

अरे, कशाच्या बहिणी आणि काय घेऊन बसला आहेस? आमच्या गल्लीत 40 लाडक्या बहिणी आहेत. नाही, नाही, माझ्या नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी. त्यांना ओवाळायला कोणी भेटलं नाही म्हणून त्या माझ्याकडे आल्या आणि त्या सगळ्यांनी मला ओवाळून ओवाळणी वसूल केली.
मग काय, ओवाळणी टाकलीस की नाही घसघशीत?
टाकली ना, न टाकून सांगतो कुणाला? बहिणी आल्या तेव्हा आमच्या गल्लीतले सगळे लाडके दाजीपण माझ्या घरी येऊन बसले होते आणि लाडक्या बहिणींना ‘परत फिरा रे, परत फिरा’ अशा घोषणा देत होते.
का रे बाबा, लाडक्या बहिणींवर इतका राग कशासाठी?
लाडके दाजी आणि लाडके भाऊ या सरकारच्या बहिणींमुळे वैतागून गेले आहेत. लाडक्या बहिणींची भरती करण्यासाठी शासनाने नको नको त्या गोष्टींचे भाव वाढवले आहेत. याचा त्रास फक्त लाडक्या भावांनाच नाहीतर दाजींनापण होत आहे.
अरे, असे कोड्यात काय बोलतोस? स्पष्ट बोलना!
अरे बाबा, लाडक्या बहिणींना देण्यासाठी आणि त्याची जमावट करण्यासाठी शासनाने अनेक वस्तूंच्या किमती वाढवल्या आहेत. समजा एखाद्या लाडक्या बहिणीला शासनाकडून नियमित पैसे येत आहेत आणि त्याचबरोबर तिचा नवरा नियमितपणे हॉटेलमध्ये जात असेल, तर त्याला आता जास्तीचे पैसे लागत आहेत.
अरे, म्हणजे याचा अर्थ बहिणींची भरती करण्यासाठी गव्हर्न्मेंटने दाजीच्या आणि
लाडक्या भावांच्या खिशात हात घातला आहे म्हण की!
नाही तर काय? जिथे जाईल तिथे भाववाढ. सगळ्या गोष्टींचे दर वाढले आहेत. कोणतेही शासकीय काम घेऊन गेले, तर त्याचे दर वाढलेले आहेत. याचे कारण म्हणजे, हे सगळे वाढवून लाडक्या भावांच्या आणि दाजींच्या खिशातून पैसे काढून घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
तुझ्या म्हणण्याप्रमाणे लाडक्या बहिणींचे कौतुक करताना शासनाने लाडक्या भावांचा मात्र राग ओढवून घेतला आहे. बरोबर?
नक्कीच! बहिणींचे कौतुक पाहून भावांना आणि दाजींना आता राग यायला लागलेला आहे. त्यामुळेच मी म्हणतो की, बहिणींची झाली चांदी; पण दाजींचे आणि भावांचे झाले आहेत वांधे, हे मात्र खरे आहे.
अरे, यामध्ये वांधे कसले त्यात! उलट लाडक्या बहिणींना ओवाळणी टाकून सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात असावा बहुधा!