Budget : आमचाही अर्थसंकल्प

Budget : आमचाही अर्थसंकल्प

आपल्या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पाचे चांगले-वाईट परिणाम समाजातील प्रत्येक घटकावर होत असतात. बहुतांश सर्व वर्गांना खूश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्याचबरोबर विकासाची गॅरंटी पण दिलेली आहे. आता आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या जीवनावर अर्थसंकल्पाचे काय परिणाम होतात, ते पाहूया!

खरं तर, विशेष असे काही परिणाम होत नाहीत. याचे कारण म्हणजे, रोजच्या जगण्यामध्ये आपला जीव मेटाकुटीला आलेला असतो. महिना अखेरपर्यंत साखर, तेल, तूप कसे पुरवायचे हा एक मोठा प्रश्न असतो. शिवाय व्यक्तिगत अर्थसंकल्पाला तडे देणार्‍या घटना घरामध्ये नेहमी घडत असतात. लेकराबाळांची आजारपणे, अचानक येणारे पाहुणे आणि लग्नकार्यांमध्ये करावे लागणारे आहेर हेच ते घरगुती अर्थसंकल्पाखाली ठेवलेले बॉम्ब असतात. आपण कसेबसे महिनाअखेरपर्यंत पुरतील इतके पैसे वाचवत आणलेले असतात आणि अचानक सासूरवाडीकडे एखादे लग्न कार्य निघते. सख्या किंवा चुलत मेव्हण्याकडे कार्य असेल, तर रितीपेक्षाही जास्त चांगला असा आहेर करावा लागतो. पत्रिकेमध्ये कितीही कोणी लिहिली असेल की आहेर घेणार नाही, तरीही पुरुषांना सासूरवाडीकडच्या लग्नांमध्ये तगडा आहेर करावाच लागतो, ज्यामुळे पुढील तीन महिन्यांचे बजेट कोलमडून गेलेले असते.

शाळकरी मुलांच्या फी हा एक अर्थसंकल्पाला असलेला मोठा धोका असतो. त्यामध्ये गॅदरिंगची फी, परीक्षा फी आणि नियमित फी यांचा भरणा असतो. सणावाराला करावी लागणारी खरेदी कितीही कठीण आर्थिक स्थिती असली, तरी करावीच लागते. आता पाडव्यासारखा सण आल्यानंतर वॉशिंग मशिन, टीव्ही, नवीन वाहने यांना उठाव आलेला असतो. त्याच्या भक्कम जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवर आणि मोबाईलवर सातत्याने येत असतात. या जाहिराती म्हणजे ग्राहकाला उचकवण्यासाठीच निर्माण केलेली कलाकृती असते.

आपल्यासारख्या सामान्य कुटुंबात कोणती तरी जाहिरात पाहून मुलेबाळे आणि महिला वर्ग काहीतरी वस्तू घेण्याचा आग्रह करतात आणि मग आपला व्यक्तिगत अर्थसंकल्प त्यावेळेला डळमळीत व्हायला लागतो. सामान्य लोकांची आर्थिक स्थिती आधीच जेमतेम असते. त्यात येणारे असे खर्चाचे प्रसंग त्याचा जगण्यामधील संघर्ष वाढवत असतात. 140 कोटींच्या देशाच्या लोकसंख्येचे आर्थिक नियोजन करणे ही फार कठीण बाब असणार आहे. केंद्र सरकारने ती उत्तमरीत्या पार पाडलेली आहे असे दिसते आहे.

शेतकरी वर्ग,पशुसंवर्धन यांच्यावर भर दिलेला दिसतो आहे. सामान्य लोकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल अर्थमंत्री आणि पंतप्रधान यांच्या अभिनंदन करावे लागेल. या वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, तरीही अर्थसंकल्पाचा बाज पुढे आपलेच राज्य येणार आहे, या आत्मविश्वासाने भरलेला आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार्‍या सरकारलाच अंतिम अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळणार की नाही, हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता ठरविणार आहे. तूर्त या अर्थसंकल्पाने बर्‍यापैकी रिलीफ दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news