तडका : साताजन्माचा फेरा

तडका : साताजन्माचा फेरा
Published on
Updated on

आज वटपौर्णिमेचा उत्सव महिलावर्ग आपल्या राज्यात सर्वत्र साजरा करीत आहे. ग्रामीण भागात तर तो अत्यंत भक्तिभावाने आणि जास्तच उत्साहात साजरा केला जातो. या जन्मी मिळालेला पती पुढील सात जन्मांसाठी 'बुक' करण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा. वडाच्या महाकाय वृक्षाभोवती दोरा गुंडाळून पतीला गुंडाळून ठेवले जाते, तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा. अक्राळ विक्राळ पसरलेल्या शहरांनी वडाच्या झाडांचा घास केव्हाच गिळंकृत केलेला आहे. वड नाही, तर वडाची फांदी तरी घेऊन महिला शहरी भागात वटपौर्णिमा साजरी करत असतात. अगदीच वडाची फांदी नाही मिळाली, तर वडाच्या फांदीचे चित्र काढून त्याच्याभोवती दोरा गुंडाळला जातो. तुमच्या-आमच्या मनात हा प्रश्न येतो की, पुन्हा साताजन्मासाठी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना महिला का करत असाव्यात? याचे काही उत्तर सापडते का ते पाहूयात.

महिला या पुरुषांपेक्षा दूरदर्शी आणि अचूक निर्णय घेणार्‍या असतात, याविषयी आमच्या मनात काहीही शंका राहिलेली नाही. जेव्हा एखाद्या स्त्रीचे एका पुरुषाशी लग्न होते आणि संसार नावाचा प्रकार सुरू होतो, तेव्हा तिच्या लक्षात येते की, याच्यावर काही संस्कारच झालेले नाहीत. यानंतर पुढील पाच वर्षे ती संस्कारांचा दांडपट्टा फिरवते आणि आपल्याला पाहिजे तसा नवरा घडवून घेते. खूप मेहनत करून, संयम ठेवून, आपल्या मनाप्रमाणे घडवलेला नवरा पुढील सात जन्मी मिळावा, असे स्त्रियांना वाटले, तर त्यात काही चूक नाही. पुन्हा नवीन उमेदवार घ्या, त्याला पुन्हा घडवण्यासाठी मेहनत घ्या, त्यापेक्षा आहे तो मनाप्रमाणे घडवलेला पती याच जन्मी नव्हे, तर पुढील सात जन्मीही कायम असावा, अशी त्यांची इच्छा असावी बहुतेक.

काही विवाहित पुरुषांचे गुण मात्र वाखाणण्याजोगे असतात. ते बायकोचे ऐकत नाहीत, व्यसनांच्या अधीन गेलेले असतात, कामावरून घरी परत आले की, पत्नीला मारझोड करतात. आम्हास विशेष आश्चर्य याचे वाटते की, असा त्रास देणारा नवरा असला तरी त्यांच्या बायका निष्ठापूर्वक वटपौर्णिमा साजरी करत असतात. खरे तर नवर्‍याचे असंख्य दुर्गुण पाहूनही महिला त्याच्यासाठी वडाची पूजा करते. याच जन्मी सगळे दुर्गुण लोप पावून तो नवरा सुधारित अवतारात मिळावा, यासाठी पण त्या वडाची पूजा करत असतील बहुतेक.

जे काय असेल ते असो, परंतु भारतीय संस्कृतीमधील महिलांच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा सण म्हणजे वटपौर्णिमा होय. कुणाला वटपौर्णिमेचे व्रत किंवा त्या दिवशी केलेले उपवास अंधश्रद्धा वाटत असतील, कालबाह्य झालेले आहेत असे वाटत असतील, तरी परंतु जोवर ही वटपौर्णिमा नवर्‍याच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी साजरी केली जात आहे, तोवर भारतीय संस्कृतीला उतरती कळा लागणे शक्य नाही. दुर्धर आजाराने ग्रस्त असणार्‍या पतीला दवाखान्यात नेऊन, त्याच्या रोगावर इलाज करून मृत्यूच्या कराल दाढेतून त्याला बाहेर काढणार्‍या सावित्री आज ग्रामीण व शहरी भागातही मोठ्या प्रमाणात दिसत असतात. वटपौर्णिमा म्हणजे पत्नीने नवर्‍यावरील प्रेम व्यक्त करणारा दिवस. ही रणरागिनी केवळ पतीसाठीच नाही, तर अख्ख्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटत असते. पती हाच परमेश्वर ही भारतीय महिलांची धारणा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news