तडका आर्टिकल : एक चमचा दही

पैशांची चणचण भासते का?
Pudhari Tadaka article
पुढारी तडका आर्टिकलPudhari File Photo
Published on
Updated on

सोशल मीडिया नावाचा प्रकार आता चांगल्यापैकी रूढ झालेला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉटस्अ‍ॅप यावर तुमच्यासमोर कधी काय येईल, हे काहीही सांगता येत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेने हे सर्व जोडले गेलेले आहे. सर्दीवरचे एखादे औषध तुम्ही शोधण्याचा कुठेही प्रयत्न केला की, लगेच तुमच्यासमोर सर्दीवर असणार्‍या विविध औषधांच्या जाहिराती यायला सुरुवात होते. समजा, तुमच्याकडे पाळलेला कुत्रा आहे आणि त्याला काय खाऊ घातले पाहिजे, याविषयी तुम्ही गुगलवर शोध घेतला, तर लगेच फेसबुकवर तुमच्यासमोर कुत्र्याच्या खाद्याच्या जाहिराती येण्यास सुरुवात होते. तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे सर्व कोण करते? अजिबात अवघड नाहीये, कारण हे सर्व करणारी कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वत्र पेरून ठेवण्यात आलेली आहे. कोणत्याही जाहिरातींचा मारा नको असेल तर मुळात काही शोधू नका. एवढे तुम्ही नाही केले तरी विविध प्रकारची रहस्ये तुमच्यापुढे येत असतात आणि त्याचा थरार तुम्ही अनुभवत असता.

Pudhari Tadaka article
तडका आर्टिकल : उधारीवर संक्रांत

फेसबुक पाहता-पाहता नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. तिचा मथळा असा होता, ‘पैशांची चणचण भासते का? केवळ एक चमचा दही आंघोळीच्या पाण्यात मिसळा, धनलाभ होणारच. लिंक कमेंटमध्ये.’ पैशाची चणचण भासत नाही, असे आपल्या देशात जेमतेम चार-पाच टक्के लोक असतील. तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांना पैशांची चणचण कशी दूर करायची, हा प्रश्नच असतो. अशावेळी जर कोणी आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दही टाकण्याचा फॉर्म्युला दिला तर साहजिकच तुम्ही कमेंटमध्ये जाऊन त्याची लिंक पाहणार. दिवस-रात्र काबाडकष्ट करून जो प्रश्न सुटत नाही तो एक चमचा दह्याने सुटणार असेल, तर कुणाला नको आहे सांगा बरे! अशाच रहस्यमय जाहिराती असतात. त्यात सर्व माहिती वर दिलेली नसते. त्यासाठी कमेंटमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करावे लागते, तेव्हा ती माहिती मिळते. लिंकवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इतर जाहिराती पण पाहाव्या लागतात. ‘या अभिनेत्याची पत्नी आहे खूप सुंदर; पण घटस्फोट देण्याच्या तयारीत. लिंक कमेंटमध्ये.’ वास्तविक पाहता कुणा अभिनेत्याची पत्नी सुंदर असेल आणि ती घटस्फोट देण्याच्या तयारीत असेल तर आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? इथे फक्त रहस्य तयार केले जाते आणि त्याचे उद्घाटन करण्यासाठी तुम्हाला लिंकमध्ये जावे लागते आणि लिंकमध्ये गेले की, इतर जाहिराती पाहाव्या लागतात. ही विचित्र प्रकारची एक जाहिरात कला आहे. बरेचदा तर लिंकमध्ये पाहायला गेले तर कोणतीही नावे दिलेली नसतात. तरी पण उत्सुकतेपोटी आपण लिंक क्लिक करून पाहतोच. याचे कारण म्हणजे आपण सामान्य लोक आहोत. मोठमोठ्या लोकांच्या, अभिनेत्यांच्या, खेळाडूंच्या खासगी लफड्यांविषयी आपल्याला फार उत्सुकता असते. सोप्या पद्धतीने जर एक चमचा दही टाकून आंघोळ करावी लागत असेल तर आम्ही सामान्य लोक दह्यानेच आंघोळ करायला तयार आहोत; पण बाबांनो, काहीतरी पैशाची चणचण दूर होण्याची हमी तरी द्या. तसे होत नाही. नवीन आंतरजालामध्ये आपण नवनवीन जाहिरातींमध्ये फसत राहतो. जाहिरातींचा थरार अनुभवण्यासाठी आपण त्या लिंक क्लिक करतो आणि त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. ना आपली पैशाची चडचण दूर होते ना आपल्याला कधी अचानक धनलाभ होतो. जे काय जायचे ते एक चमचा दह्याचे पैसे मात्र रोज जात राहतात, एवढे निश्चित.

Pudhari Tadaka article
तडका आर्टिकल : उधारीवर संक्रांत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news