Future Healthcare innovation | निरोगी भविष्यासाठी विज्ञान

Future Healthcare innovation |
Future Healthcare innovation | निरोगी भविष्यासाठी विज्ञान
Published on
Updated on

प्राचार्य डॉ. योगेश साळे

निरोगी समाज घडवण्यासाठी जनजागृती, शाश्वत आरोग्य सवयी आणि लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामध्ये विज्ञानाधिष्ठित निर्णय आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित आहे. आज जागतिक आरोग्य दिन. त्यानिमित्त...

दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना आपल्या स्थापनेच्या दिवशी (7 एप्रिल 1948) जगातील मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावर संदेश देते. यामागील उद्देश केवळ जनजागृती करणे नसून, समाजाला आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी प्रवृत्त करणे हा आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘टुगेदर फॉर हेल्थ, स्टँड विथ सायन्स’ म्हणजेच ‘एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी’ असे आहे. जागतिकस्तरावर सर्वसामान्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी विज्ञानाची भूमिका आणि त्यावर आधारित निर्णय प्रक्रियेवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या आणि भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांना एकत्रित प्रयत्नांतून सामोरे जाता येऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेने 2026 पासून ‘एक आरोग्य’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे प्राणी, वनस्पती, पर्यावरण आणि ग्रह यांचा परस्परसंबंध लक्षात घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा व्यापक विचार करणे गरजेचे आहे. यासाठी काही उद्दिष्टेे निश्चित करण्यात आली आहेत - आरोग्य निर्णयांमध्ये वैज्ञानिक पुराव्यांचा वापर प्रोत्साहित करणे, विज्ञान आणि आरोग्य संस्थांवरील सार्वजनिक विश्वास द़ृढ करणे, आरोग्य समस्यांच्या निराकरणासाठी सर्वांचा सहभाग वाढवणे आणि नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवणे, यांचा त्यात समावेश आहे. यंदाच्या घोषवाक्यानुसार जनजागृतीसाठी प्रभात फेरी, आरोग्य दिंडी, चर्चासत्रे, शिबिरे, गटचर्चा आणि प्रसारमाध्यमांचा वापर करून आरोग्य विभागामार्फत माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे.

आजही समाजात अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि गैरसमज आढळतात. योग्य वैज्ञानिक माहिती आणि पुराव्यांच्या आधारे या गोष्टी दूर करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. निरोगी आयुष्यासाठी संतुलित आहार, स्वच्छता, शुद्ध पाणी आणि नियमित व्यायाम याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप, योग आणि प्राणायामही महत्त्वाचे आहेत. सन 2018 पासून सर्वांगीण आरोग्याच्या द़ृष्टीने आरोग्य केंद्रांचे ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ म्हणून रूपांतर करण्यात आले आहे. केवळ आजारांवर उपचार करण्याऐवजी आरोग्य संवर्धनाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आरोग्यावर परिणाम करणार्‍या सर्व घटकांचा शास्त्रीय अभ्यास करून प्रभावी उपाययोजना आणि सर्वसमावेशक सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.

गावपातळीवर आरोग्य गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबवण्यात येत आहे. लोकसहभागातून गावांना आरोग्यद़ृष्ट्या सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसहभागामुळे आरोग्यसेवेची मागणी वाढते आणि शासनाकडून सेवा उपलब्ध करून देणे सुलभ होते. यामुळे प्रजनन व बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग, मानसिक आरोग्य इत्यादी सर्व विषयांचा एकत्रितपणे विचार करता येतो. राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि माता-बाल आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान ग्रामपातळीवर शास्त्रीय द़ृष्टिकोनातून आणि सामूहिक प्रयत्नांतून राबवले जात आहे.

आरोग्यदायी जीवनशैली ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ती सामाजिक कर्तव्यही आहे. प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबरोबरच कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. विज्ञानाधारित आरोग्य सवयींचा स्वीकार केल्यास भविष्यातील अनेक आजार टाळणे शक्य होईल. या जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन निरोगी समाज घडवण्याचा संकल्प करूया आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यपूर्ण भविष्य घडवूया.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news