Manohar Lal Khattar : निष्काम कर्मयोगी

Manohar Lal Khattar : निष्काम कर्मयोगी

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि मनोहरलालजी खट्टर (Manohar Lal Khattar) यांना आपला शिरसाष्टांग दंडवत. नऊ वर्षे हरियाणासारख्या संपन्न राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आपण राहिलात. खरे तर किती कोटी प्रचंड माया गोळा करायला हवी होती; पण ते काही न करता आपण ते पद सोडले. मान्य आहे की, पक्षाने आदेश दिला म्हटल्याबरोबर क्षणाचाही विचार न करता आपण त्या पदाचा त्याग केलात आणि सामान्य माणसासारखे वागायला सुरुवात केली. आपण ब्रह्मचारी आहात आणि साहजिकच कुटुंबकबिला आपल्या पाठीशी नाही. अहो, इतर राजकारणी लोकांकडे पाहा. आमदारकीची किंवा खासदारकीची एक टर्म मिळाली तरी पुढच्या तीन पिढ्या बसून खातील एवढी कमाई करून ठेवली जाते आणि शिवाय मुलाबाळांना, मुलींना, जावयांना जागेवर आणण्यासाठी आटापिटा केला जातो.

हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदावरून उतरल्याबरोबर तुम्ही (Manohar Lal Khattar) सगळी संपत्ती देशाला दान करून टाकली. स्वतःची आहे नाही ती सगळी संपत्ती तुम्ही पंतप्रधान सहायता निधीला देऊन टाकलीत, हे पण समजण्यासारखे होते; पण तुमचे स्वतःचे राहते घरसुद्धा तुम्ही एका ग्रंथालयाला दान करून टाकले आणि दोन पिशव्यांमध्ये आपले कपडे आणि सामान भरून बस स्टँडच्या दिशेने रवाना झालात. यामुळे सगळा देश थक्क झाला आहे. साध्या शर्ट-पायजाम्यात, हातात पिशव्या घेतलेला, नऊ वर्षे माजी मुख्यमंत्री राहिलेला गृहस्थ बसने प्रवास करतो, हे हरियाणातील लोकांनी 'याचि देही याचि डोळा' पाहिले.

अहो, राजकीय नेता म्हणजे कोटी-दोन कोटींच्या गाड्या पाहिजेत, मागे-पुढे फिरणारे पाच-पन्नास लोक पाहिजेत. किंबहुना नेता निघाल्याबरोबर त्याच्या पाठीशी पाच पंचवीस गाड्यांचा ताफा पाहिजे, तर कुठे आम्हाला तो नेता आहे असे वाटते. असे काही न करता तुम्ही आहे ते देशाला देऊन टाकलेत, हे कौतुकास्पद आहे. असे उदाहरण तुम्ही दाखवून द्याल तर मग बाकी लोकांनी काय करायचे? आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत कुठला घोटाळा स्वतः केला नाही आणि दुसर्‍यांना करू दिला नाही. स्वच्छ प्रशासन ठेवून तुम्ही काम केलेत. आता पक्ष तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देणार आहे म्हणे. अहो खट्टरसाहेब, किमान ती लढवण्यासाठी तर पैसे लागतील ना? तेवढे तरी ठेवून घ्यायचे होते ना? सर्वसंग परित्याग करून, सर्व संपत्ती दान करून निष्काम कर्मयोगी होणारे उदाहरण तुमच्या रूपाने कित्येक वर्षांनंतर या देशामध्ये पाहायला मिळाले.

लोकसभेला तुम्ही (Manohar Lal Khattar) उभे राहिलात तर तुम्हाला संपत्तीच्या रकान्यामध्ये निरंक लिहावे लागेल, अशी शक्यता दिसत आहे. आज निवडणूक लढविणार्‍या प्रत्येक उमेदवाराला आपली संपत्ती जाहीर करणे आवश्यक असते. सर्वात कमी संपत्ती असणारासुद्धा पन्नास एक कोटी रुपये बाळगून असतो आणि सर्वात जास्त संपत्ती असणारा दोन एक हजार कोटी रुपये बाळगून असतो. अशा वेळेला शून्य संपत्ती बाळगणारा तुमच्यासारखा उमेदवार लोकसभेला निवडून तरी कसा येणार, याची आम्हाला काळजी लागली आहे. कसे वागावे, याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे; पण प्रचलित राजकारणाला सोडून वेगळे वागला. सत्ता केवळ जनतेच्या सेवेसाठी वापरायची आणि त्यातून स्वतःचे काही भले साधायचे नाही, असे एकमेव दुर्मीळ उदाहरण म्हणून तुम्ही आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी असाल, हे निश्चित आहे.

– कलंदर 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news