

काय? नातवंडांच्या शाळेच्या नव्या वर्षासाठी वह्या, पुस्तक वगैरेंची खरेदी सुरू झाली?
काही विचारू नका. तो जिझिया कर तर दरवर्षी भरावाच लागतो. त्यांच्या कणभर शिकण्यासाठी मणभर ऐवज पुरवायचा बिचार्या आईबापांनी!
ते पुरवणार आहेत ना? मग, तुम्ही का उगाच चिंतेत दिसता?
काय सांगू? आमच्या थोरल्या नातवाचं काही बरं नाही चाललंय हो शिक्षणात.
काय होतंय?
खालीखालीच येत चाललंय त्याचं गाडं! बघावं तर दरसाल कमी कमी मार्क.
मग चिंतन शिबिर घ्या एखादं!
त्यासाठी उदयपूरला जावं लागेल. तो खर्च परवडणार नाही आम्हाला.
मग, एखादा सल्लागार नेमावा म्हणतो मी. प्रशांत स्वभावाचा बघावा.
नेमता येईल एखादा; पण तो अगदीच किशोरबुद्धीचा निघायला नको.
त्याने काय होईल? तसे वेगवेगळे उपाय आणि उपक्रम सुचवेलच ना तो!
त्याचे प्रस्ताव पोरगा स्वीकारेलच याची खात्री नाही हो. पीकेंचे प्रस्ताव ओके करण्याची परंपरा नाही आपली!
असं म्हणता?
शिवाय एखादा त्यांनाच साक्षात्कार व्हायचा की बुवा, आता तुम्हाला त्यांच्यापेक्षा सामूहिक इच्छाशक्तीची जास्त गरज आहे.
सामूहिक सोडा; पण निदान आमच्या नातवाच्या तरी इच्छाशक्तीवरच आहे आता सगळं. वर्गातली आलतूफालतू मुलंसुद्धा त्याच्या पुढे जायला लागलीत हो.
बघा ना! हे असंच होतं पुढेपुढे माकप, तृणमूल, द्रमुक, राजद असे पिटुकले प्रादेशिक पक्षसुद्धा घरंदाज ज्येष्ठ पक्षाला मागे टाकतातच ना एकेकदा?
तसं आमचं घराणं सुशिक्षितांचं आहे. सगळे बर्या मार्कांनी पासबीस होणार्यांपैकी आहोत आम्ही लोक.
कबूल आहे; पण अशा बाबतीत पूर्वपुण्याई फार काळ पुरत नाही बर्का. शेवटी ज्याचं त्याला, जेव्हांचं तेव्हांच सिद्ध करावं लागतं.
तेच तर कानीकपाळी ओरडतोय नातवाच्या. बाबारे, आता तूच निग्रहाने तुझ्या प्रगतीची सूत्र हाती घ्यायला हवीत.
मग तो काय म्हणतो?
तो आशावादी आहे.
बापरे!
तो म्हणतो, यापुढे सगळं चांगलंच होईल. 2024 पासून पुन्हा यशाची आशा दिसेल असं म्हणतो.
कशाच्या जीवावर मानतो तो हे?
माहीत नाही; पण एकूण माणसानं आशावादी असणं चांगलं ना?
खरंय! पण, नुसता पोकळ आशावाद कुठवर पुरणार? त्याने अपायच व्हायचा आणि त्यापुढे काहीही कोणीही सांगण्याने निरूपायच व्हायचा.
मग, तुमच्या मते आमच्या नातवाला कुठेच काहीच आशा नाही का?
तसं नाही. शेवटी राखेतून भरारीपण घेता येतेच ना? मात्र, त्यासाठी प्रामाणिक आत्मचिंतन करायला हवं आणि कठोर प्रयत्नही हवेत. एरव्ही 'मुंगेरीलाल के हसीन सपने' बघून काही होणार नाही म्हणावं त्याला.
बघतो सांगून!
– झटका