

विजय जाधव
समाजवादी विचारवंत, समर्पित गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी चळवळींची झालेली हानी न मोजता येणारी...
लोकशाही मूल्यांच्या रक्षणाचे मोठे आव्हान निर्माण झालेले असताना आणि सत्याचा संकोच, राजकीय जीवनातील नैतिकतेचा गतीने ऱ्हास होत असताना याच लोकशाहीसाठी आणि लोकांसाठी आयुष्य पणाला लावलेले सत्याग्रही डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे निधन वेदनादायक आहे. सामान्य माणसाचे प्रश्न गंभीर बनत चालले असताना, त्याची जगण्याची कोंडी फुटायला तयार नसताना आणि सामाजिक चळवळी, आंदोलने क्षीण होत चालली असताना, त्यांचे निघून जाणे अधिक ठळकपणे जाणवणारे म्हणावे लागेल.
आजचा सामान्य, गरीब माणूस व्यवस्थेपासून दूर फेकला जातो आहे. तरुण, बेरोजगारांच्या प्रश्नांची तीव्रता वाढत चालली आहे. ती दूर करण्यासाठी व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट होताना दिसतात. सामाजिक नेतृत्वाची मोठी उणीव भासताना दिसते. सप्तर्षी यांनी गेली सहा दशके याच वर्गाचे प्रश्न घेऊन रस्त्यावरचे लढे उभे केले. महात्मा गांधी, समाजवादी विचार, अनेक सामाजिक चळवळींचे प्रणेते जयप्रकाश नारायण हे या लोकशाही देशाच्या एका कालखंडाला परिवर्तनाच्या निश्चित दिशेने घेऊन जाणारे परवलीचे शब्द. जागतिकीकरणानंतर गेल्या ३०-३५ वर्षांत नवभांडवली व्यवस्थेत त्याचे महत्त्व कमी झाले असले तरी ते संपले नाही. तोच विचार कृतीतून सर्वसामान्य माणसाच्या हाकेला हाक आणि साथ देऊन सप्तर्षी यांनी जिवंत ठेवला.
१९६०-७० च्या दशकात मुंबई, पुण्यातून युवक क्रांती दलाच्या झेंड्याखाली त्यांनी हजारो युवकांना एकत्र आणले आणि अन्याय-अत्याचाराविरोधात दंड थोपटले. या आंदोलनाला कधी सत्तेची हाव नव्हती, की सत्तेची पाठराखण करण्याची इच्छा. त्याचमुळे त्याचा नैसर्गिक आणि नैतिक दबाव, दाहकता पुढे अनेक वर्षे राहिली. अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा या विरोधात सर्वसामान्य माणसाला जागे करण्याचे आणि त्यासाठी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धारिष्ट त्यांनी दाखवले. तत्कालीन व्यवस्थेला आव्हान देतानाच देश उभारणीत कथित विकासाकडे न धावता सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊनच पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही, यासाठी समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, विषमतेचे प्रश्न सोडविल्याशिवाय चालणार नाही, हे त्यांनी दाखवून दिले. या ध्येयानेच प्रेरित होऊन ते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी उतरले, कोयना भूकंपग्रस्तांसाठी धावले, युवकांसाठी कृती शिबिरे घेताना दिसले. आणीबाणीत सरकारच्या विरोधात दंड थोपटत लोकशाही मूल्याच्या रक्षणासाठी कारावास भोगताना राज्यघटना हाच या देशाचा आत्मा असून, त्याबद्दलचे भान सतत राखले गेले पाहिजे, हे त्यांनी ठणकावून सांगितलेच; पण ते सांगणारी कार्यकर्त्यांची पिढीच देशासाठी समर्पित केली.
नामांतर आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर असंख्य आंदोलनांनी त्यांनी राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले. जनता पक्षाकडून त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधित्व केले; मात्र सत्तेची उब घेण्याचा मोह त्यांना झाला नाही. तशा अर्थाने ते सतत विरोधी बाकावरच आणि जनतेबरोबर रस्त्यावरच राहिले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतून त्यांनी उभारलेला समाज परिवर्तनाचा लढा, हे त्यांचे नोंद घ्यावे असे महत्त्वाचे उदाहरण ठरावे. उगवत्या पिढीसाठी सकारात्मक आणि संस्थात्मक जडणघडणीवर त्यांचा भर होता. या पिढीला लोकशाही मूल्यांचा भक्कम आधार असल्याशिवाय ती भारताचे नेतृत्व करू शकणार नाही, याचे भान ठेवत त्यांनी असंख्य युवा कार्यकर्ते घडवले. त्यासाठी ‘सत्याग्रही विचारधारा’ मधून हा विचार पेरण्याचा, रुजवण्याचा सतत प्रयत्न केला.
डॉक्टरकीची पदवी घेऊनही वैद्यकीय सेवेला बाजूला सारत समाजकारणाचे सेवाव्रत मोठ्या जाणिवेने स्वीकारणारे आणि ही पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर त्या दिशेने चालत राहणारे कुमार सप्तर्षी यांच्या जाण्याने क्रांतिकारी पर्वाचा अस्त झाला आहे. मात्र, केवळ श्रद्धांजली वाहून आणि प्रतिक्रिया नोंदवून शांत राहून कसे चालेल, हा त्यांनीच विचारलेला प्रश्न. आधुनिक जगात पंगू बनत चाललेल्या समाजाला त्यांची पोकळी भरून काढणाऱ्या नव्या दमाच्या असंख्य कुमार सप्तर्षींची गरज आहे. राजकीय विचारधारा कोणतीही असो, सत्ताधारी कोणीही, वा विकासाचे मॉडेल कोणतेही असो, झाकले-दडपल्या जाणाऱ्या सत्याचा आवाज बळकट करण्यासाठी, निरंकुश होऊ पाहणाऱ्या सत्तेवर सामान्य माणसाचा अंकुश ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठवावा लागतो, हाच संदेश त्यांनी गेल्या सात दशकांच्या सामाजिक जीवनातून दिला, हे लक्षात घ्यावे लागेल.