OpenAI Recording Device Incident | ओपनएआयच्या कार्यालयात ‘बगिंग’

OpenAI Recording Device Incident |
OpenAI Recording Device Incident | ओपनएआयच्या कार्यालयात ‘बगिंग’
Published on: 
Updated on: 

तानाजी खोत

एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘ओपनएआय’च्या अमेरिकेतील कार्यालयात गुप्तपणे संभाषण रेकॉर्ड करणारी उपकरणे (बग्स) लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय सौदी नागरिक अब्दुल रहमान अल्फोजान याला अटक करण्यात आली होती, ज्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अल्फोजान याने कार्यालयाच्या अंतर्गत भागात गुप्त रेकॉर्डिंग उपकरणे बसवून कंपनीतील संभाषणे बेकायदेशीररीत्या ऐकण्याचा आणि रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकन सरकारने त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून २० जानेवारीपासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. बचाव पक्षाने या घटनेला ‘नो स्पाय स्टोरी’ (हेरगिरीचे प्रकरण नाही) असे संबोधत हे आरोप फेटाळले असले, तरी या घटनेने संपूर्ण जागतिक तंत्रज्ञान जगतात खळबळ उडवून दिली आहे. भविष्यातील एआय मॉडेल्स, कोडिंग अल्गोरिदम आणि अब्जावधी डॉलर्सच्या व्यावसायिक करारांवर जिथे चर्चा होते, तिथे बाहेरील व्यक्तीने प्रत्यक्ष जाऊन संभाषण रेकॉर्ड करणारी उपकरणे बसवणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आजवर सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांनी आपली संपूर्ण ताकद आणि निधी ‘सायबर सुरक्षेवर’ केंद्रित केला होता. हॅकर्स आणि मालवेअर हल्ले रोखण्यासाठी अभेद्य डिजिटल तटबंदी उभी केली गेली. परंतु, अल्फोजानने केलेल्या ‘फिजिकल बगिंग’मुळे तंत्रज्ञान क्षेत्राला ‘भौतिक सुरक्षे’च्या जुन्या पण घातक धोक्याची जाणीव झाली आहे. कोणी प्रत्यक्ष कार्यालयात शिरून संभाषण टिपू शकत असेल, तर सर्वात प्रगत डिजिटल सुरक्षा यंत्रणाही कुचकामी ठरते. या घटनेनंतर सर्वच टेक कंपन्यांनी कार्यालयातील प्रवेशाचे नियम आणि सुरक्षा तपासणी कठोर करण्यास सुरुवात केली आहे.

ओपनएआयमधील या प्रकरणाला ‘आंतरराष्ट्रीय हेरगिरी’ म्हणून पाहिले जात आहे, यामागे एनव्हिडीयाचे सहसंस्थापक आणि सीईओ जेन्सन हुआंग यांचे अलीकडचे प्रकरण कारणीभूत आहे. सिंगापूरस्थित ‘मेगास्पीड’च्या माजी अधिकारी अ‍ॅलिस हुआंगसोबतच्या वैयक्तिक संबंधांमुळे जेन्सन हुआंग वादात सापडले होते. अ‍ॅलिस यांचे चिनी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा आणि त्या माध्यमातून निर्यात निर्बंध डावलून एनव्हिडीयाच्या प्रगत एआय चिप्स चीनमध्ये वळवल्या गेल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या दबावामुळे हुआंग यांना ११ नोव्हेंबर रोजी राजीनामा द्यावा लागला; मात्र अमेरिकन सरकारच्या क्लीन चिटनंतर आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर २३ नोव्हेंबर रोजी त्यांना पुन्हा सीईओ पदावर नियुक्त केले गेले.

जेन्सन हुआंग प्रकरणाने हे स्पष्ट केले की, जागतिक महासत्ता अमेरिकन टेक कंपन्यांमधील गोपनीय माहिती मिळवण्यासाठी ‘हनी ट्रॅप’पासून ते थेट कॉर्पोरेट घुसखोरीपर्यंत सर्वच मार्गांचा वापर करत आहेत. एआय आणि सेमीकंडक्टर हेच भविष्यातील सामरिक वर्चस्वाचे केंद्रबिंदू असल्याने, ओपनएआयमधील घटनेबाबतचा ‘नो स्पाय स्टोरी’ हा दावा सामान्य अमेरिकन नागरिकांच्या पचनी पडणे अशक्य आहे. डेटा आणि अल्गोरिदम हेच नवे इंधन असल्याने टेक कंपन्यांना आता सायबर हल्ल्यांसोबतच प्रत्यक्ष हेरगिरीच्या जाळ्यापासूनही स्वतःचे रक्षण करावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.