तडका : आली समीप घटिका

तडका : आली समीप घटिका
Published on
Updated on

गेले वर्षभर सुरू असलेला गदारोळ जवळपास संपत आला असून, लोकसभा निवडणुकांच्या निकालाची तारीख अगदी जवळ आली आहे. शेवटचा टप्पा संपल्याबरोबर पुढील दोन दिवस मतदानपूर्व चाचण्यांचे कल समोर येतील आणि सर्व माध्यमांवर एकच कलकलाट पाहायला मिळेल. हे दोन दिवस उलटले की, चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निवडणूक आयोग चोखपणे काम करत आहे. एवढ्या मोठ्या देशातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडणे, हेच मोठे काम आहे आणि निवडणूक आयोगाने ते यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे. यानंतर येतो तो मतमोजणीचा दिवस आणि त्यानंतर सर्व काही पार पडल्यानंतर निवडून आलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र देण्याची जबाबदारीही आयोगाचीच असते. हे प्रमाणपत्र मिळालेले सर्व खासदार पुढे दिल्लीला जाऊन सरकार स्थापन करत असतात.

निवडणुकांचे निकाल काय लागतील ते लागोत, परंतु आपण सर्वसामान्य माणसांनी मात्र काळजी घेतली पाहिजे. नात्यातील, मित्रत्वातील, कुटुंबातील संबंध यांना निवडणुकीच्या निकालामुळे काही बाधा येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. राजकीय भूमिकेवरून घराघरांत वाद असतात. वडील एका विशिष्ट विचारसरणीचे असून, एखादा विशिष्ट पक्ष निवडून यावा, अशी त्यांची इच्छा असते. त्याचवेळी मुलाचा विचार नेमका याच्याविरुद्ध असतो. निवडून कुणीही येवो, पण बाप-लेकाचे नाते हे कायम प्रेमळ असले पाहिजे, याची जरूर काळजी घ्या. आपल्यासाठी तीन मोठे निर्णय येणार आहेत.

पहिला म्हणजे केंद्रात सरकार युतीचे येणार की आघाडीचे येणार, हा मोठाच कळीचा प्रश्न आहे. दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षांनी बहुमत आल्यात जमा आहे, असा दावा केला आहे. हा दावा नेमका कोणाचा खरा ठरतो, हे पाहण्यास आपण सर्वजण उत्सुक आहोत. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यात या दोन आघाड्यांपैकी नेमकी कोणती आघाडी अधिक जागा मिळवणार, हा प्रश्न जिव्हाळ्याचा असतो; कारण त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. शिवाय नवीन सरकार बनताना राज्याचे मोठे योगदान असेल तर कदाचित जास्तीचा निधी आपल्या राज्याला मिळू शकतो.

तिसरा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आपण ज्या मतदारसंघात राहतो किंवा आपण ज्या मतदारसंघात मतदान केले आहे, त्याचा निकाल आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. कुणी खासदार येऊन तुमचे काही काम करेल, याची अजिबात शक्यता नसते; परंतु कोण निवडून येणार याविषयी गेले दोन महिने तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर वाद घातले आहेत, चर्चा केली आहे, स्वतःचे म्हणणे आग्रहाने मांडले आहे. हे जरूर केलेच पाहिजे; परंतु ते करताना व्यक्तिगत संबंधांत बाधा येणार नाही, याची पण काळजी घेतली पाहिजे. सामान्य जनताही उत्सुकतेने चार तारखेची वाट पाहत आहे. आधीच ऊन खूप वाढलेले आहे.

राजकीय पक्ष एकमेकांवर आगपाखड करत आहेत. त्यामुळेही तापमान वाढले आहे, असे लक्षात येईल. भरपूर पाणी प्या, उन्हात फिरू नका, मन शांत ठेवा, ब्लडप्रेशर किंवा तत्सम गोळ्या आजूबाजूला असू द्या. भरपूर खाण्याचे पदार्थ आजूबाजूला असू द्या. धक्का बसल्यास आपल्याला सांभाळणारे लोक आजूबाजूला असले पाहिजेत. अशी सर्व तयारी करून चार जूनला सकाळी आठ वाजता जय्यत तयारीने टीव्हीसमोर बसा आणि कुठलाही ताणतणाव न घेता शांतपणे निवडणूक निकालांना सामोरे जा, हीच मराठी माणसांना आमची विनंती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news