तडका : निकालाचे आडाखे अन् हुरहुर

तडका : निकालाचे आडाखे अन् हुरहुर

मतदान झाल्यानंतर काही संस्था लोकांना प्रश्न विचारून त्यांचा कल जाणून घेत असतात. यालाच एक्झिट पोल, असे म्हणतात. तूर्त एक्झिट पोलचे निकाल किंवा अंदाज पण आले आहेत. हा मजकूर वाचत असताना मतमोजणी सुरू होऊन प्रत्यक्ष निकाल येण्यासाठी अवघा 24 तासांचा अवधी शिल्लक आहे. ज्या ताकाची घुसळण गेले सहा महिने देशभर सुरू होती, त्यामधील नवनीत नेमके कोणाला प्राप्त होणार आहे, हे मंगळवारी कळणार आहे. राजकीयद़ृष्ट्या अतिसजग असणार्‍या आपल्या देशातील नागरिकांचा विचार केला, तर ते घडणार्‍या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात, मग ते एक्झिट पोल असोत की सोशल मीडियावर व्यक्त केले जाणारे अंदाज असोत.

एक्झिट पोलचा एक फायदा म्हणजे सर्व प्रकारच्या लोकांची एक प्रकारची मानसिकता तयार होते आणि त्यामुळे अचानक आलेल्या निकालानंतर कोणालाही धक्का बसत नाही. मनासारखे निकाल आले तर राजकीय पक्षही एक्झिट पोल अचूक केलेले आहेत, असे शेरे मारत असतात. हे अंदाज आपल्या मनासारखे नसतील तर एक्झिट पोलवर विश्वास नाही, असे ते सांगत असतात. गृहीत धरा की, एखाद्या मतदारसंघात अटीतटीची लढत झालेली आहे. चाचण्यांमध्ये विशिष्ट उमेदवार पराभूत होणार, असा कल सांगितला गेला आहे. अर्थात, त्या उमेदवाराला तो कल मान्य नसतोच; परंतु मनाच्या एका कोपर्‍यात कुठे ना कुठेतरी आपण पराभूत होऊ शकतो, ही मानसिकता तयार होत असेल तर प्रत्यक्ष निकालानंतर त्या व्यक्तीला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता नाही. एक्झिट पोलचा हा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणता येईल. आपला नेता निवडून येणे हे त्या नेत्यापेक्षा त्याच्या कार्यकर्त्यांसाठी जास्त महत्त्वाचे असते.

नेता निवडून आला तरच संसार चालेल याविषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नसते. सर्वेक्षणात आपला नेता निवडून येत आहे, असे लक्षात आले तर लगेच त्याच्या विजयाचे फलक सर्वत्र झळकत असतात. याचे कारण म्हणजे हा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. निवडून आल्यानंतर नेत्याच्या सर्वात जवळ जाण्याचा प्रयत्न या काळामध्ये कार्यकर्त्यांकडून केला जातो. आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपलाच नेता विजयी होणार, अशा आशयाचे खूप फलक लागले आहेत. या बॅनर्सचे किंवा होर्डिंगचे आयुष्य मात्र केवळ 48 तासांपुरते आहे, कारण त्यानंतर थेट निकालच हाती येणार आहेत. आपला नेता निवडून आला तर लगेच त्याच बॅनरच्या जागेवर विजयाचे फलक पुनश्च लागतील आणि राज्यभर आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

मतमोजणीची टेबल तयार आहेत. तिथे काम करणार्‍या अधिकार्‍यांचे प्रशिक्षण पूर्वीच पूर्ण झालेले आहे. मंगळवारी सकाळी प्रत्येक ईव्हीएम उघडून त्यामध्ये कोणाला किती मतदान झाले आहे, याची नोंद घेतली जाईल आणि साधारणतः दुपारी बारा ते एकच्या आसपास कोण किती आघाडीवर किंवा पिछाडीवर आहे, याचे आकडे येण्यास सुरुवात होईल. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले असेल. कुणी खूश होईल, कुणी नाराज होईल, कोणाला धक्का बसेल, कुणी ईव्हीएमवर खापर फोडण्याचा प्रयत्न करील. असंख्य अडथळ्यांवर मात करीत निवडणूक आयोग कार्य करत असतो. या महाकाय देशाचा लोकसभेचा निकाल काय लागायचा तो लागेल; पण इतक्या मोठ्या देशामध्ये निवडणुका घेणे आणि त्यांचा निकाल लावणे ही खरे तर फार मोठी गोष्ट आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news