

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धाचा अंतिम टप्पा काय असेल, या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार, अशा आशा पल्लवित झालेल्या असतानाच ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांवरील हल्ले थांबवण्यास तयार नसल्याचे समोर आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा मुख्य उद्देश हा युक्रेनच्या डोनबास प्रदेशाचा ताबा मिळवण्याचा आहे. हा परिसर जितका भौगोलिकद़ृष्ट्या महत्त्वाचा आहे, तितकाच तो आर्थिक, औद्योगिक आणि धोरणात्मक द़ृष्टीने महत्त्वाचा आहे.
व्ही. के. कौर, ज्येष्ठ विश्लेषक
पूर्व युक्रेनमधील डोनबास क्षेत्र (ज्यामध्ये डोनेट्स्क आणि लुहान्स्क प्रांतांचा समावेश होतो) हे खनिज संपत्तीच्या प्रचंड साठ्यामुळे ओळखले जाते. येथे कोळसा, लोखंड, औद्योगिक खनिजे आणि मोठ्या प्रमाणावर गॅससाठा आहे. हा प्रदेश रशियासाठी केवळ आर्थिकद़ृष्ट्या नव्हे, तर रणनीतिक द़ृष्ट्याही महत्त्वाचा आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, जर हा परिसर पूर्णतः रशियाच्या नियंत्रणाखाली गेला तर पुतीन यांना एक असा भौगोलिक, आर्थिक आणि रणनीतिक झोन मिळेल, ज्यामुळे नाटो आणि पश्चिमी राष्ट्रेही कायमस्वरूपी अस्वस्थ राहतील. म्हणूनच पुतीन या भागासाठी आग्रही आणि ठाम आहेत.
2014 मध्ये क्रिमियाचे एकीकरण झाल्यापासून रशियाने या क्षेत्रात सतत समर्थक फुटीरतावाद्यांना शस्त्र आणि मदत पुरवून ताबा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे डोनबासमधील युद्ध हे गेल्या दशकभरापासून सुरूच आहे. रशियाने डोनबासमधील फुटीरतावादी प्रजासत्ताकांना मान्यता दिली आहे. या भागात सुमारे 75 टक्के लोकसंख्या रशियन भाषिक आहेत आणि सांस्कृतिक द़ृष्ट्याही स्वतःला रशियाशी जोडलेले मानतात. हीच सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकतेची बाजू या संघर्षाला मानवीय संकट बनवते. कारण, या मागणीनुसार जर युक्रेनमधून हे प्रदेश वेगळे झाले, तर लाखो लोक विस्थापित होतील किंवा पुन्हा रशियाच्या प्रभावाखाली जातील.
आज संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार या युद्धामुळे 30 लाखांहून अधिक युक्रेन नागरिक विस्थापित झाले आहेत आणि सुमारे 60 लाखांहून अधिक परदेशी निर्वासितांवर आश्रिताचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. युक्रेनमधील झेलेन्स्की सरकारने अनेकदा स्पष्ट केले आहे की, जर डोनबासचा ताबा रशियाला दिला तर त्यानंतर पुन्हा युक्रेनच्या इतर भागांवर हल्ले होतील. त्यामुळेच झेलेन्स्की हा भाग देण्यास तयार नाहीत. या संपूर्ण घटनेत अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरते. एकीकडे ट्रम्प सार्वजनिकरीत्या युक्रेनचे समर्थन करतात, तर दुसरीकडे ते 2024 च्या निवडणुकीत विजयी होऊन 2025 जानेवारीत पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्यावर स्वतःचे युद्धविरामाचे करार व जागतिक पातळीवरील शांतीचे नायक होण्याचे स्वप्न पाहतात. ट्रम्प यांना शांततेच्या प्रयत्नामुळे नोबेल पारितोषिक मिळावे, अशी लालसा आहे आणि युक्रेन युद्ध संपवून त्यांना मोठा आंतरराष्ट्रीय गौरव हवा आहे. मात्र, प्रत्यक्षात अमेरिकेला युद्ध संपवण्यापेक्षा डोनबासच्या खनिजांवर स्वतःचा ताबा मिळवायचा आहे.
ट्रम्प सार्वजनिकरीत्या शांततेचा पुरस्कार करताना दिसत असले, तरी आतून त्यांची आर्थिक भूमिका या खनिजांशी निगडित आहे. कारण, युक्रेन हा युरोपियन सीमारेषेवर उभा असलेला एक महत्त्वाचा देश आहे. डोनबासच्या नियंत्रणासाठी हे युद्ध केवळ लष्करी स्तरावर सीमित नाही, तर तंत्रज्ञान, आर्थिक, मानवीय आणि सांस्कृतिक लढाईचे स्वरूप घेऊन उभे आहे. जिथे रशिया इतिहासाच्या वारसाचे रक्षण करत आहे, तिथे युक्रेन राष्ट्राच्या अस्तित्वाचे रक्षण करण्याचा दावा करत आहे. पश्चिमी राष्ट्रे व नाटो देशांसाठीही हा एक निर्णायक टप्पा आहे.