हेमाडींचे हे पहिले अपत्य. कलासक्त कुटुंबात विविध कलांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्या उत्तम चित्रे काढत. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये फाईन आर्टस्च्या दुसर्‍या वर्षाला ‘ऑईल पेंटिंग’ शिकताना रंगातील रसायन आणि टर्पेंटाईनची त्यांना प्रचंड अ‍ॅलर्जी झाली आणि त्यामुळे त्यांना जे. जे. स्कूल सोडावे लागले.

सुमनताईंनी आपल्या तरल, सुरेल, शुद्ध उच्चारांचे लेणं लाभलेल्या, उत्तम पल्ला आणि फिरत असणार्‍या भावपूर्ण आवाजातून हिंदी-मराठी आणि इतर अनेक भाषांमध्ये शब्दचित्रे फुलवली. कदाचित त्यांच्यातल्या चित्रकाराला दिसणारी रंगांची भाषा त्या सुरांमधूनही व्यक्त करत असतील. सुमनताईंच्या आवाजामध्ये मी ऐकलेलं पहिले गाणे आजही लख्ख आठवते. ते म्हणजे, ओंकारप्रधान रूप गणेशाचे... माझ्या माहेरच्या गावी देवळात पहाटे दररोज हेच गाणे वाजायचे.

सुमन म्हणजे फूल किंवा स्वच्छ सुंदर मन. तसाच त्यांचा आवाज होता. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर आवाज मिळाला तर तो कसा असेल... खास हा आवाज ऐकणार्‍याला त्याच्या अनेक सात्विक नात्यांची आठवण करून देणारा आणि धरून ठेवणारा... खास भावसंगीत आणि पार्श्वगायनासाठीच काही आवाजांची निर्मिती झालेली असते. सुमनताईंचा आवाज तसाच. सुरेलपणाच्या जोडीला या आवाजात भावभावना व्यक्त करण्याचे प्रचंड सामर्थ्य परमेश्वराने दिले होते आणि सुमनताईंनी ते अतिशय मेहनतीने वाढवले. जोपासले. खरेतर त्यांचा आवाज, त्यांचा गळा अतिशय नाजूक होता. त्यांच्या गळ्याला खूप रियाज सोसण्यासारखा नव्हता; पण गळ्यातली वैशिष्ट्ये फार निगुतीने जपत, सोसत, हलका रियाज करत त्यांनी अनेक वर्षे त्यांचा सूर जिवंत ठेवला.

गाण्याचे सौंदर्य खुलवणारे एक महत्त्वाचे आयुध म्हणजे गळ्यातली फिरत. जन्मजात गळ्यात असलेली फिरत, स्वरांचा, लगावांचा अंदाज, त्याची समज ही परिश्रमांनी जपावी आणि वाढवावी लागते. गाण्याचे सौंदर्य खुलवताना गळ्यातली फिरत किती, कुठे, कशी, वापरायची ही खरी कसोटी असते. सुमनताईंच्या गळ्याच्या उत्तम क्षमतेबरोबरच त्यांची बौद्धिक क्षमताही त्यांच्या प्रत्येक गाण्यात दिसून येते. छोट्या छोट्या मुरक्या, त्यांना मिळालेला अवकाश, तो वापरण्याची सुमनताईंची हुशारी, एखादी मोठी तान घेताना तिचं वजन पेलणे आणि गाण्याचे सौंदर्य वाढवणे अशा गोष्टी त्यांनी विलक्षण कसबांनी केलेल्या दिसतात. संगीतकार केशवराव भोळे, तावडे बुवा, अब्दुल रेहमान खान, नवरंग नागपूरकर, यशवंत देव अशा नामी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय, सुगम आणि उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले आणि त्या संस्कारांचे दर्शन त्यांच्या गाण्यांमधून होत राहिले.

सुमनताईंनी 1953 मध्ये पहिले पार्श्वगायन केले आणि त्यानंतर पुढील काही दशके हा आवाज रसिकांच्या भेटीला वारंवार येत राहिला. हिंदी चित्रपटसृष्टीतही उत्तम कारकीर्द गाजवलेल्या सुमनताईंची चित्रपट गीते आठवायची झाली, तर पटकन डोळ्यांसमोर येते ते, ‘जुही की कली मेरी लाडली’, ‘मेरे मेहबूब ना जा आज की रात ना जा’, ‘न तुम हमे जानो ना हम तुम्हे जाने’, ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘अजहू न आये बालमा सावन बीता जाये’ किती किती गाणी आठवावीत...

मराठी चित्रपट संगीत, भावसंगीत, भक्तिगीत हे सुमनताईंच्या आदर्श गायनांनी समृद्ध केलेले एक खास दालन आहे. ‘सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले...’ आणि ‘नंदाघरी नंदनवन फुलले...’ या गीतांपासून सुमनताईंनी मराठीमध्ये गाण्याला प्रारंभ केला आणि मराठीला एक अपार भक्तिरसयुक्त आवाज मिळाला. भावसंगीतामध्ये दशरथ पुजारी, कमलाकर भागवत, अशोक पत्की या संगीतकारांबरोबर सुमनताईंचे फार उत्कृष्ट काम आहे. या संगीतकारांनी त्यांच्या गायनावर प्रचंड विश्वास दाखवला आणि सुमनताईंनीही तो चढत्या श्रेणीनुसार सार्थ केला. दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर जोडीने फार सुंदर सात्विक गाणी मराठीला बहाल केली. अशोक पत्की आणि सुमनताई यांनीही फार अप्रतिम गाणी भावसंगीताला बहाल केली. कमलाकर भागवत यांनी स्वरबद्ध केलेले काही अभंग सुमनताईंनी फार अप्रतिम सादर केले. सुमनताईंची चित्रपट गीतेही फार वरच्या दर्जाची आहेत.

लता मंगेशकरांच्या समकालीन असणे, त्यांच्यासारखाच आवाज असणे हे खरे तर मोठे आव्हान होते. त्यामुळे सुमनताईंचा हिंदीतला प्रवास सोपा नव्हता; पण आपले समांतर अस्तित्व त्यांनी नेहमीच मान्य केले. जेवढे काम समोर आले तेवढे मनापासून केले आणि हिंदी चित्रपटांमध्येही संस्मरणीय गाणी दिली. कलासक्त सुमनताईंनी गायनाकडेही कला म्हणूनच पाहिले. व्यवसाय म्हणून येणार्‍या अपरिहार्य गोष्टींकडे शांतपणे दुर्लक्ष करून अतिशय सोज्वळ आणि समृद्ध आयुष्य त्या जगल्या. आज कैलासवासी सुमन कल्याणपूर असे म्हणताना आतमध्ये प्रचंड गलबल होते. कारण, त्यांच्या गाण्यांनी गाणे कसे व्यक्त करायचे, त्यातले कितीतरी कंगोरे दाखवले. शांत, स्निग्धपणे किती छान करिअर करता येते, त्याचाही एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. अनेक संगीतप्रेमींच्या मनामध्ये त्यांनी लावलेली भावसंगीताची ज्योत कायमच प्रज्वलित राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news