

मुरलीधर कुलकर्णी
गायक, संगीतकार सुधीर फडके यांची पुण्यतिथी नुकतीच झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना सोशल मीडियातून अनेकांनी उजाळा दिला. याअंतर्गत काही बाबूजीप्रेमींनी ऑस्कर विजेते प्रसिद्ध तेलगू संगीतकार एम. एम. किरवानी यांनी एका पुरस्कार सोहळ्यात गायिलेल्या बाबूजींच्या ‘तोच चंद्रमा नभात’ या प्रसिद्ध गीताचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला. एक तेलगू भाषिक गायक, संगीतकार बाबूजींचे गाणं गातो याचं समस्त मराठीजनांना बरंच कौतुक वाटलं आणि किरवानी हे नाव महाराष्ट्रात चर्चेत आलं.
अनेकांनी ते कोण आहेत, याचा गुगलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविषयी जाणून घेऊया! किरवानी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभासंपन्न संगीतकार आहेत. त्यांनी हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि अन्य भाषांतील चित्रपटांसाठी संगीत दिलं असून, त्यांचं संगीत सातत्याने दर्जेदार आणि भावस्पर्शी ठरले. त्यांचा जन्म दि. 4 जुलै 1961 रोजी आंध्र प्रदेशातील कोव्वूरमध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव कोडुरी मारकेट मुरळी किरवानी असं असून, प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे ते मामा आहेत. राजामौली आणि किरवानी यांची जोडी अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या यशामागे आहे.
किरवानी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अनामिका’ (1992) या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘सुर’, ‘इस रात की सुबह नहीं’, ‘जख्म’, ‘राज’, ‘साया’, ‘गँगस्टर’, ‘जिस्म’, ‘रोग’ यासारख्या अनेक चित्रपटांना अविस्मरणीय संगीत दिलं. त्यांच्या सुरेल आणि भावनांनी भारलेल्या संगीतातून प्रेक्षकांना कथा अधिक प्रभावीपणे समजते. दक्षिण भारतातील ‘बाहुबली’ मालिका आणि ‘आरआरआर’ हे त्यांचे सर्वात गाजलेले चित्रपट ठरले. ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी त्यांना जगभरात मान्यता मिळाली. या गाण्यामुळे किरवानी यांना 2023 मध्ये प्रतिष्ठित ऑस्कर पारितोषिक मिळालं. त्याच वर्षी त्यांना गोल्डन ग्लोब आणि क्रिटिक्स चॉईससारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं.
याआधीही त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंदी पुरस्कार आणि फिल्मफेअर (दक्षिण) अशा अनेक सन्मानांचा गौरव मिळवलेला आहे. किरवानी यांच्या संगीतात पारंपरिक भारतीय रागदारीचा गाभा असूनही त्यात आधुनिक पाश्चिमात्य शैलींची सर्जनशीलता मिसळलेली असते. त्यामुळे त्यांचं संगीत सीमांच्या पलीकडे जाऊन ऐकणार्याच्या मनात घर करतं. त्यांनी केवळ चित्रपटांसाठीच नव्हे, तर स्वतंत्र संगीतनिर्मितीही केली असून, अनेक नवोदित कलाकारांसाठी ते प्रेरणास्रोत ठरले आहेत. किरवानी हे नाव म्हणजे भारतीय संगीताला जागतिक ओळख मिळवून देणारा एक सशक्त कलावंत आहे. त्यांची प्रतिभा, प्रयोगशीलता आणि सांगीतिक संवेदनशीलता हीच त्यांच्या यशामागची खरी गुरुकिल्ली ठरली आहे.