तडका : अद्भुत रामकथा..!

तडका : अद्भुत रामकथा..!
Published on
Updated on

अयोध्या येथे रामजन्मभूमीस्थळी नुकतीच प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा देशातील नव्हे, तर जगभरातील नागरिकांनी डोळे भरून पाहिला. हजारो वर्षांनंतरही प्रभू श्रीराम आणि रामकथा याबद्दल भारतीयांच्या मनात असलेला भक्तिभाव आजही कायम टिकून आहे. काळाच्या ओघात कित्येक राजे आले आणि गेले. पण कायम टिकून आहे ते म्हणजे प्रमुख श्रीरामचंद्रांचे भारतीयांच्या मनावरील अधिराज्य. रामकथा कितीही वेळा ऐकली किंवा वाचली तरी त्यातील गोडी संपत नाही. हा काय अद्भुत आविष्कार असावा, असा प्रश्न कधी कधी पडतो.

रामकथा ही पित्याला दिलेले वचन पूर्ण करणार्‍या आणि वचनाला जागणार्‍या एका तेजस्वी पुत्राची कथा आहे. रामकथा ही मोठ्या भावाला धाकट्या भावाने आयुष्यभर दिलेली साथ अधोरेखित करणारी कथा आहे. आपल्याच सावत्र आईच्या मुलाला राज्याच्या गादीवर बसवून सावत्र आईचेही स्वप्न पूर्ण करणार्‍या प्रभू श्रीराम या पुत्राची पण ही रामकथा आहे. कांचनमृगाचा मोह धरणार्‍या एका सामान्य स्त्रीची ही कथा आहे. अतिशय कमकुवत असणार्‍या, पण देवकार्यासाठी बलाढ्य शत्रूला भिडणार्‍या जटायूची पण ही कथा आहे.

खरे तर रामकथा ही अत्यंत प्रेरणादायी अशी जीवनचरित्र कथा आहे. बलाढ्य शक्ती असलेला हनुमान जेव्हा मती कुंठित होऊन बसलेला असतो, तेव्हा त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून देणारी ही कथा आहे. एवढा मोठा समुद्र ओलांडून मी कसा जाऊ शकेन, असा प्रश्न हनुमंताने विचारला तेव्हा त्याच्याच कुटुंबातील ज्येष्ठांनी त्याला ही आठवण करून दिली की, अरे तू अफाट ताकदवान आहेस. जन्मल्याबरोबर सूर्याला गिळायला निघालेला तू असा हतबद्ध होऊन बसलास. याचा अर्थ तुला तुझ्या शक्तीची जाणीव नाही. त्याला त्या शक्तीची जाणीव करून देणारी ही कथा आहे, जी भारतीय तरुण वर्गासाठी अत्यंत प्रेरक आहे. आपल्या शक्तीची जाणीव झालेला हनुमंत एक महाप्रचंड उडी घेऊन समुद्र ओलांडतो, अशी ही थक्क करणारी कथा आहे. वर्षानुवर्षे प्रभू श्रीरामांची वाट पाहात बसलेल्या शबरी नावाच्या प्रेमळ अशा आदिवासी स्त्रीची पण ही कथा आहे. नदी ओलांडण्यासाठी नावे मधून ये-जा करण्याचा व्यवसाय असणार्‍या केवट समाजाची पण ही कथा आहे. सर्व प्रकारच्या जातींची जातिविरहित समाजरचना कशी असावी, याची कथा म्हणजेच रामकथा होय.

अशी अद्भुत रसाळ असलेली रामकथा उत्तम प्रकारचे व्यवस्थापनाचेही धडे देते. कार्पोरेट सेक्टरमध्ये सांगितलेले काम पूर्ण केले पाहिजे हा एक साधारण नियम असतो. रामकथेमध्ये हनुमंताला संजीवनी नावाची दिव्य वनस्पती शोधून आणण्याचे काम दिले होते. हनुमंत ज्यावेळेला हिमालय पर्वतावर गेले आणि ही वनस्पती कोणती हे नेमके ओळखण्यात कमी पडले, त्यावेळी कार्पोरेट पद्धतीप्रमाणे संपूर्ण डोंगरच उचलून आणून नेमून दिलेले काम वेळेत करणार्‍या हनुमंताची ही कार्पोरेट कथाही आहे. अतिसामान्य व्यक्तीच नव्हे, तर अगदी वानरेही योद्धा म्हणून वेळ प्रसंग आला तर लढू शकतात हे दाखविणारी आणि सामान्य लोकांना लढण्याची प्रेरणा देणारी पण ही कथा आहे. या रामकथेने भारतीय जनमानसावर गेल्या हजारो वर्षांपासून टाकलेली भुरळ आजही कायम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news