तडका आर्टिकल : उधारीवर संक्रांत
गेल्या काही वर्षांत आपला बाजार जवळपास संपूर्णत: बदलून गेलेला आहे. किराणा सामानाचेच उदाहरण घ्या. पूर्वी किराणा आणायचा म्हटले की, आपण महिन्याच्या सुरुवातीला एक भली मोठी यादी तयार करत असू. एवढा सगळा किराणा आणायचा म्हणून मोठ्या पिशव्या व अन्य जय्यत तयारी करून नजीकच्या किराणा दुकानावर जाणे आणि यादीप्रमाणे किराणा घेऊन येणे एवढाच विषय असे. नेहमीचाच दुकानदार असल्यामुळे उधारी पण नेहमीचीच असे. शिवाय महिनाअखेरीला गोडेतेल, साखर आदी वस्तू संपल्या, तर त्या प्रत्यक्ष दुकानाला भेट देऊनच विकत घेतल्या जात आणि त्यावेळी पण उधारी हा विषय येत असे. दुकानदारही तोंडभरून हसत ‘राहूद्या की साहेब, तुम्ही काय पळून चाललाय का,’ असे कौतुकाने म्हणून किराणा देत असे. मागची उधारी फेडायची आणि पुन्हा उधारीवर किराणा सामान आणायचे हे चक्र अव्याहत सुरू राहत असे.
काळ बदलला आणि ऑनलाईन पद्धतीने किराणा मागविण्यास सुरुवात झाली. इथे अॅडव्हान्स पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हरी प्रकार आल्यामुळे उधारी नावाची संकल्पनाच संपुष्टात येऊ घातलेली आहे की काय, असे वाटते. कोरोनापासून लोकांना प्रत्येक सेवा घरपोच मिळावी, असे वाटत आहे. याचा पहिला फटका जर कोणाला बसला असेल तर तो छोट्या किराणा दुकानदारांना. देश पातळीवर पाहिल्यास या फटक्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आहे, असे लक्षात येईल. यांना पहिली स्पर्धा आली ती मोठ्या, अवाढव्य असलेल्या किराणा मॉल्समधून. वातानुकूलित हवामानात सहकुटुंब किराणा खरेदी करणे हा एक आनंदाचा भाग होऊन बसला. शिवाय तिथे मिळणार्या बहुतांश वस्तू या छापील किमतीपेक्षा म्हणजेच एमआरपीपेक्षा कमी किमतीत मिळायला लागल्या. जागेवरच पेमेंट करायचे असल्यामुळे इथे कुठेही उधारीला वाव नव्हता.
किराणा दुकानदारांना बसलेला दुसरा नवीन फटका म्हणजे घरपोच किराणा सामान पोहोचविणार्या ई-कॉमर्स कंपन्या. या कंपन्यांनी घरपोच सेवा देण्याची सुरुवात केली आहे आणि सामान्य दुकानांपेक्षा 10 ते 15 टक्के कमी किमतीत वस्तू मिळत असल्यामुळे त्यांच्याकडील मागणीही वाढली आहे. साहजिकच ज्याच्याशी आपले जिवाभावाचे संबंध होते, असा किराणा दुकानदार पण अडचणीत आलेला आहे. एकंदरीत माहिती घेतली असता किमान एक कोटी वीस लाख किराणा दुकानदारांचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. वेळेत बचत होण्याबरोबरच स्वस्तात घरपोच सामान मिळत असल्याने शहरी भागात या सेवेला मागणी वाढत आहे. अनेक कंपन्यांनी या सेवेच्या माध्यमातून त्यांचा 30 ते 50 टक्के व्यवसाय केलेला आहे. याचाही फटका छोट्या किराणा दुकानदारांना बसला आहे. देशात किराणामालासह छोट्या दुकानांची संख्या 10 कोटींवर आहे. यात एक कोटी वीस लाख किराणा दुकानदार आहेत. ते बिचारे घाऊक किमतीमध्ये माल विकत घेतात आणि किरकोळ किमतीमध्ये विकतात आणि यात नफा कमवतात. या किराणा दुकानदारांनी पण जवळच्या परिसरात वस्तू घरपोच देण्याचा पर्याय काढला आहे; परंतु काळाच्या ओघात तो कितपत टिकून राहील, याविषयी शंका घेण्यास जागा आहे. पुढील पिढीला उधारी हा प्रकार माहीत असणार नाही, याची फार खंत वाटते. एक तर हे लोक अॅडव्हान्स पे करतात किंवा आपल्या दारात उत्पादन पोहोचल्याबरोबर जागेवरच पेमेंट करतात. त्यामुळे उधारी या प्रकाराला कुठेही वाव राहिलेला नाही.