तडका : फड आणि कुस्ती

तडका : फड आणि कुस्ती
Published on
Updated on

फड हा शब्द कानावर पडल्याबरोबर मराठी माणसांच्या मनामध्ये वेगवेगळे पर्याय येत असतात. उसाचा फड असतो, तमाशाचा फड असतो आणि कुस्त्यांचाही फड असतो. विशेषत: कुस्त्यांबद्दल किंवा कुस्त्यांच्या स्पर्धांबद्दल 'कुस्त्यांची दंगल' असे शब्द वापरले जातात. लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशी ही कुस्त्यांची दंगल सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. कुस्ती या महाराष्ट्रातील लोकप्रिय खेळाचे आणि राजकारणाचे विलक्षण असे साम्य आहे.

कुस्तीपटू खेळाडूंची विजोड कुस्ती लागू नये म्हणून त्यांचे वजनाप्रमाणे गट केलेले असतात. खेळ कोणताही असो, जिंकायचे तर प्रत्येकालाच असते. हा नियम जसा कुस्तीला लागू होतो, तसाच निवडणुकांनाही लागू होत असतो.

आपल्यासारखा दुसरा पैलवान कुणीही नाही, अशी प्रत्येक कुस्ती खेळणार्‍याची भूमिका असते. उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांची आपल्या मतदारसंघाबद्दल काही समीकरणे असतात. आपल्या पाठीशी असणारे कार्यकर्ते, आपल्या जातीचे असणारे मतदान, मतदारसंघातील आपले नातेवाईक, आपण केलेली तथाकथित विकासकामे, वेळोवेळी जनतेला केलेली मदत आणि आपल्याकडे असलेला पैसा, हे सर्व पाहून विजय कसा मिळवायचा, याचे प्रत्येकाचे आडाखे असतात. त्या गृहीतकावर आधारित तयारी तो करत असतो.

अगदी एखाद्या पक्षाचे तिकीट नाही मिळाले तरी आपण अपक्ष निवडून येऊ शकतो, हा एक अजब प्रकारचा आत्मविश्वास बर्‍याच लोकांमध्ये असतो. प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये अशा काही लोकांचे डिपॉझिटही जप्त होते आणि पुन्हा म्हणून ते निवडणुकीला उभे राहायचे नाव घेत नाहीत. चक्क चाळीस-पन्नास लाख रुपये खर्च केलेल्या उमेदवारांनासुद्धा जेमतेम दीडशे ते दोनशे मते पडलेली दिसून आली आहेत. खर्च झालेल्या रकमेचा आणि मतदानाचा हिशेब लावला, तर एक मतदान 40 ते 50 हजारांना पडलेले आहे, अशी ही अनेक उदाहरणे महाराष्ट्राने पाहिली आहेत. सध्या जी राजकारणाची दंगल सुरू आहे, त्यामध्ये उमेदवार एकमेकांचा अंदाज घेत आहेत, आरोळ्या ठोकत आहेत, घोषणा करत आहेत, आश्वासने देत आहेत. हा म्हणजे प्रत्यक्ष कुस्ती सुरू होण्यापूर्वी वातावरणनिर्मितीचा प्रकार असतो.

कुस्तीच्या रिंगणात दोन मल्ल एकमेकांसमोर उभे राहतात, तेव्हा सुरुवातीला एकमेकांचा अंदाज घेत असतात. याला खडाखडी असे म्हणतात. खडाखडी म्हणजे उभे राहून कुठलाही डाव न टाकता एकमेकांच्या शक्तीचा अंदाज घेणे. समोरच्या मल्लाच्या खांद्याला हात लावून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करणे वगैरे उपक्रम यात राबविले जातात. एकंदरीत एकमेकांचा अंदाज घेऊनच कुस्ती लढली जाते. सुरुवातीची खडाखडी झाली की, मग प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात होते. इथून पुढे एकमेकांना चितपट करण्यासाठी डावपेच खेळले जातात. राजकारणामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराची बदनामी करणे, अफवा उठवणे, सोशल मीडियावर भरपूर खर्च करून आपली स्वतःची प्रतिमा चांगली करून घेणे, ही प्रत्यक्ष कुस्तीला सुरुवात झाल्याची लक्षणे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news