…तर पावसाचे चक्र बिघडू शकते

…तर पावसाचे चक्र बिघडू शकते
Published on
Updated on

गतवर्षी 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंट'मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, संशोधकांनी 22 रक्त नमुन्यांचे विश्लेषण केले असता, त्यापैकी 17 नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळले होते. आता जपानच्या संशोधकांना प्रथमच ढगात प्लास्टिकचे नमुने आढळले आहेत. प्लास्टिकचे कण वायुमंडळातील प्रदूषणामुळे आल्याचे निरीक्षण काही अभ्यासकांनी नोंदवले आहे. ही समस्या निकालात काढली नाही, तर पावसाचे चक्र बिघडू शकते.

अलीकडेच जपानमधील शास्त्रज्ञांना प्रथमच ढगात प्लास्टिकचे नमुने आढळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या माध्यमातून हे प्लास्टिक कण तिथवर पोहोचतात आणि तेथून ते वायुमंडळाच्या दिशेने आपला मार्ग शोधतात. जपानमधील या पथकाने माऊंट फुजी आणि माऊंट आयोमाच्या 1300 ते 3776 मीटर उंचीवरील शिखरावरून पाणी एकत्रित करून या नमुन्यांचे कॉम्प्युटर इमेजिंग तंत्राच्या मदतीने विश्लेषण केले. या विश्लेषणात असे आढळून आले की, ढगातून एकत्रित केल्या गेलेल्या प्रत्येक लिटर पाण्यात प्लास्टिकचे 6.7 ते 13.9 तुकडे होते. त्यांची उंची 7.1 मायक्रोमीटर ते 94.6 मायक्रोमीटरपर्यंत होती. पाण्याच्या या थेंबांमध्ये हायड्रोफिलिक पॉलिमरचे प्रमाण सर्वाधिक होते. ढगात त्याचे प्रमाण अधिक असणे धोकादायक मानले जाते. शास्त्रज्ञांच्या मते, ही समस्या निकालात काढली नाही, तर पावसाचे चक्र बिघडू शकते. भविष्यात यामुळे कोरडा दुष्काळही पडू शकतो. 5 मिलिमीटरपेक्षा कमी आकाराचे मायक्रोप्लास्टिक कण अतिशय धोकादायक असतात. हेच पाणी पिण्याच्या आणि स्वयंपाकातील पाण्यातून शरीरात जाऊ शकते आणि गर्भवती महिलेच्या अर्भकापर्यंतही पोहोचू शकतात.. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेलाही प्लास्टिकच्या समस्येची चिंता लागून राहिली आहे. कारण प्लास्टिक अनेक वर्षे सडत नाही, कुजतही नाही. प्लास्टिकचा हा कचरा शेवटी समुद्राच्या पोटात जाऊन समुद्राची हानीच करतो आहे. प्लास्टिक कचर्‍याची गल्लीतील समस्या आता थेट समुद्राच्या पोटात साठणार्‍या प्लास्टिकापर्यंत जाऊन पोहोचली आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर प्लास्टिकच्या धोक्याबाबत सांगताना म्हणतात की, प्लास्टिकचा सर्व प्रकारचा वापर रोखणे हे आव्हानात्मक आहे. याचे कारण आज प्लास्टिकचा वापर असंख्य वस्तूंमध्ये होत आहे. पेनामधील रिफिलचे उदाहरण घेतले, तर पूर्वी आठ आण्याला सुटी रिफिल मिळत होती. आता ती प्लास्टिकच्या वेस्टनात मिळते. त्यामुळे तिचा आकर्षकपणा वाढला, किंमत वाढली; पण पर्यावरणाचे नुकसानही वाढले. अशा साध्या वाटणार्‍या गोष्टी आहेत; परंतु त्यामध्ये पर्यावरणाचा विचार होताना दिसत नाही.

प्लास्टिकचा सर्वाधिक वापर होतो कॅरीबॅगच्या स्वरूपात. खरे पाहिल्यास पूर्वीच्या काळी कापडी, कागदी पिशव्या लोक वापरत होते; परंतु कालांतराने प्लास्टिकच्या पिशव्यांची उपलब्धता वाढली आणि हा एक सोपा पर्याय आहे, हे दिसल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही जास्त गैरवापर वाढला. प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा फार मोठा धोका पर्यावरणाला आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारी असणार्‍या गावांमध्ये-शहरांमध्ये समुद्राच्या पाण्याचा तळ प्लास्टिकने झाकलेला आहे, इतका प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. ही एका भीषण धोक्याला जन्म घालणारी गोष्ट आहे. याचा जीवसृष्टीवर-जलसृष्टीवर प्रतिकूल परिणाम होतो. नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना, तेही प्लास्टिकच्या पिशवीसकट टाकले जाते. घरातील कचराही प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून कचराकुंडीत टाकला जातो. हा कचरा जी जनावरे खातात, त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. कोल्हापुरात अशा मोकळ्या गाई किंवा म्हशींच्या पोटातून तीस-चाळीस किलो प्लास्टिकचे कागद काढण्यात आले आहेत. म्हणजे गैरवापरामुळे दुसर्‍याचा जीव जातो आहे, याचा विचार माणसाने केला पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news