RSS Centenary Celebration | संघाचा वैश्विक संवादविस्तार : भारतीय विचारांचा जागतिक प्रवास

व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेऊन सुरू झालेल्या या प्रवासात भारतीय संस्कृती, हिंदुत्वाची व्यापक संकल्पना आणि विश्वकल्याणाची दृष्टी जागतिक स्तरावर पोहोचवण्याची गरज संघाने ओळखली आहे.
RSS Centenary Celebration
RSS Centenary Celebration file photo
Published on: 
Updated on: 

सुनील आंबेकर ( अखिल भारतीय प्रचार प्रमुख , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ )

शंभर वर्षांच्या प्रवासात काळानुरूप बदल आत्मसात करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेऊन सुरू झालेल्या या प्रवासात भारतीय संस्कृती, हिंदुत्वाची व्यापक संकल्पना आणि विश्वकल्याणाची दृष्टी जागतिक स्तरावर पोहोचवण्याची गरज संघाने ओळखली आहे.

याच जाणिवेतून संघाच्या विचारांचा आणि कार्याचा जागतिक स्तरावर परिचय करून देण्यासाठी व्यापक संवादाचे प्रयत्न सुरू आहेत. प. पू.सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे अमेरिका, कॅनडा आणि युके चे अलीकडील दौरे तसेच सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे युके, अमेरिका , जर्मनी चे दौरे हे या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

१९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, तेव्हा भारत पारतंत्र्यात होता. राष्ट्राची उभारणी केवळ राजकीय प्रयत्नांच्या किंवा सत्तापरिवर्तनाच्या भरोशावर होऊ शकत नाही, ही त्यांची ठाम धारणा होती. भारतीय परंपरेनुसार राष्ट्रनिर्माणासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान, समाजाचे संघटन आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक असतात.

RSS Centenary Celebration
Fertilizer : खतासाठी रांगेत उभे राहण्याचे दिवस संपणार!

राष्ट्राला संघटित, समृद्ध आणि सामर्थ्यसंपन्न बनवायचे असेल, तर चारित्र्यसंपन्न, शिस्तबद्ध, समाजनिष्ठ आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी नवी पिढी घडवावी लागेल. याच ध्यासातून व्यक्तिनिर्माण आणि समाजसंघटनाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाचे कार्य करणाऱ्या संघाचा जन्म झाला.

डॉ. हेडगेवार यांनी भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा आधार हिंदुत्वात पाहिला. हजारो वर्षांपासून भारताला जोडणारा सांस्कृतिक धागा म्हणजे हिंदुत्व, ही संघाच्या विचारधारेमागील मूलभूत भूमिका आहे. भाषा, प्रांत, खानपान, उपासना आणि परंपरा यांमध्ये विलक्षण विविधता असूनही भारतीय समाजाला एकात्मतेने बांधून ठेवणारी संस्कृती ही भारताची शक्ती आहे. या सांस्कृतिक एकात्मतेला बळकटी देऊन समाजाचे संघटन करणे, हे राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक आहे. याच विचाराचा विस्तार आज संघाच्या जागतिक संवादातूनही दिसून येतो.

जागतिक संवादातून हिंदुत्वाची व्यापक मांडणी

सरसंघचालकांच्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील दौऱ्यांचा उद्देश केवळ अनिवासी भारतीयांशी संवाद साधणे हा नव्हता, तर संघाची विचारधारा, भारतीय संस्कृतीची वैश्विक दृष्टी आणि हिंदुत्वाची व्यापक संकल्पना जगासमोर मांडणे, हाही त्यामागील महत्त्वाचा हेतू होता. न्यूयॉर्कमधील ‘युनिव्हर्सल वननेस’, टोरोंटोमधील ‘हिंदू विश्व बंधू’ आणि लंडनमधील ‘सेलिब्रेट वननेस’ या कार्यक्रमांतून विविधतेतील एकात्मतेचा विचार अधोरेखित करण्यात आला.

न्यूयॉर्कमधील ‘युनिव्हर्सल वननेस’ कार्यक्रमात पाच हजारांहून अधिक लोक सहभागी झाले. विविध धर्म, श्रद्धा आणि पंथांचे प्रतिनिधीही या संवादात सहभागी झाले. धार्मिक कट्टरतेच्या पलीकडे जाऊन आध्यात्म, मानवी मूल्ये आणि परस्पर सन्मान यांवर भर दिल्यास जगात सुख, शांती आणि सौहार्द कसे वाढू शकते, हा विचार या संवादातून मांडण्यात आला.

RSS Centenary Celebration
Raigad District Development Plan : रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींची तरतूद

हिंदुत्वाची व्यापकता ही विविधतेचा स्वीकार करून मानवतेला जोडण्यात आहे. धर्म, पंथ, उपासना आणि परंपरा भिन्न असू शकतात, पण मानवतेचा मूलभूत धागा एकच आहे. विविधतेतून एकता, भिन्नतेतून समरसता आणि सर्वांच्या कल्याणाची भावना, हीच हिंदुत्वाची प्रगल्भ, सर्वसमावेशक जीवनदृष्टी आहे. विविध मार्गांतील समान सूत्रांचा शोध घेत, त्यांच्यातील भिन्नतेचा सन्मान करून सहअस्तित्वाचा मार्ग स्वीकारणे, हा या विचाराचा गाभा आहे. त्यामुळे परस्परविरोधाऐवजी संवाद, संघर्षाऐवजी सहकार्य आणि विभाजनाऐवजी एकात्मता यांचा संदेश या जागतिक संवादातून दिला जात आहे.

परदेशातील भारतीयांनी आपल्या मातृभूमीशी सांस्कृतिक नाते जपत, ज्या देशात ते राहतात त्या कर्मभूमीशी निष्ठावान राहावे आणि तेथील समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, हा संदेशही परदेश दौ-यांमधील संवादातून महत्त्वाचा ठरतो. हा संवाद केवळ भारतीय समाजापुरता मर्यादित नाही. विविध देशांतील स्थानिक समाज, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, युवा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्याशीही संवाद साधला जात आहे.

भारतीय संस्कृतीची ओळख करून देताना इतर संस्कृतींकडे कमीपणाने पाहण्याची भूमिका नाही. उलट, विविधतेचा स्वीकार आणि परस्पर सन्मान हा भारतीय जीवनदृष्टीचा भाग आहे, हे अधोरेखित केले जाते.संघाच्या दृष्टीने जग हे संघर्षाचे मैदान नसून सहकार्याचे क्षेत्र आहे हा दृष्टीकोन ठसवला जात आहे .

संघाचा जागतिक संपर्कविस्तार म्हणजे भारतीय विचार जगावर लादणे नव्हे, तर भारतीय संस्कृतीतील सहअस्तित्व, कुटुंबमूल्ये, सेवा, सामाजिक समरसता आणि पर्यावरणसंवर्धन यांसारखी मूल्ये जागतिक चर्चेचा भाग बनवणे होय. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या भारतीय विचारांतून व्यक्त होणारी विश्वकल्याणाची भावना त्यामागे आहे.

भारताने ‘विश्वगुरू’ व्हावे, याचा अर्थ जगावर प्रभुत्व गाजवणे नव्हे, तर आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि जीवनमूल्यांचा उपयोग संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी करणे हा आहे. स्थानिक पातळीवरील व्यक्तिनिर्माणातून सुरू झालेला प्रवास, जागतिक स्तरावर मानवतेला जोडणाऱ्या संवादापर्यंत पोहोचवणे, हेच संघाच्या शताब्दी प्रवासातील वैश्विक संपर्कविस्ताराचे महत्त्व आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news