

गेल्या पंचवीस वर्षांपासून चायनीज बनावटीच्या वस्तूंनी देशभर धुमाकूळ घातलेला आहे. अत्यंत स्वस्तात मिळणार्या या वस्तू अत्यंत कमी आयुष्य घेऊन आलेल्या असतात. चायनीज बनावटीचे एक विमान बांगला देशच्या ढाका शहरामध्ये चक्क एका कॉलेज कॅम्पसच्या इमारतींवर पडले, यात आश्चर्य वाटण्यासारखी काहीच बाब नाही. सर्वांचा चायनीज बनावटीच्या वस्तूंचा असाच अनुभव आहे. ‘मेड इन चायना’ म्हणजे डुप्लिकेट हे प्रत्येकाच्या मनामध्ये स्पष्ट झालेले आहे. मार्केटला तुम्ही वस्तू खरेदी करत असताना ती चायना मेड आहे की, ओरिजनल आहे, हे बघत असताच.
वस्तू तयार करण्याच्या बाबतीत चीनची कामगिरी आश्चर्य वाटावी अशीच आहे. जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात वस्तूंची निर्मिती करून चीनने व्यापारामध्ये मोठी मुसंडी मारली आहे. पतंग असोत की मांजाच दोरा असो, तो थेट चीनवरून येत असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल; परंतु आपल्या सगळ्या साधुसंतांच्या ज्या फ—ेम विक्रीला असतात, त्यापण चीनमध्ये तयार होतात. चीनमध्ये तयार झालेली इलेक्ट्रॉनिक घड्याळे अक्षरशः जहाजे भरून विक्रीसाठी भारतामध्ये येत असतात. भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या किमतीपेक्षा या किमती 70 टक्के कमी असतात. कमी किमतीत वस्तू मिळाल्यामुळे जगभरातील व्यापार्यांना फायदा होतो. त्यामुळे चीनकडून वस्तू खरेदी करून आपल्या देशात विकण्याची सध्या जगात स्पर्धा आहे.
चायनामेड वस्तूंबद्दल एक हिंदी म्हण प्रख्यात आहे आणि ती म्हणजे ‘चले तो जहां तक, नही तो शाम तक.’ याचा अर्थ असा आहे की, ती वस्तू असंख्य महिने, वर्षे दीर्घकाळ चालू शकते किंवा संध्याकाळी बंद पडू शकते. चायनाच्या वस्तूंना कोणतीही गॅरंटी नसते. दिवाळीत घरावर रोषणाई करण्यासाठी ज्या दिव्यांच्या माळा आपण आणतो, त्या जवळपास 100 टक्के मेड इन चायना असतात. आपले आकाशकंदील चायनामध्ये तयार होतात. कोणे एकेकाळी चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होता. आज आपल्यानंतर तो दुसर्या क्रमांकावर आहे. या प्रचंड लोकसंख्येचा वापर चीनने हाताला काम देऊन केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अद्भुत प्रकारची खेळणी ही सर्व चीनमध्ये तयार होत असतात. मेड इन चायनाच्या लाखो खेळण्यांचा वावर भारतीय बाजारपेठेत आहे.
चायना मेड वस्तू आणतानाच ती कधीही बंद पडू शकते, ही मानसिक तयारी करूनच ग्राहक ती विकत घेत असतो. नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानने असंख्य चिनी बनावटीच्या वस्तू वापरल्या, शस्त्रे वापरली. ही शस्त्रे पाकिस्तानच्या फारशी कामाला आली नाहीत. कारण, ती चायनामेड होती. भारतीय क्षेपणास्त्रांचा भेद करणारी प्रणाली चायनाची होती. तीही उपयुक्त ठरली नाही. त्यामुळे ‘चायनामेड वस्तू नको रे’ म्हणण्याची वेळ आली आहे.